घरमनोरंजनसलील चार पावले पुढे

सलील चार पावले पुढे

Subscribe

क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक क्षेत्रात अनेक पैलू दडलेले असतात. पहिल्याच पदार्पणात सर्वच पैलूंवर प्रकाशझोत काही टाकता येत नाही. जसजसे वलय निर्माण होईल, प्रेक्षकांत विश्वासार्हता निर्माण झाली की कलाकार मुख्य पैलूबरोबर आपल्यातल्या विविध कलांचा जागर करायला लागतो. सचिन पिळगावकर, अवधूत गुप्ते, महेश मांजरेकर, प्रसाद ओक असे कितीतरी कलाकार आहेत की जे वेगळ्या हेतूने मराठी चित्रपटसृष्टीत आले आणि मुख्य कलेबरोबर अन्यही कलांचे दर्शन घडेल असे या कलाकारांनी पाहिलेले आहे. लेखन, दिग्दर्शन, निर्मिती हे त्यांचे वेगळे पैलू आहेत. आता यात संगीतकार, गायक सलील कुलकर्णी याची भर पडणार आहे. ‘वेडिंगचा सिनेमा’ या चित्रपटासाठी त्याने संगीताबरोबर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन यांची जबाबदारी स्वीकारुन आणखीन चार पावले पुढे सरकत आहे. ‘एव्हरेस्ट एन्टरटेंटमेंट’ च्या संजय छाब्रिया यांनी त्याच्यावर ती ही जबाबदारी सोपवलेली आहे. साधारण एप्रिलच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा या टीमचा मानस आहे.

सध्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झालेला आहे. ‘माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं, कोणी जेवल्यावाचून नाही जायचं’ असे काहीसे लग्नगीत या टीझरमध्ये ऐकायला मिळणार आहे. सलीलने पहिल्या पदार्पणातच जबरदस्त अशी स्टारकास्ट घेतलेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांत उत्सुकता ही अधिक वाढणार आहे. मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनिल बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कर्‍हाडे, प्राजक्ता हणमघर, योगिनी पोफळे यांचा यात कलाकार म्हणून सहभाग आहे. ऋचा इनामदार, शिवराज वायचळ ही जोडी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. विवाह सोहळ्यात अनेक गमती जमती घडतात. त्यांना विनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न यात होणार आहे. संगीतकार, गायक म्हणून सलिलने संगीताच्या क्षेत्रात नाव मिळवले असले तरी ‘अग्गोबाई, ढग्गोबाई’ या गाण्याच्या निमित्ताने चित्र शौकीनांमध्येही तो लोकप्रिय आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळतो हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच उलगडेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -