छत्रपती शासन शिवाजी नुसतेच जय

Mumbai
Chhatrapati Shasan

छत्रपती शासन या चित्रपटाच्या शीर्षकातच छत्रपती आहे म्हटल्यानंतर यात प्रत्यक्ष शिवाजी असतील असे आपल्याला वाटेल पण या चित्रपटात त्यांचे विचार मांडलेले आहेत. आजची समाजव्यवस्था आणि राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे, त्यांच्या कर्तृत्त्वाचे, मराठी अभिमानाचे, त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करतात परंतु प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे शिवाजी, शिवाजी नुसतेच जय अशी काहीशी वृत्ती माणसाची झालेली आहे. फक्त मराठी माणसानेच नाही तर प्रत्येक भारतीयाने जागे व्हायला हवे. शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, त्यांनी आखलेल्या कार्यकुशलतेचे प्रत्यक्ष राजकारभारात अनुकरण करा असे काहीसे अलीकडच्या चित्रपटातून सांगणे सुरू केलेले आहे. महेश मांजरेकर यांच्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात प्रत्यक्षात शिवाजी अवतरले होते. भीतीने ग्रासलेले, प्रतिष्ठेला जपणारे, कुटुंब-नातेसंबंध जपणार्‍या पण महत्त्वाकांक्षी असलेल्या एका मराठी माणसाला जागवण्याचा प्रयत्न या चित्रपटात झाला होता. छत्रपती शासन हा असाच काहीसा चित्रपट असून, ज्याचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी केलेले आहे. अमर हा शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारावलेला आहे. त्यांचे विचार प्रत्यक्ष गावात राबवून युवकांबरोबर गावकर्‍यांना समृद्ध करण्याचा त्याचा मानस आहे. एका जिद्दीची, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची ही कथा आहे.

शिवजयंती म्हटल्यानंतर चंगळ संस्कृती अशा कथेचा नायक अमर याची स्वत:ची संकल्पना असते. शिवाजी महाराजांचे कर्तृत्त्व अशाच वागणुकीतून चिरंतन राहील असे त्याला वाटत असते. डिजेच्या तालावर नाचणे म्हणजे कॉलेजला व्यत्यय असे कारण सांगून कॉलेजचे प्रोफेसर त्याच्या या उत्साही वागणुकीचे अडसर बनतात. शिवाजी महाराजांचे संदर्भ देऊन प्रोफेसर त्याची समजूत घालतात. पुढे त्याला प्रोफेसर स्वत: शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत हे कळते तेव्हा अमर त्यांची सर्व पुस्तके वाचून काढतो. थोडेफार शिवाजींचे विचार आजच्या कार्यप्रणालीत आणले तर समाज सुधारणा होईल याची त्याला खात्री पटते, पण रणजीतदादा हा राजकारणात प्रस्त असलेला युवक आहे. गावात त्याचा दरारा आहे. अमरला सहकार्य केल्याने आपले अस्तित्व संपुष्टात येईल अशी काहीशी त्याची समजूत होते. त्यामुळे अमर आणि रणजीतदादा या दोघांमध्ये विरोध असल्यामुळे गावचा विकास होत नाही. देवळे, पुतळे उभारावेत असे रणजीतदादाचे सांगणे असते, तर मोकळ्या जागेत गावच्या पैशातून कंपन्या उभारून विकास करावा, अशी अमरची विनंती असते. यानिमित्ताने श्रद्धा आणि महत्त्वाकांक्षा यांची वैचारिक झुंज यात पहायला मिळते. अखेर कोण जिंकतो हे चित्रपटातच पाहणे योग्य.

खुशालने दिग्दर्शनाबरोबर कथा, संवाद लेखन ही बाजू सांभाळलेली आहे. पटकथा, संवादाचे काम कमलेश भांडवलकर याने केलेले आहे. कथा उत्तम आहे जी ग्रामीण पातळीवर हाताळलेली आहे. दिग्दर्शकाला त्यातला जोश, उत्साह फारसा काही दाखवता आलेला नाही. अमरची मुख्य व्यक्तीरेखा प्रशांत मोहिते याने केलेली आहे. खरतर कथानकाची जी गरज आहे त्यातला आवेष, रोख भूमिकेतून त्याला व्यक्त करता आलेला नाही. फक्त कथेची गरज काय आहे हे तो दाखवू शकलेला आहे. रणजीतदादाची करारी भूमिका संतोष जुवेकर याने केलेली आहे. या भूमिकेच्याबाबतीत थोडा अजून विचार व्हायला हवा होता. शाब्दिक संघर्ष दिसला. कथेची गरज म्हणून भूमिकेतूनही दिसायला हवा होता. चित्रपटातली कोणती गोष्ट सर्वात जास्त भावली असेल तर ते म्हणजे किशोर कदम यांना दिलेले काव्यात्मक संवाद हे सांगता येतील. या चित्रपटातल्या गीत, संगीतापेक्षा हे काव्य अधिक प्रभावीत करणारे ठरलेले आहे. मकरंद देशपांडे यांनी प्रोफेसरची व्यक्तीरेखा त्यांच्या पद्धतीने समजून, उमजून केलेली आहे. याशिवाय या चित्रपटात अभिजित चव्हाण, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे आदींच्या भूमिका पहायला मिळतात. नंदेश उमप, रोहित नागभीडे, सचिन अवघडे यांचे संगीत या चित्रपटाला लाभलेले आहे जे चित्रपट पाहतानाच आनंद देऊ शकेल असे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here