बॉलीवूड एकवटले! ‘या’ बड्या मीडिया हाऊसेस विरोधात कोर्टात याचिका दाखल

गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूडसंबंधीत अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या सीबीआय, ईडी आणि एनसीबीच्या चौकशीतून बॉलीवूड क्षेत्रातील काळी बाजू प्रेक्षकांच्या समोर आली आहे. काही गोष्टींमध्ये तथ्य असून काही बनावटी असल्याचे स्पष्टीकरण वेळोवेळी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले आहे. मात्र बॉलीवूडची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काही मीडिया हाऊसेस करत असून त्यांच्या विरोधात बॉलीवूडकर्मी एकवटले आहेत. बेजबाबदार बातम्या देणाऱ्या मीडिया हाऊसेस विरोधात शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्या प्रॉडक्शन हाऊसेससह ३८ जणांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यामध्ये रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ट्रेड एनालिटिक्स तरण आदर्श यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली की, बॉलीवूड आता पलटवार करण्यासाठी सज्ज झाली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू असताना बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले. यासंबंधी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केल्यानंतर तिने दिलेल्या माहितीतून काही कलाकार मंडळींची नावे समोर आली. यामध्ये श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पदुकोण, रकूल प्रीत यांचा समावेश होता. दरम्यान, एनसीबीकडून त्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र बॉलीवूडची प्रतिमा मलिन करण्याचा किंवा बातम्या भडक करून दाखवण्याचा प्रयत्न काही चॅनेल्सकडून होत असल्याचा आरोप काही बॉलीवूडकर्मींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. त्यानंतर या ३८ सेलिब्रिटींनी कोर्टात त्या मीडिया हाऊसेसविरोधात याचिका दाखल केली असल्याचे समजते.

हेही वाचा –

बत्ती ऑन आणि पाणी गॉन; मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मंगळवारी ‘इफेक्ट’