घरमनोरंजनप्रार्थना सांगतेय सेटवरील गंमतीजमती!

प्रार्थना सांगतेय सेटवरील गंमतीजमती!

Subscribe

अभिनेत्री प्रार्थना बेहरे 'लव यू जिंदगी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर देखील आहेत. प्रार्थनाने या चित्रपटाच्या सेटवरील गंमतीजमती सांगितल्या आहेत.

‘लव यू जिंदगी’ हा चित्रपट शुक्रवारपासून म्हणजेच ११ जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, अभिनेत्री कविता लाड मेढेकर आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे आहेत. प्रार्थना बेहरे पहिल्यांदाच सचिन पिळगावकर यांच्यासोबत चित्रपटामध्ये काम करत आहे. त्यामुळे तिचा अनुभव कसा होता? यासंबंधी माहिती तिने माध्यमांना दिली आहे. ती म्हणाली की, “मी सिनेमात झुम्बा डान्सरची भूमिका करते आहे. चित्रपटात मी अनिरुद्धला म्हणजे सचिन सरांना झुम्बा शिकवते! पण प्रत्यक्षात शूटिंगवेळी त्यांनीच मला झुम्बाच्या स्टेप्स शिकवल्या! मला जाम टेन्शन आलं होतं सचिन सरांना झुम्बाच्या सूचना देताना!” त्याचबरोबर जे आयुष्यावर आणि स्वतःवर प्रेम करतात त्या प्रत्येकाने ‘लव यू जिंदगी’ चित्रपट बघावा, असेही प्रार्थनाने म्हटले आहे.

हेही वाचा – सचिन आणि प्रार्थनाचा ‘लव्ह यु जिंदगी’

- Advertisement -

‘शूटिंग कधी पूर्ण झालं कळलं देखील नाही’

प्रार्थनाने सेटवरील मजामस्तीचे किस्से सांगितले. सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम केल्याचा अनुभवही सांगितला. ती म्हणाली की, “मनोज सावंत यांचा ‘लव यु जिंदगी’ करताना सेटवर कायम मजामस्तीचं वातावरण होतं. सचिन पिळगावकर सरांसोबत आणि कविता लाड मेढेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. सचिन सर सेटवरील वातावरण कायम उत्साही ठेवत. ते कधी ‘प्रॅंक्स’ही करत. एक दिवस मला सेटवर यायला उशीर झाला. तेव्हा सचिन सरांनी सगळ्यांना राग आल्याचं नाटक करायला, माझ्याशी कोणी न बोलायला सांगितलं. मला ते वातावरण बघून खूप ताण आला, अपराधी वाटू लागलं. पण नंतर सगळे हसू लागले आणि माझा जीव भांड्यात पडला. कधी सचिन सर मुद्दाम खास कठीण मराठी शब्दांचा अर्थ विचारायचे, ज्याचा अर्थ मला कळायचा नाही. मग तेच त्या शब्दांचा अर्थ समजावून सांगायचे. एकूणच चित्रपट करताना धमाल आली. शूटिंग कधी पूर्ण झालं कळलं देखील नाही”.

हेही वाचा – नव्या वर्षात करूया जिंदगीचं लाईफटाईम डबल रिचार्ज

- Advertisement -

हा सिनेमा का केला?

हा सिनेमा का करावासा वाटला? हे विचारल्यावर प्रार्थना म्हणाली की, तिला हा सिनेमा स्वप्नील जोशीमुळे मिळाला. स्वप्नीलने हा सिनेमा करशील का? असे फोन करून विचारलं. सचिन सरांसोबत काम करायचं होतं म्हणून देखील हा सिनेमा मी केला, असे प्रार्थनाने सांगितलं. सिनेमातील रिया आणि मुळातील प्रार्थनामध्ये खूप साम्य आहे, असेही तिने सांगितले. ती म्हणाली. “लव यु जिंदगीमधील रिया स्वतःच्या भरवशावर आयुष्य जगणारी, आत्मविश्वासाने भरलेली, खूप विचार न करणारी, भरभरून आयुष्य जगणारी आहे, मी देखील तसंच जगते!”

हेही वाचा – लवकरच येणार ‘लव यु जिंदगी’

‘कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट’

तिच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण विचारला असता प्रार्थना म्हणाली की, ती प्रत्येक दिवस संपूर्णपणे जगते, ती दररोज जीवनावर प्रेम करते. ‘लव यु जिंदगी’ असे ती फक्त म्हणत नाही, तर ती खरोखर जगते. प्रत्येक क्षण व्यक्तीने आनंदाने जगावा, प्रथम स्वतःवर, जीवनावर आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्यांवर प्रेम करावं! ‘लव यु जिंदगी’ चित्रपट देखील तेच सांगतो, असेही प्रार्थनाने सांगितले. ‘लव यु जिंदगी’ सिनेमा का बघावा? असं विचारलं असता प्रार्थना म्हणाली की, हा संपूर्ण चित्रपट कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. ज्यांना आयुष्यावर प्रेम करायचं आहे, जे आयुष्यावर आणि स्वतःवर प्रेम करतात, त्या प्रत्यकाने हा सिनेमा बघावाच, असे तिने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -