FAU-G गेमची संकल्पना सुशांतची, कंपनीने दिलं ‘हे’ उत्तर!

ज्या गेमने तरूणांना अक्षरश: वेड लावलं त्या PUBG वर भारतात बंदी आणली. PUBG बॅन झाल्यावर आता काय खेळायचं हा मोठा प्रश्न तरूणांसमोर उभा राहिला. त्यानंतर लगेचच भारतीय खेळ FAU –G ची घोषणा झाली. अभिनेता अक्षय कुमारने या FAU –G च्या लाँचची घोषणाही केली. पण या गेमची संकल्पना दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतची होती अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली. यावर आता गेम डेव्हलप करणाऱ्या कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

विशाल गोंदल आणि दयानिधी एमजी यांनी nCore या कंपनीची स्थापना २०१९ मध्ये केली. २५ हून अधिक प्रोग्रॅमर्स, डिझायनर्स, टेस्टर्स, आर्टिस्ट यांनी मिळून FAU-G हा गेम बनवला आहे. FAU-G या गेमची संकल्पना सुशांत सिंह राजपूतची होती, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र ही चर्चा पूर्णपणे खोटी आणि तथ्यहीन असल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.

तो फोटो चोरीचा?

FAU-G या गेमसाठी जो फोटो वापरण्यात आला आहे, त्यावरही चोरीचा आरोप झाला. याबद्दल कंपनीने सांगितले की, शटरस्टॉककडून अधिकृतपणे लायसन्स विकत घेऊन तो फोटो वापरला आहे.

लवकरच हा गेम लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २०% निधी हा जवानांना देण्यात येणार आहे.

अक्षय कुमारने केलं ट्विट

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी २०% निधी जवानांना देण्यात येणार आहे’ असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.