घरफिचर्सबदलती मुंबई

बदलती मुंबई

Subscribe

मुंबई मेरी जान...सपनो कि दुनिया. जो इस शहर में एक बार आता है वो यही का हो जाता है...हे वाक्य वाचायला जरी फिल्मी वाटत असलं तरी ते तितकचं सोळा आणे खरं आहे. ही मुंबई आहेस तशी. सगळ्यांना लळा लावणारी. आपल्या कवेत घेणारी. अगदी तिच्या अवती भोवती पसरलेल्या विस्तीर्ण अरबी समुद्रासारखी. सात बेटांवर वसलेलं हे शहर तस कोळी बांधवांनी वसवल्याचे ऐकलय आणि कुठतरी वाचलय. नंतर वेगवेगळ्या राज्यातील नागरिकांनी मुंबईतच घर थाटली. यात कुणी व्यापारी होते तर कोणी व्यावसायिक. इराण्याची हॉटेल्स तेथे मिळणारा बनमस्का ही तर मुंबईची खास ओळख होती म्हणे एका काळाची. सगळेच जण येथे गुण्यागोविंदाने राहायचे. गर्दीचा किचाट नव्हता. मुंबई आणि मुंबईकर मोकळा श्वास घ्यायचे. सरकारी नोकर्‍याही सहज मिळायच्या. खासगी नोकर्‍याही सहज उपलब्ध व्हायच्या. महागाई नव्हती. त्यामुळे कमावलेल्यातूनही उरायचं. मुंबईकर तसा खाऊन पिऊन सुखी होता. मराठी सण दणक्यात पारंपारिक पद्धतीने साजरी व्हायचे. महिन्यातील ठराविक दिवशी मुंबईतील रस्ते धुतले जायचे. अगदी आपण घर धुतो ना तसे. घासून पुसुन. पण त्याच रस्त्यांवर आता दिसते खड्ड्याचे साम्राज्य. तर कुठे भिंतीवर दिसतात पान थुंकुन मारलेल्या पिचकार्‍या. कारण काळ बदलला तशी मुंबई श्रीमंत झाली. आजूबाजूवाल्यांची गर्दी वाढली. गर्दीत तिचा मराठी बाणा कुठेतरी दबला गेलाय. शिस्तीत राहणार्‍या मराठी माणसांच्या वाडीत आता शेठ लोकांची एन्ट्री झाली आणि माझी मराठी मुंबई कॉस्मोपोलिटीयन झाली.

 काळाच्या ओघात सगळं बदललं. विविध व्यवसायांबरोबरच येथे बॉलीवूडही बहरू लागले. नोकरी व बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळण्याच्या आशेने मुंबईत येणाऱे लोंढे वाढले आणि ऐसपैस मुंबई गुदमरायला लागलीय . आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यूयॉर्क नंतर सगळ्यात महागडे शहर, इकॉनॉमिक हब म्हणून मुंबई नावारुपास आली आणि माझी मुंबई तेथेच महागली. विविध व्यवसायांबरोबरच त्यांची कार्यालयही येथे थाटली गेली. यामुळे नोकरी मिळवणार्‍यांबरोबरच बॉलीवूडमध्ये नशिब आजमावण्यासाठी मुंबईत येणार्‍यांची संख्याही वाढली. यात कित्येक श्रीमंत झाले तर कित्येक भिकेसही लागले.

कारण मुंबई ही आम्हा मराठी माणसांप्रमाणे कष्टकर्‍यांची आहे. कष्ट येते वाया जात नाहीत. तुमच्या कष्टाला येथे किंमत असते. म्हणूनच म्हणतात मुंबई ही कष्टकर्‍यांची नाही आळशी व्यक्तींची. या कष्टातूनच अनेकजण घडले आणि आपलं गणगोत गावी सोडून मुंबईकर झालेत. या यादीत अनेक नावेही आहेत. पण असे असले तरी मुंबईकर मात्र ते नावापुरतेच झालेत. या शहरात राहणे हे स्टेटस सिम्बॉल आहे. यामुळे काहीजण आपलं स्टँडर्ड जपण्यासाठीही या शहरात राहतात.

- Advertisement -

त्यांची नाळ मात्र कधी या शहराशी जुळत नाही. फक्त पैसा आणि फेम यासाठी त्यांना मुंबई हवी आहे. अशी अनेकजण मुंबईकर असल्याचे कातडे पांघरुन समाजात टेंभा मिरवताना दिसतात. पण मुंबईच्या संस्कृतीला मात्र ते कधीच आपले मानत नाही. तर काहीजण असेही आहेत कि मुंबईने भरभरून दिल्याने ते तिच्या प्रेमात पडले आहेत. जिना यहा मरना यहा याच टिमक्यात ते वावरताना दिसतात. पण तरीही मुंबईचं मराठीपण त्यांना आपलं वाटत नाही. पण मुंबई मात्र आवडते. कारण समाजात मिरवण्यासाठी आवश्यक असलेला पैसा आणि प्रसिद्धी याच मुंबईने दिलेली आहे. तेवढेच काय ते त्यांच नातं. त्यामुळे पूर्वीच्या मुंबईकरांसारखं मुंबईतील स्वच्छता, तिची संस्कृती याबद्दल त्यांना सोयरसुतक नाही. फक्त राहायचं. पैसा कमवायचा. मावा, पानं नाहीतर गुटखा खाऊन येथे तिथे पिचकार्‍या मारायच्या, हातातला कागदाचा पुडा , प्लास्टीकची पिशवी, रस्त्यालगतच्या कचरा पेटीत न टाकता जवळच्या गटारात फेकायची मग परत आपल्या गल्ल्यावर जाऊन बसायच.

कारण मुंबई म्हणजे काही घर नाही कि ती लख्ख आणि स्वच्छ ठेवायला हवी. तर ते दुसर शहर आहे. पैसा गोळा करायचा आणि आपले दिवस ढकलायचे हेच यांच मुंबईबरोबरच नातं. यामुळे मुंबईच आधीच देखण रुप जाऊन आता तिची लया गेली आहे. माझी मुंबई आता थकली आहे . कारण तिचा विस्तार तर कधी झालाच नाही. पण गर्दी मात्र विस्तारत गेली आहे. क्षमतेपेक्षा जास्त माणसांचा भार वाहतानाच कचर्‍याचे ढिगांचे डोंगर तिच्या छातीवर जमू लागले आहेत. म्हणूनच माझी जन्मभूमी मुंबई संथावली आहे. तिलाही आता थंडी वाजते. पावसाळ्यात तीही छातीभर पाण्यात बुडते. वाढत्या प्रदूषणाने तीही तुमच्या माझ्यासारखी गुदमरते. पण कोणाला त्याची फिकीर नाही. कुठेतरी तिलाही हवा आहे मोकळा श्वास. मोकळा श्वास घ्यायला आता मोकळ्या जमिनीही उरल्या नाहीत. यामुळे टुमदार बंगले व घरांच्या जागी आता टोलेजंग टॉवर आणि मॉल्स उभे राहीलेत.

- Advertisement -

हे एवढं कमी की काय गेल्या काही वर्षांपासून दहशतवादी मुंबईच्या डोक्यावर येऊन बसला. कधी कुठे काय होईल माहीत नाही. मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या ट्रेनमधल्या प्रवासात कोणाची कुठल्या क्षणी शकलं उडतील सांगता येत नाही. पण तरीही मुंबई तिच्यातल्या स्पिरिटवर धावतेय. आता त्यात नाईट लाईफची भर पडलीय म्हणजे कधीही न झोपणारी मुंबई आता नव्याने धावणार आहे आणि धावतच राहणार आहे. मुंबईकरासाठी आपल्या जीवाची मुंबई करत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -