‘ना घाबरणार, ना माघार घेणार’, मुंबईत येण्याआधी कंगनाचे ट्विट!

kangana ranavat
कंगना रणावत

कंगना रणावत आज मुंबईत दाखल होणार आहे. गेले काही दिवस शिवसेना –कंगनामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादानंतर कंगनाचे आज मुंबईत येणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय मला आडवून दाखवा असे आव्हान तीने या आधीच केलं होतं. त्यामुळे आज कंगनाच्या मुंबईत येण्याकडे लक्ष लागले आहे. मुंबईत दाखल होण्याआधी कंगनाने ट्विट केलं आहे.

कंगना आज  मुंबईत दाखल होणार असून तिने प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याआधी तिने ट्विट केलं आहे, ‘जय महाराष्ट्र, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली आहे. आपल्याला महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं जाणं खेदाची बाब असून आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या मार्गावर चालणार असून ना घाबरणार, ना माघार घेणार असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगनावर टीकेची झोड उठली आहे. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं. यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या. त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं.

RPI संरक्षण देणार

कंगना आज मुंबई विमातळावर दाखल होणार असून यावेळी आरपीआय तिला संरक्षण देईल अशी घोषणा रिपाइचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे. ४ सप्टेंबरला रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हटलं होतं की, “लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. कंगनाला आपलं मत मांडण्याचा आणि मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. कंगनाला RPI संरक्षण देईल”.