घरफिचर्सया माणसांना माफ कर...

या माणसांना माफ कर…

Subscribe

उत्क्रांतीनंतर होणार्‍या बदलाचा माणूस साक्षीदार मानला जातो. मात्र निसर्गाच्या या नियमातूनही माणसाने म्हणावा तसा धडा घेतलेला नाही. याआधीही मानवी समुहांवर साथीच्या आजारांनी हल्ला केलेला आहे. आपल्याकडच्या प्लेगच्या साथीचं उदाहरण हे अलिकडचं आहे. त्यानंतर क्षयरोगानं एकेकाळी माणसं मरत होती. त्यावर उपाय आल्यावर स्वच्छतेच्या संकल्पना पुन्हा विस्मृतीत जाऊ लागल्या. करोना हात धुवून माणसाच्या मागे लागला आहे. अशा वेळी स्वच्छतेच्या लावलेल्या सवयीसुद्धा करोनावर उपाय निघेपर्यंतच अमलात आणल्या जातील. निसर्गाला ओरबाडण्याचा सृष्टीने मोडण्याचा निसर्गदत्त अधिकार माणसाला मिळालेला असतो. करोना काळात त्यावर काही अंशी निर्बंध आलेले आहेत. या निर्बंधाविरोधात देशातील सूज्ञ नागरिक मोर्चा काढत नाहीत, खरेतर त्यांचा मोठेपणाच मानायला हवा, जिवंत माणसांच्या या तकलादू आणि दांभिक मोठे (खोटे) पणाबद्दल चाकं बंद झालेल्या निर्जिव यंत्रांमध्येही दु:खाची लहर असेल. मागील सात दशके अविरत धावपळ करून पहिल्यांदाच एवढी मोठी सुट्टी अनुभवणारी आणि मुंबईतल्या रेल्वे यार्डात निवांतपणे आराम करणारी एक लोकल गाडी दुसर्‍या गाडीला म्हणाली, ही माणसं मोठी दांभिक असतात गं…दसरा, दिवाळीच्या दोन तीन दिवस आपल्याला गळ्यात कृतज्ञतेची माळ घालतील आणि उरलेले ३६५ दिवसात या माणसांना आपली मुळीच पर्वा नसते. आपल्या दरवाजे खिडक्यांचा रंग लोको शेड किंवा कारखान्यातून बाहेर येताना जसा असतो, तो आठवड्याभरातच बदलतो, त्यावर ही माणसं गुटख्यांच्या रंगांनी वेडीवाकडी नक्षी काढतात. ज्या खिडकीला दसर्‍यात यांनी मनोभावे हार घातलेला असतो, नारळाच्या खोबर्‍याचा तुकडा किंवा एखादा पेढा ठेवलेला असतो, त्याच खिडकीवर काही तासांनी पान, गुटखा, तंबाखूच्या थुंकीचा अभिषेक करताना या माणसांना शरम वाटत नाहीत, अगदी खरं बोलतेस बाई तू….आता पहिली गाडी दुजोरा देते, या पुरुषांची जातच मेली खोटी…पण आपल्या बाईमाणसाच्या जातीलाही आपली दयामाया येत नाहीच गं…गाडी रिकामी दिसली की या आपल्या बायाही पाय पसरून बसतातच की…बरा धडा शिकवला त्या करोनानं या दोघांना..मग थोडा वेळ भेसूर शांतता…राग खरा येतोच ग बाई…पण या माणसांशिवाय शोभा नाही आपल्या कामाला या करोनानं जावं आपल्या घरी आणि या माणसांना माफ करावं, खूप कंटाळलोय या यार्डातल्या शांततेला, हो कधी एकदा पहिल्यासारखं सगळं सुरू होतंय याची वाट पाहतेय मी…मंगळवारपासून आपल्या काही लांबपल्ल्याच्या मैत्रिणींचं काम सुरू होतंय म्हणे…आपल्या मालकांनी पियुष गोयलांनीच ही घोषणा केली आहे. ३० लाखांपर्यंत कामगारांना घरी पोहचवण्याचं कौतुकास्पद काम केलंय. आपल्या लांब पल्ल्यावर धावणार्‍या आपल्याच मैत्रिणींनी, त्यांच्या डिपार्टमेंटचं काम भारी होतंच. पण आपलं कामही लवकरच सुरू करण्याची मागणी होतेय. दुसर्‍या गाडीनं दुजोरा दिला, हो खरं आहेच. आपलं काम बंद म्हणजे खर्‍या अर्थानं मुंबई-ठाणं बंद. बॉम्बस्फोट, पूर पावसातही आपलं काम थांबलं नाही, पण या करोनानं खरंच आपलीही चाकं बंद केलीत, आग लागो या करोनाला, म्हणत पहिल्या गाडीनं शिव्यांची माळ लावली; पण या वेळेस हे शिव्याशाप करोनाच्या विषाणूसाठी होते.
असाच काहीसा संवाद विमानतळांवरही ऐकू आला. डोमेस्टिक एअरलाईन्सवर दोन विमानांची करोनाला जबाबदार कोण या विषयावर गहन चर्चा सुरू होती. ही माणसं खूपच उडत होती, त्यांना करोनानं जमिनीवर आणलं, पहिल्या विमानानं कुत्सुतपणे हास्य केलं. त्यावर दुसरं म्हणालं. खरं आहे रे…पण आता ती जमिनीवर आली असावीत, झाली तेवढी शिक्षा बस्स झाली. आता आणखी नको, रबर इतकाही ताणायला नको, की तो तुटून जाईल. खरं आहे मित्रा, बरेच दिवस झाले या मोकळ्या आभाळात आपण फेरफटका मारला नाही, रात्रीच्या अंधारातले लुकलुकणारे तारे जवळून पाहिले नाहीत, आकाशातून जमिनीवर दिसणार्‍या माणसांच्या मुंग्या पाहून बरेच दिवस झालेत. ढगांपलिकडचं अवकाश पाहण्याचा योग आता कधी येईल, ते त्या सूर्यदेवालाच ठाऊक, त्यावर पहिल्या विमानाने पृच्छा केली. अरे पण करोनाचा हा विषाणू आपल्याच भाऊबंदांनी आणला ना इथं…पहिल्या विमानाने खंतवजा नाराजी व्यक्त केली. खरं आहे रे…करोनाच्या भीतीने माणसांनी सख्खे मित्र, भाऊबंदांनाही गावाबाहेर १४ दिवस राहण्यासाठी हतबल केलं आहे. माणसं दुरुस्त करण्याच्या कारखान्यात ज्यांना हॉस्पीटल म्हटलं जातं तिथं आजाराने एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याचा मेलेला देह ताब्यात घ्यायलाही नातेवाईक तयार नसल्याचे प्रकार घडले आहेत. केवळ डॉक्टर आणि पोलीस आणि स्वच्छता कर्मचार्‍यांकडून करोनाने बिघडलेली माणसं दुरुस्त करण्याचं काम केलं जात आहे. आपणही परदेशातून आपल्या भागातील हवाई हद्दीतील धावपट्टीवर उतरणार्‍या आपल्या परदेशी मित्रांना वेळीच रोखलं असतं तर ही वेळ आली नसती. आता या परदेशातून आलेल्या आपल्याच विमान मित्रांमुळे आपल्यालाही संसर्गाचा धोका आहेच की, अरे आपणही असंच वागलो तर आपल्यात आणि माणसांमध्ये फरक काय राहील, पहिल्या विमानाने दुसर्‍या विमानाला विचारणा केली, माणसांनी आपल्यातही त्यांच्या समाजासारखे इकोनॉमी, स्पेशल असे क्लास बनवले आहेत. हा भेदाचा व्हायरस या करोना विषाणूपेक्षाही जास्त धोकादायक आहे. पण माकडापासून माणूस झालेल्या या माणसांना उत्क्रांत होऊन इतकी शतकं झाली तरी अजून हा मूर्खपणा ध्यानात आलेला नाही. ते असो, मरोना तो करोना आणि आपल्याला लवकरात लवकर आभाळात भरारी मारण्याची संधी मिळावी, खूप कंटाळलो आहोत या धावपट्टीवर थांबून. या दोन विमानांचा संवाद ऐकून परदेशातून इथल्या धावपट्टीवर विसावलेलं एक विमान भलतंच खजिल झालं. मित्रांनो मी इथं आलेलो नाही, मला आणलं गेलंय. इथल्या माणसांकडूनच तुम्ही मला का दोष देताय. जशी भूक आणि भाकरीच्या शोधात माणसं कामगार म्हणून इथल्या राज्यातून तिथल्या राज्यात जातात तसाच मीसुद्धा जातो एका देशातून दुसर्‍या देशात कामानिमित्त ये-जा करणार्‍यांची ने-आण करतो. हा व्हायरस माझ्यातून तुमच्या देशात आला असेलही कदाचित; पण हा दोष माझा नाही. पॅरासिटामोलच्या गोळ्या घेऊन आपल्या तपासणीत लबाडी करणार्‍या माणसांना दोष देण्यापेक्षा तुम्ही मला का बोल लावताय…नाही मित्रा आम्ही तुला दोष देत नाही आहोत, तू तुझं काम केलंस, दिलेलं काम चोखपणे करणं आपलं एवढंच काम आहे. घटनांच्या परिणामांचा विचार करण्याचे काम आपले नाही आणि आपली तेवढी क्षमताही नाही. निसर्गासह विज्ञानालाही ओरबाडणार्‍या माणसांना सुबुद्धी वेळीच यावी, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो, असं बोलून धावपट्टीवरील विमानांनी आपलं नाक वर करून निळ्या शुभ्र अवकाशात एक नजर टाकली.
याच प्रकारचा दोषारोप माणसांवर बस आगारात थांबलेल्या बसगाड्यांनी केला. असाच संवाद रस्त्याच्या कडेला थांबलेल्या रिक्षातळांवरही झाला. कारखान्यातील दोन चाकांनी, अवजड सामान उचलणार्‍या क्रेननी, हातामागावरील यंत्रांनी अगदी संगणकांपासून ते सेफ्टी पिनपर्यंतच्या मानव निर्मित यंत्रांनी माणसाच्या या दांभिकतेचा आणि स्वार्थी प्रवृत्तीचा एकाच वेळी निषेध केला. सोबतच या माणसाला माफ करण्याची विनंतीही त्या निसर्गाकडे सर्वांनी मिळून केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -