घरफिचर्ससगळ्याच पंखांना बळ हवंय

सगळ्याच पंखांना बळ हवंय

Subscribe

अमूक एक म्हणजे स्त्री, तमूक एक म्हणजे पुरुष ह्या पलीकडे जाता येणं गरजेचं. बाईने हळुवार हसावं, मोठयाने हसू नये, पाय पसरून बसू नये, पुरुषाने रांगडं असावं, बाईला दुःख झालं की डोळ्याला पदर लावावा पण पुरुषाने मात्र चुकून सुद्धा रडता कामा नये,पुरुषाने मला भीती वाटते आहे असं म्हणणं पाप आणि बाईने सतत भिऊन राहायचं.. कोण काय म्हणेल.. कोण काय करेल.. बाईने स्वयंपाक करायचा, दुरुस्तीची कामं पुरुषांनी करायची.. एक अन अनेक बायकी आणि मर्दानी असण्याच्या चौकटी.

लिंगभेद हा आजच्या काळातही फार कळीचा मुद्दा ठरतो आहे, ह्याचं मला राहून राहून आश्चर्य वाटत आलं आहे. जरा विचार करून पाहिलं तर अगदी कोणतीही गोष्ट करताना,प्रतिक्रिया देताना,मत बनवताना,विचार मांडताना अगदी साधं बघताना,वागताना सगळ्यात पहिले आपण एखादी गोष्ट नोटीस करतो किंवा आपल्या डोक्यात सतत पार्श्वभूमीवर असते ती म्हणजे जेंडर.. आपलं आणि समोरच्या व्यक्तीचं. बाई – पुरुष हे दोन ढोबळ जेंडर विचारात घेतले तरीही त्यात नॉन बायनरी हा ग्रुप सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. LGBTQ मुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, पण या दोन जेंडर पलीकडे सुद्धा काही असतं आणि त्यांना सुद्धा एक व्यक्ती म्हणून जगायचा अधिकार आहे हे विचारात घेतलं जात आहे. जेंडर आणि जेंडर आयडेंटिटी, सेक्शुअल ओरिएंटेशन असे फार महत्वाचे आणि दुर्लक्षित मुद्दे आहेतच.

तर ह्या सदरामध्ये एकूणच जेंडर ह्या मुद्द्याभोवती फिरणार्‍या वेगवेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. एक स्त्री हे लिहिणार म्हणजे बायकांचा पुळका येऊन फक्त बाईवर कसे अन्याय होतात आणि समस्त पुरुषवर्ग आणि समाज कसा अपराधी आहे असा (गैर)समज करून घेऊ नका. मी जे वर म्हटलं ना की सगळ्यात आधी आपण कोणती गोष्ट लक्षात घेतो आणि मत बनवतो तर ते म्हणजे जेंडर ते ह्याचसाठी. ह्या सदरामध्ये पुरुषांवर होणारे अन्याय, एकाच चष्म्यातून त्यांना सतत बघितलं जाणं, विचारी आणि संवेदनशील पुरुषांची होणारी घुसमट आणि चौकटीत बसवू पाहणारा समाज ह्यावरही आपण चर्चा करणार आहोतच. साधारण २०१५ साली झारा ह्या फॅशन ब्रँडने अनजेंडर्ड (Ungendered )अशी एक क्लोदिंग लाईन सुरू केली होती. जेंडर पलीकडे जाऊन आपण बघू शकतो का असा विचार मनात येऊन गेला. लिंगभेद न मानता केलेला विचार.

- Advertisement -

Ungendered ह्या शब्दाला आपण मराठीत लिंग निरपेक्षता असा शब्द वापरू शकतो. लिंग समानता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुळात दोन भिन्न लिंगांमध्ये आपण नकळत का होईना पण फरक करतोच. आता या वर असा युक्तिवाद होऊ शकतो की लिंग वेगवेगळी असताना ती न मानणं जास्त नैसर्गिक की लिंग भिन्न आहेत पण त्यात समानता असली पाहिजे हे मानणं जास्त योग्य? लिंग भिन्न असणं ही एक अनाटॉमीकल आस्पेक्ट आहे आणि त्या गोष्टीकडे तसेच बघणं मला जास्त योग्य वाटतं. समानता हा शब्द जिथे येतो तिथे मुळात दोन गोष्टींमध्ये काहीतरी वेगळं आहे हे गृहीत धरलेलं असतं अगदी नकळत आणि मग कोणत्या मु्द्यांवर समानता आणायची हे व्यक्तिगणिक बदलत जातं. जेंडर आयडेंटिटी,सेक्स असाईनमेंट आणि जेंडरशी निगडित कितीतरी गोष्टी जेव्हा आपण सोशोलॉजीचा अभ्यास करतो,वेगवेगळ्या जेंडर थिअरीस्टचे संशोधनपर निबंध वाचतो तेव्हा लक्षात येतात.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) जेंडर आणि सेक्स ह्या दोन गोष्टींची व्याख्या वेगवेगळी केली आहे. सेक्स म्हणजे जैविक आणि शारीरिक वैशिट्ये जे पुरुष आणि स्त्री म्हणून अधोरेखित करतं. जेंडरची जी संज्ञा केली आहे ती अशी- समाजात वावरत असताना वागण्यातून- बोलण्यातून, कामातून एका विशिष्ट प्रकारची वागणूक समाजाने अपेक्षित धरलेली असते. स्त्री आणि पुरुषाने या सामाजिक भूमिकेला अनुसरून साजेसं वागणं किंवा समाजाने आखून दिलेली ही भूमिका म्हणजे जेंडर.

- Advertisement -

म्हणून आता विचार करायचा झाल्यास एखाद्या व्यक्तीचं सेक्स शरीरशास्त्र, जेनेटिक्स ( एक्स आणि एक्सवाय क्रोमोझोम) ह्यावरून ठरतं . ह्यापलीकडे जाऊन लिंग म्हणजे पुरुष आणि बाईने जर समाजाने ठरवून दिलेल्या चौकटीनुसार सुयोग्य वर्तन करणं असं आपण मानलं तर प्रत्येक समाजाच्या ह्या चौकटी वेगळ्या असणार. एखादा समाज बाईला बुरख्यात बंदिस्त करू पाहील, दुसरा तिला हवं ते घालायचं स्वातंत्र्य देईल पण दुसरी एखादी गोष्ट करू देण्यावर गदा आणेल. एकूण काय लिंग समानतेचा पाया हा प्रत्येक समाजासाठी वेगवेगळा असेल आणि म्हणूनच लिंगाच्या पलीकडे जाऊन लिंग निरपेक्ष राहून विचार करता येणं जास्त महत्वाचं वाटतं.

शारीरिक, भावनिक फरक असणारच. पण अमुक एक म्हणजे स्त्री, तमुक एक म्हणजे पुरुष ह्या पलीकडे जाता येणं गरजेचं. बाईने हळुवार हसावं, मोठयाने हसू नये, पाय पसरून बसू नये, पुरुषाने रांगडं असावं, बाईला दुःख झालं की डोळ्याला पदर लावावा पण पुरुषाने मात्र चुकून सुद्धा रडता कामा नये,पुरुषाने मला भीती वाटते आहे असं म्हणणं पाप आणि बाईने सतत भिऊन राहायचं.. कोण काय म्हणेल.. कोण काय करेल.. बाईने स्वयंपाक करायचा, दुरुस्तीची कामं पुरुषांनी करायची.. एक अन अनेक बायकी आणि मर्दानी असण्याच्या चौकटी.

ह्या सगळ्यातून बाहेर पडून सगळ्यांनाच एक व्यक्ती म्हणून बघण्याची गरज आहे. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रश्नांना, आवाहनांना सामोरा जात आहे. सगळ्याच पंखांना बळ हवंय, सहृदयता हवी आहे, ऐकून घेणारं हवं आहे, साथ देणारं हवं आहे. कित्येकदा आपल्याला कोणीतरी समजावून घेतं आहे असं नुसतं वाटणं सुद्धा सुखावून जातं. जगण्याकडे जरा वेगळ्या अँगलने बघूया. जाणिवा , नेणिवा, अनुकंपा, एम्पथी,कळवळा या हरवत चाललेल्या भावनांना पुन्हा एकदा आयुष्यात स्थान देऊया. जाता जाता तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ज्यामध्ये माणसाला फक्त एक माणूस म्हणून पाहा हे ते सांगू बघत आहेत.

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ॥१॥
ऐका जी तुम्ही भक्त भागवत । कराल ते हित सत्य करा ॥२॥
कोणाही जीवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥४॥
वेगवेगळे विषय घेऊन मी तुम्हा सर्वांना भेटत राहीनच इथे. तुम्ही देखील ह्या थीमशी संबंधित विषय मला सुचवू शकता. शक्य झाल्यास त्यावर लिहायला आवडेल मला. मी येते आहे तुमच्या भेटीला ..नवीन विषयांसकट, नवीन दृष्टीकोनासोबत आणि नवीन विचारांसमवेत. भेटूया!


-सानिया भालेराव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -