रोहित – मानसी रॉय ‘लॉक्ड इन लव’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

rohit roy and mansi joshi roy will be seen real life couple show
रोहित आणि मानसी रॉय ‘लॉक्ड इन लव’द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या अनोख्या भूमिकांकरिता सुपरिचित असलेले रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय त्यांचा आगामी शो ‘लॉक्ड इन लव’द्वारे सर्जनशीलतेला नवीन अर्थ देण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच हा कार्यक्रम हंगामा प्ले आणि पार्टनर नेटवर्कवर स्ट्रीम होईल. हे दोन्ही कलाकार मागील २५ वर्षांपासून खऱ्या आयुष्यात नवरा-बायको असून एकत्र काम करत आहेत. त्यांनी टाळेबंदी दरम्यान या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. या शोमध्ये ५ अभिनव लघुकथांचा संग्रह असून त्यात प्रेमाच्या विविध छटा दिसणार आहेत. या शो’च्या प्रत्येक कथेत रोहित आणि मानसी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्याशिवाय, प्रत्येक लघुपटाचे दिग्दर्शन रोहितने केले आहे.

यंदा टाळेबंदीत नवीन शो ची निर्मिती करण्याविषयी रोहित रॉय म्हणाला की, “लॉकडाऊन सुरू झाल्यावर सगळे कसे होणार कोणालाच ठाऊक नव्हते. अनिश्चिततेचे सावट होते. जसे दिवस पुढे सरकू लागले आणि चर्चा सुरू केल्या. कल्पना सुचू लागल्या. बऱ्याच लोकांचा समावेश न करता कंटेट तयार होण्यास मदत झाली. या अनुभवाने आम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी दिली आणि असे वातावरण दिले ज्याचा यापूर्वी आम्ही अनुभव घेतला नव्हता. ‘लॉक्ड इन लव’ शो पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद वाटतो. या भावनिक कथा प्रेक्षकांना नक्की आवडतील ही आशा वाटते.”

स्वत:च्या अनुभवाविषयी बोलताना मानसी जोशी रॉय म्हणाली की, “प्रेक्षक दर मिनिटाला कंटेट पाहू लागले आहेत. त्यामुळे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आणि कंटेट निर्मात्यांना कायम नवनवीन कल्पना लढवायला लागत आहेत. त्यांना कल्पक मार्गांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे. ‘लॉक्ड इन लव’चे चित्रीकरण आणि निर्मिती लॉकडाऊन काळात केली आहे. या निमित्ताने रोहितने अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दोन्ही टोप्या स्वत:च्या डोक्यावर सांभाळल्या. या अशा अभिनव शो’चा एक भाग होता आल्याने मी समाधानी आहे. या कार्यक्रमामुळे मला केवळ कॅमेरासमोर येण्याची संधी मिळाली नाही, तर एक नवीन माध्यम हाताळायचे स्वातंत्र्य आणि प्रयोग करणे शक्य झाले.”


हेही वाचा – कोरोना काळातील क्रिएटिव्हिटी !