घरफिचर्सराऊतांना रोखा !

राऊतांना रोखा !

Subscribe

प्रसिद्धी आणि सत्ता यांची नशा कुठल्याही अमली पदार्थापेक्षा भयंकर असते. एकदा ही नशा चढली म्हणजे माणसे बेताल होतात. नको ते बोलतात आणि वाद ओढावून घेतात, असा इतिहास आहे. सध्या सत्तेबरोबरच दूरचित्रवाहिन्यांवरून मिळणारी वारेमाप प्रसिद्धी यामुळे कुणीही चेकाळून जाण्याचा धोका अधिक असतो. वर्षानुवर्षे सामना चालवणारे खासदार संजय राऊत यांची वागण्या-बोलण्याची शैली म्हणजे जणू स्वत:ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समजण्यासारखीच आहे. त्यातच २०१४ मध्ये अपमानीत झालेल्या शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्याची संधी मिळवून देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवून दिल्याने राऊत जमिनीपासून दशांगुले चालणे साहजिक आहे. मात्र, त्यांनी सिंहासनावर बसवलेला राजा हा स्वयंभू नाही. तर, दुसर्‍यांच्या कुबड्यांचा त्या खुर्चीला आधार आहे, याचे भान राऊत यांना राहिलेले दिसत नाही. यामुळे भाजपला पाठिंबा देताना त्याची किंमत वसूल करायची म्हणून भाजपच्या कुठल्याही नेत्याविरोधात काहीही बोलले म्हणून एक शब्दही माघारी न घेण्याची सवय लागलेल्या राऊत यांना या दुसर्‍याच्या कुबड्या घेतल्यानंतर बिनधास्त बोलण्याचे स्वातंत्र्य उरत नाही, याचे भान उरले नाही आणि त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, छत्रपती शिवरायांचे वंशज या विषयावर बेताल वक्तव्य करून स्वत: व पक्षासमोरील अडचणी ओढावून घेतल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चा वेळी ‘सामना’मधील व्यंगचित्रामुळे शिवसेना अडचणीत आल्यानंतर आता कुठे त्याचे परिमार्जन होत असताना राऊत यांनी पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढण्यासाठी शिवसेना विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे, असे म्हणावे लागेल. सत्तेचे गणित जुळते न जुळते आणि खातेवाटप होते न होते तोच राऊत यांनी पुन्हा एकदा तोंडपट्टा चालू केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी ही ‘अनैसर्गिक’ युती कधीही तुटण्याची भयचिंता याच पक्षाच्या ज्येष्ठांना डाचत असताना संजय राऊत यांची वक्तव्य शिवसेनेच्या अडचणी वाढवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज यांच्याविषयी अनावश्यकरित्या वक्तव्य करून राऊत नवा वाद उभा करू पाहत आहेत. मुळात ज्या शिवसेनेचा जन्म शिवाजी महाराजांच्या तत्वांना, विचारांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला समोर ठेवून झाला त्याच सेनेतून शिवाजी महाराजांच्या वंशजांना डिवचणे हे कट्टर शिवसैनिकांनाही रुचताना दिसत नाही. अर्थातच उदयनराजे, शिवेंद्रराजे असो वा संभाजीराजे या तिघांनीही भारतीय जनता पक्षात घरोबा केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राऊत गमावताना दिसत नाही. मात्र, हे करताना राऊत यांची जीभ नेहमीच घसरते आणि नवा वाद उभा राहतो. महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी हे आणि यांसारख्या असंख्य ज्वलंत समस्या देश आणि राज्यासमोर आ वासून उभ्या असताना आपण अजूनही इतिहासाचे ऑपरेशन करण्यातच मश्गुल आहोत. मूळ मुद्यांकडे जनतेचे लक्ष जाऊ नये म्हणून की काय अशा प्रकारचे बेताल वक्तव्य केली जातात अशीही शंका उपस्थित केली जाते. भविष्यात मिरवता येईल असे काही वर्तमानात हाती लागत नसेल तर काही माणसे अशा पद्धतीने इतिहासात आधार शोधू लागतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यावरून आपल्याकडे सध्या जो काही धुरळा उडताना दिसतो तो या सत्याचे प्रतीक मानता येईल. त्यातूनच मग अशा अनावश्यक मुद्यांना उकळी फोडली जाते. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी एका पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानंतर या वादाला प्रारंभ झाला. संवेदनशील असलेली माणसं भगवान गोयल कोण आहेत आणि त्यांनी आधी केलेले ‘उद्योग’ काय आहेत याचा विचार न करता प्रतिक्रिया देऊन मोकळे झालेत. त्यामुळे गोयलांचे इप्सित साध्य झाले. राजकीय दृष्टीकोनातून या घटनेकडे बघितले तर त्यातून भाजपची प्रतिमा डागळल्याचेच लक्षात येते. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपच्या विरोधातील पक्षांतील नेत्यांनी तोंडावर बोट ठेवणे उचित होते. मात्र, तसे न करता राऊत यांनी या वादातून नवा वाद उकरून काढला आणि भाजपवर आलेले बलांड हे रोखले गेले. उदयनराजे भोसले यांनी त्यांची भूमिका त्यांच्याच ‘स्टाईल’ने मांडली. कधी नव्हे ते उदयनराजे मुद्देसुद पद्धतीने बोलतानाही दिसत होते.शिवसेनेविषयी त्यांनी केलेली वक्तव्य खोडून काढता आली असती. मात्र, उदयनराजांनाच आव्हान देत स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणार्‍यांनी पुरावे द्यावेत असे आव्हान करून राऊतांनी ‘आ बैल मुझे मार’ची प्रचिती दिली आहे. उदयनराजेंच्या पराभवामुळे अस्वस्थ झालेल्या त्यांच्या समर्थकांना आता निमित्तच मिळालेले आहे. त्यामुळे त्यांनी सातारा बंदची हाक दिली. ठिकठिकाणी राऊतांच्या प्रतिकृतींना जोडे मारले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राऊतांनी संभाजीराजे भोसले यांनाही डिवचले होते. गोयलांच्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राऊतांनी, ‘नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? असा प्रश्न ट्विटरवर विचारला होता. ही टीका खासदार संभाजीराजे भोसले यांना चांगलीच जिव्हारी लागली. त्यातूनच त्यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करीत संभाजीराजेंनी राऊतांचा एकेरी उल्लेख करीत, ‘उद्धवजी, या राऊताच्या जीभेला आवर घाला. प्रत्येकवेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करतोय. त्याची मुजोरी सहन केली जाणार नाही’, असा सज्जड दम भरला. मुळात शिवसेना आता सत्तेत आहे आणि त्यातही मुख्यमंत्री या पक्षाचाच आहे म्हटल्यावर त्यांच्या नेत्यांनी आता समजदारीची भूमिका घ्यायला हवी. राज्याच्या विकासावर पूर्णत: लक्ष केंद्रित करीत अन्य बाबींना थारा न देण्यातच धन्यता मानायला हवी. कोणत्याही सत्ताधीशांस खरे आव्हान विरोधकांपेक्षा अशा बेताल स्वकियांचे असते. हे असे स्वकीय विरोधकांहाती कोलीत देतात. पण, राऊतांना कदाचित ते मान्य नाही. शिवसेनेची दहशत पूर्वीच्या तुलनेने कमी झाली आहे हे राऊतांच्या लक्षात आलेले दिसत नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेच्या विरोधात बोलण्याची कुणाची टाप होत नव्हती. जे बोलायचे त्यांचा समाचार शिवसेना ‘स्टाईल’ घेतला जायचा. पण, बाळासाहेबांनंतर पक्षाची ही धार निघून गेली आहे. समाचार घेणारे अनेक मैदानात उतरले आहेत. अशा वेळी राऊतांनी समजदारीची भूमिका घेणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यामुळे प्रामाणिक शिवसैनिकांची समाजात कोंडी होत आहे हे देखील त्यांनी जाणून घ्यावे. यापूर्वी मराठा मोर्चाच्या वेळी ‘सामना’त प्रसिद्ध झालेले व्यंगचित्र हा समाज विसरू शकलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा छत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तींवर वारंवार प्रहार करून सेना आपला पाय अधिक खोलात रुतवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे त्यांच्या वंशजांवरही कुणी विनाकारण टीका केली तरी येथील जनतेची अस्मिता दुखावली जाते. त्यातून सामाजिक शांततेचा भंग होऊ शकतो. अशा वेळी संजय राऊतांनी तोंडावर बोट ठेवलेलेच बरे. शिवाजी महाराज हे लोकोत्तर आणि मानवी कर्तृत्वाचा एक उदात्त आविष्कार होते. निदान याचा तरी विचार करून या वादावर आता पडदा टाकावा इतकेच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -