फिल्मसिटी मुंबईबाहेर नेण्याचे कुटील कारस्थान रचलं जातंय; मनसेचा आरोप

amey khopkar
मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर

मुंबईतून बॉलिवूड संपवण्याचे किंवा ते हलविण्याचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केले होते. त्यानंतर मनसेने देखील याच विषयाची री ओढत बॉलिवूडची नाहक बदनामी करणाऱ्यांना इशारा दिला आहे. मनसे चित्रपट सेनेचे नेते अविनाश खोपकर यांनी ट्विट करत “फिल्मसिटी मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.” असे सांगत मनसे हे कारस्थान पुर्ण होऊ देणार नाही, असा इशारा खोपकर यांनी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मल्टीप्लेक्स आणि सिनेमा थिएटर मालकांची बैठक घेतली. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बॉलिवूडमुळे असंख्य रोजगार निर्माण झालेले आहेत. मात्र काहीजण बॉलिवूडला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच बॉलिवूड हलविण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी देखील बॉलिवूडला बदनाम करणाऱ्यांवर टीका केली. “भूतकाळातही बॉलीवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलीवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलीवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जातोय, एवढंच नाही तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जातंय.”

 

खोपकर पुढे म्हणाले की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे.”

बॉलिवूडचा चाहता वर्ग जगभर

बॉलिवूडचे आकर्षण हे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. वर्षाला हजारो सिनेमे इथे निर्माण होत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सिनेसृष्टी हे फक्त मंनोरजन क्षेत्र नसून अनेकांना रोजगार देणारे उद्योग क्षेत्र आहे. बॉलिवूड हलविण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.

अनलॉकच्या अंतर्गत लवकरच सिनेमागृह खुले केले जाणार आहेत. मागच्या सात महिन्यांपासून सिनेमाचा पडदा शांत होता. आता पुन्हा सिनेमागृह आणि मल्टिप्लेक्स सुरु करण्याआधी त्याच्या मार्गदर्शन प्रणालीसाठी मल्टिप्लेक्स आणि सिनेमागृह मालकांशी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली.