दारुसाठी कायपण! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडच्या खिशातून चोरले पैसे आणि…

गर्लफ्रेंडने चक्क दारुसाठी बॉयफ्रेंडच्या खिशातून पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे.

बऱ्याचदा दारुसाठी अनेक जण जुगाड केल्याचे ऐकले आहे. मात्र, एका गर्लफ्रेंडने चक्क दारुसाठी बॉयफ्रेंडच्या खिशातून पैसे चोरल्याची घटना समोर आली आहे. ही घटना तेलंगणातील सिकंदराबाद येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, गर्लफ्रेंडने पैसे चोरल्यानंतर बॉयफ्रेंडने तिची निर्घुण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी तिचा मृतदेह एका बंद पडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी फेकल्याचे उघडकीस आले आहे. भुलक्ष्मी (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

नेमके काय घडले?

भुलक्ष्मी ही मूळची प्रकाशम जिल्ह्यातील रहिवाशी होती. तसेच ती काही महिन्यांपूर्वीच सिकंदराबाद येथे राहायला आली होती. त्यावेळी मंगमुरी वेंकट याच्यासोबत तिची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. नंतर ते दोघे एकत्र राहू लागले होते. भुलक्ष्मी आणि वेंकट दोघांनाही दारु प्यायचे व्यसन असल्याने ते बऱ्याचदा एकत्र प्यायला बसायचे.

त्याप्रमाणे गेल्या रविवारी देखील ते दोघे एकत्र दारु प्यायला बसले होते. त्यानंतर वेंकट झोपला मात्र, भुलक्ष्मीची दारुची तल्लफ मिटली नव्हती. त्यामुळे तिने वेंकटच्या खिशातले बाराशे रुपये काढले आणि ती पुन्हा दारु पिऊन आली. वेंटक संध्याकाळी उठला तेव्हा त्याच्या खिशात पैसे नव्हते. ते पाहून तो वैतागला. त्याने याबाबत भुलक्ष्मीला विचारले. पण, ती शुद्धीत नव्हती. त्यामुळे तो रागाने घराबाहेर गेला. त्यानंतर रात्री जेव्हा तो परतला त्याने पुन्हा भुलक्ष्मीला दारु पाजली. दारुच्या नशेत तर्राट झालेल्या भुलक्ष्मीचा गळा घोटून हत्या केली. त्यानंतर तिचे कपडे फाडून तिच्या शरीरावर चाकूने वार केले आणि तिचा मृतदेह एका बांधकाम बंद पडलेल्या इमारतीत फेकून दिला.


हेही वाचा – Corona Vaccine: वैद्यकीय चाचणीसाठी भरती थांबवा, DCGI चा सीरम इन्स्टिट्यूटला आदेश