‘छपाक’ वाद; खरा व्हिलन कोण हिंदू की मुस्लिम?

Mumbai
chhapaak Acid attacker
छपाकचा व्हिलन नक्की कोण?

दीपिका पदुकोणने जेएनयू विद्यापीठात जाऊन आईशी घोषची भेट घेतल्यापासून ती चांगलीच ट्रोल होतेय. एवढंच काय तर तिच्या छपाक या चित्रपटाला सुद्धा ट्रोल करण्यात येत आहे. लश्मी अग्रवालवर अॅसिड फेकणाऱ्या तरुणाचे नाव नईम होते, मात्र चित्रपटात आरोपीचे नाव राजेश दाखविण्यात आल्याचा आरोप सोशल मीडियावर होत आहे. बॉलिवडचे कलाकार मुस्लिम धार्जिणे असल्याचाही आरोप काही लोक करत आहेत. या सर्व वादावर चित्रपटाच्या टीमपैकी अद्याप कुणी बोलले नाही. मात्र चित्रपट ज्यांनी बघितला त्यांचे काय म्हणणे आहे ते पाहुया.

दोन दिवसांपूर्वीच ट्विटरवर नईम खान आणि राजेश ही नावे ट्रेडिंगमध्ये होती. छपाकच्या दिग्दर्शकांनी नईम नाव बदलून हिंदू मुलाचे नाव आरोपीला दिल्यामुळे अनेकजण संतप्त झाले होते. खरंतर एका मासिकात छापून आलेल्या बातमी नंतर हा वाद सुरु झाला. त्या मासिकाने चित्रपटात नईमचे नाव बदलून राजेश ठेवला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर यावर वादंग निर्माण झालं.

२००५ साली दिल्लीच्या खान मार्केट येथे लक्ष्मी अग्रवालवर नईम खान उर्फ गुड्डू नावाच्या युवकाने अॅसिड फेकले होते. दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयात तसा उल्लेखही आपल्याला पाहायला मिळतो. मात्र ट्विटरवर नईम खानच्या जागी त्याच्या नावाचा अपभ्रंश होऊन नदीम खान असा ट्रेंड निर्माण झाला होता.

 

खरं काय आहे?

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार छपाक चित्रपटात ना नईम खान आहे, ना लक्ष्मी अग्रवाल. चित्रपटात सर्वांचीच नावे बदलण्यात आली आहेत. लक्ष्मीचे नाव मालती तर नईमचे नाव बशीर खान उर्फ बब्बू असे ठेवले गेले आहे. चित्रपटात ज्या राजेशच्या नावावरुन वादंग निर्माण झाले तो मालतीचा मित्र दाखविण्यात आला आहे.

खरंतर दीपिकाने जेएनयूच्या बाबतीत जी भूमिका घेतली ती हिंदुत्ववाद्यांना रुचलेली नाही. त्यातूनच अफवा पसरवून चित्रपटासोबत दीपिकाची बदनामी करण्यात आली. जेणेकरुन चित्रपटाचे नुकसान करण्यात येईल.