घरफिचर्स'क्रांती' शब्दाचा विपर्यास होतोय!

‘क्रांती’ शब्दाचा विपर्यास होतोय!

Subscribe

असलेलं घर पाडून नव्याने सोईचं बांधणं ही झाली क्रांती. आणि घर आहे तसंच ठेवत फक्त घरमालक बदलणं हे झालं सत्तांतर. आत्ता क्रांतीच्या नावाखाली फक्त घरमालक बदलणं सुरू आहे.

आज अवतीभोवती पाहतो तेव्हा दिसतं, की सगळीकडे घसरण सुरू आहे. त्यामुळे त्याला शब्द, शब्दांचे अर्थ हे तरी कसे अपवाद असू शकतील? सध्या शब्दांना पोकळ केलं जातं, किंवा त्यात हवा भरली जाते. तिसरं असंही, की त्यांचा विपर्यास केला जातो.  ‘कार्यकर्ता’ शब्दाचंही तसंच आहे. पूर्वी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता असायचा. आता सर्रास कुणीही कार्यकर्ता असतो. ‘नेता’ हाही शब्द तसाच झालाय. आजचा नेता काही अपवाद वगळता बदमाशच आहे.

शब्द तिरकसपणे अघळपघळ वापरले जातात. शेतकरी शब्दही असाच झालाय. आपण ऐकतो शरद पवार, फडणवीस हेही शेतकरीच! त्यांनी बोलताना तशी वक्तव्ये केलेली आहेत. हे कसे काय? आरक्षणासाठी कुणी जीव देतो तेव्हा तो शहीद असतो. मात्र शेतकरी जीवन संपवतो तेव्हा शहीद का म्हणवला जात नाही? एखादी विवाहित तरुणी आत्महत्या करते तेव्हा तो हुंडाबळी असतो. त्यावर आक्षेप नाही. मात्र शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा तो ‘कर्जबळी किंवा व्यवस्थाबळी’ नसतो. ती आत्महत्या असते. असं का?

- Advertisement -

आमच्या पिढीला क्रांतीची ओढ लागली ती स्वातंत्र्यानंतर! मी जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत सक्रिय होतो. जेपींनी संपूर्ण क्रांती असा शब्द वापरला. कारण क्रांती शब्दाचा सहज विपर्यास होतो. आज तेच दिसतं आहे.

जेपींना ‘संपूर्ण क्रांती’ असा शब्द का वापरावा वाटला? तर, क्रांती म्हणजे सत्तापरिवर्तन असाच आजवर अर्थ घेतला गेला. असलेलं घर पाडून नव्याने सोईचं बांधणं ही झाली क्रांती. आणि घर आहे तसंच ठेवत फक्त घरमालक बदलणं हे झालं सत्तांतर. आत्ता क्रांतीच्या नावाखाली फक्त घरमालक बदलणं सुरू आहे!

- Advertisement -

खरी क्रांती काय असते? तर तिची तीन लक्षणं सांगता येतील. पहिलं, क्रांतीत व्यवस्था बदलते. त्यात राज्यसत्तेसह सर्व गोष्टी येतात. दुसरं लक्षण, अवधारणांचा बदल. धारणा बदलणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. नेमके तिच्याकडेच आपण दुर्लक्ष करतो. तिसरं म्हणजे, स्वातंत्र्याचा विस्तार होतो.  हे तीन घटक ज्यात आहेत त्याला क्रांती म्हंटलं जातं, जावं.  हिंदीत एक खूप सुरेख शब्दप्रयोग आहे त्यासाठी. ‘आमूलचूल’. आतबाहेर संपूर्ण बदल असा त्याचा अर्थ आहे.
क्रांतिकारक हा शब्दही असाच क्लिशे झालाय. स्वत:च्या धारणा ज्याने बदलल्या तो क्रांतिकारक! क्रांतिकारक स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात मूल्यभान आणायचा प्रयत्न सतत करतो. स्वत:च उत्सफूर्तपणे अधिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करा, माणूसपणाकडे जा! झुंडींना ‘क्रांती’ म्हणाल तर ते फक्त लेबलिंग आहे. कारण त्याच्यातून कोणती व्यवस्था समग्र बदलते? झुंडींना क्रांतीच नाव नको द्यायला. तो प्रकार म्हणजे इव्हेन्ट मार्केटिंगसाठी पॉप्युलर लेबलिंग करणे आहे. या सगळ्यात क्रांतीची चाहूलही मला दिसत नाहीय.


– अमर हबीब 

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -