घरफिचर्सन-नाव नातं

न-नाव नातं

Subscribe

जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो; पण ते शक्य असतं का? आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का? सारं काही एका नात्यात शोधायला जातो. ते नाही मिळालं की, निराश होत जातो. विवाहित जोडीदारापलिकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. दरवेळी ती लफडीच आहेत असं का मानावं?

काल एका मित्राला फोन केला होता. गप्पांमध्ये मैत्री, नातेसंबंध असं काहीकाही बोलत असताना तो अगदी सहज म्हणाला, मला ना मित्र म्हणजे काऊन्सलर वाटतात. बघ ना, आपण त्यांना काय काय सांगतो आणि ते काय काय ऐकून घेतात. आपल्याला जे म्हणायचं आहे ते तसंच्या तसं पोहचत नसेल ही. कदाचित त्यांच्या आकलन अंदाजानुसार ते त्या गोष्टी ऐकत राहतात. आपली काही अडचण असेल तर प्रत्येकवेळी ते उत्तर शोधायला मदत करतातच असंही नव्हे. पण नुसतं आपलं ऐकून घेतल्यानंतरही आपण किती मोकळे होतो. भाव-भावनांचा निचरा झाल्यासारखं वाटतं. ‘व्हॉट अ रिलीफ’ ही टर्म आपण प्रत्यक्ष अनुभवतो. त्या अर्थी प्रत्येक मित्र-मैत्रिणी हे काऊन्सलरच असतात.

असं मनातला निचरा होऊ द्यावं असा ज्यांच्या आयुष्यात माणूस नसेल त्यांची काय घालमेल होत असेल. किती साठत असेल आणि मग ते काय करत असतील याचं, कसं डील करत असतील अशा अव्यक्ताला असा एक प्रश्न पडतो मला. काही वेळा मला सांगावंसं वाटतं त्यांना सांग, मला सांग. मनातल्या मनात विचार करत किती कुढशील? बोल एकदाचा आणि मोकळा हो. मैत्रीच्या या अर्थी एकाकी असणारी माणसं साहजिकच व्हल्नरेबल होतात. ती शोधत राहतात आपलं असं ऐकणारं माणूस. बघ ना, आपल्याला खरोखरच मोकळं व्हावं असे किती मैतर असतात. मोजकीच असतात. त्या पलिकडच्या माणसांना खरं तर आपण परिचित, ओळखीचा म्हणायला हवं ना, पण तसं म्हणत नाही. उलट आपण किती मोघमपणे किंवा सरसकटपणे मित्र-मैत्रीण म्हणून मोकळे होतो.

- Advertisement -

काही वेळा आपल्या अगदी जवळच्या नात्यातही ही मोकळीक मिळत नाही. अगदी नवरा-बायकोच्याही. लग्नानंतरच्या काही काळात लक्षात येतं की, आपल्या आवडीनिवडी किंवा आपला साधा संवाद हा आपण आपल्या जोडीदाराशी करू शकत नाहीयेत. न बोलता येण्याची, न सांगता येण्याची ही भूक मग कशी भागवायची? नवरा बायकोत काही बिनसलेलं नाहीये, पण संवादाच्या या जागा नाहीयेत, मग काय करायचं? साहजिकच आपण आपल्या जोडीदारापलिकडंही अशी माणसं शोधू लागतो. ज्यांच्यासमवेत आपला संवाद होऊ शकतो. आपलं बोललेलं ऐकणारं आणि समजून घेणारं अशी कोणीतरी व्यक्ती हवी असते. विवाहित असल्यास ही जागा केवळ नवरा-बायकोतच मर्यादित असावी असं मानणं किती चुकीचं आहे. स्त्री-पुरुषांच्या नात्यांचा विचार वासनेच्या पलिकडं करता यायला हवा. मोकळ्या-ढाकळ्या पद्धतीनं नैसर्गिकरित्या एकमेकांशी शेअरिंग करणारं हे नातं तर मैत्रीच्याही पलिकडचं असेल. आपण उगीच अशा सगळ्या गोष्टींचा बाऊ करतो. त्याची अशी अखंड बडबड सुरू होती.

खरंतर, तो हे सर्व सांगत होता तेव्हा मला ‘डिअर जिंदगी’ चित्रपट आठवत होता. या चित्रपटात छोटे-छोटे असे अनेक घटक आहेत की जे आपल्याला आनंद देऊन जातात. याच चित्रपटात काऊन्सिलिंगच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलेली कायरा म्हणजेच आलिया भट शाहरूख खानला विचारते, इज देअर सच थिंग अ‍ॅज अ परफेक्ट रिलेशनशिप? एक स्पेशल रिश्ता? हा प्रश्न खूप मोलाचा आहे आणि यावरचं शाहरूख खानचं उत्तरही तितकंच महत्त्वाचं. तो म्हणतो, का? असं एकच स्पेशल नातं का असावं? अलग अलग एहसासों के लिए अलग अलग स्पेशल रिश्ते क्यों नही हो सकते? एखाद्यासोबत स्पेशल म्युजिकल नातं, एखाद्यासोबत केवळ आवडीचा फक्कड चहा-कॉफी पिण्यापुरतंच नातं, एखाद्यासोबत गॉसिप करण्यासाठीचं नातं. एखादं बौद्धिक नातं, ज्याच्याशी पुस्तकी गप्पा मारता येऊ शकतात. या सगळ्यांपैकी एक रोमॅन्टीकवालं नातं असतं. पण आपण या रोमॅन्टीक नात्यावर इतर सर्व नात्यांचं, अपेक्षांचं ओझं टाकतो. त्याच एका नात्याकडून सर्वप्रकारची पूर्तता का बरं अपेक्षित करतो? असं करणं म्हणजे रोमॅन्टीक नात्यावर अन्याय करण्यासारखंच की. किती महत्त्वाची गोष्ट आहे ही. आपल्या वेगवेगळ्या भावना आणि वेगवेगळ्या आवडींसाठी वेगवेगळी विशेष नाती असू शकतात. जसा माझा मित्र सांगत होता की, मित्र-मैत्रिणी काऊन्सलर असतात. म्हणजे डिअर जिंदगीतील स्पेशल नाती म्हणजे मित्राच्या व्याख्येनुसार स्पेसिफिक काऊन्सलरच की.

- Advertisement -

किती गंमतीदार आहे ना, जोडीदार निवडतानाही आपल्या सर्व भावनांसाठी एकच व्यक्ती हवी असा अनेकांचा अट्टाहास असतो; पण ते शक्य असतं का? आपण तरी आपल्या जोडीदाराच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू शकणारे असतो का? सारं काही एका नात्यात शोधायला जातो. ते नाही मिळालं की, निराश होत जातो. विवाहित जोडीदारापलिकडे अशी स्पेशल नाती असू शकतातच. दरवेळी ती लफडीच आहेत असं का मानावं? पण मग अशा नात्याला काय म्हणायचं? मैत्री? प्रेम? मैत्री-प्रेमाच्या अधेमधे? मैत्री-प्रेमाच्या पलिकडे? नाही माहीत काय म्हणायचं.
मित्र जसा म्हणाला, स्त्री-पुरुषांच्या नात्यात नेहमी वासनाच असते असं नाही गं.

हे अगदी बरोबर आहे, आपण स्त्री-पुरुषांच्या नात्यांमध्ये अशी वासनाच शोधत असतो. त्यात त्या पलिकडं काहीतरी असेल याचा विचार करण्यात खुजेपणा दाखवतो. नाही का? शरीर ओढ आणि त्याचे संदर्भ आणि एकूणात त्याची गरज नाहीये; पण आपलं मन जाणणार, रमवणारं कोणी सोबतीला असणं हे भिन्न आहेत हे आजही आपल्याला का कळू नये?

मागे एकदा एका मैत्रिणीने, अशाच रितीचं एखादं बॉण्डींग शेअर करत असणार्‍या ऑफिसमधल्या दोन सहकार्‍यांवर कमेन्ट केली होती. बघ, रोमिओ ज्युलिएट येताहेत. मी चकित होऊन तिच्याकडे पाहिलं. तेव्हा ती म्हणाली, हे मी नाही म्हणतेय. अख्खं ऑफिस म्हणत आहे. स्वत: विचारांनी बर्‍यापैकी मोकळी असणार्‍या या मैत्रिणीकडून अशी कमेंट ऐकून कसंसच झालेलं. त्यावेळेसच्या धांदलीत तिला काही सांगता आलं नाही. पण तेव्हाही माझ्या मनात हे आलं होतं की, ‘पण तुही कोणाची अशी खास मैत्रीण असशील तर इतरांनी काय म्हणावं तुला?’ असो. डिअर जिंदगी बघ म्हणून सल्ला द्यायला हवा तिला. नाहीतर मग तिच्या आयुष्यात माझ्या मित्रासारखा काऊन्सलर तरी यायला हवा. जेणेकरून वेगवेगळ्या नात्यांना, वेगवेगळ्या भावनांना वेगवेगळे अर्थ असतात याचा उलगडा तरी होईल…!! what say!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -