जहालवादाचा विजय !

Mumbai
modi & shah
modi & shah

काश्मीरला भारतापासून वेगळे ठेवणारे ३७० कलम केंद्रातील भाजप सरकारने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा आढावा घेतल्यावर काही महत्त्वपूर्ण गोष्टी लक्षात येतील. जहालवादी आणि मवाळवादी अशा दोन विचारप्रवाहांचे नेते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल अशा लाल, बाल आणि पाल या तीन जहालवादी नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिशांच्या जोखडा खालून भारत मुक्त करण्याचा लढा सुरू झाला.

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळत असताना वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणारे बॅ. महमद अली जीना हेदेखील जहालवादीच होते. लोकमान्य टिळकांवर ब्रिटिशांनी राजद्रोहाचा खटला भरला, तेव्हा त्यांचे वकीलपत्र महमद अली जीना यांनी घेऊन तो खटला लढवला होता. त्या काळी जीना पुढे जाऊन वेगळ्या पाकिस्तानची मागणी करतील, अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. पण पुढे लाल, बाल आणि पाल यांचे युग मागे पडल्यानंतर मवाळवादी नेत्यांच्या खांद्यावर देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची धुरा आली. त्यात महात्मा गांधीजी अग्रणी होते.

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशवासियांनी दिलेला लढा, दुसरे महायुद्ध, ब्रिटिशांच्या जगभरातील वसाहतींमधून झालेले उठाव या एकूण पार्श्वभूमीवर ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे कठिण होऊन बसले, त्यांना भारत सोडावा लागला. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची गोष्ट असली तरीही जहालवादी आणि मवाळवादी ही विभागणी होती. जहालवादी असलेल्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य देशाला मिळाले नाही. तरीही ते त्या आनंदात सहभागी झाले. पण दुसर्‍या बाजूला असलेले जहालवादी महमद अली जीना मात्र कट्टरतावादी मुसलमान होऊन पेटून उठले होते. त्यासाठी त्यांनी हाहा:कार माजवला.

त्यांना मुस्लिमांसाठी वेगळा देश हवा होता. त्या देशाचे त्यांना प्रमुख व्हायचे होते. त्यांच्या जहालवादा पुढे भारतातील मवाळवादाला नमते घ्यावे लागले आणि भारताचे विभाजन मान्य करावे लागले. पण आता जहालवादी टिळकांना मानणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा जहालवादाचा विजय झाला आहे. त्यातून काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाले असून पुढे याच मार्गाने संपूर्ण काश्मीरची समस्या सुटू शकेल, हे सिद्ध झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here