घरफिचर्सचांद्र तो, राहू द्या राजकारणाबाहेर!

चांद्र तो, राहू द्या राजकारणाबाहेर!

Subscribe

आपल्याकडे प्रत्येक इव्हेंटकडे राजकारणातून पाहण्याची पध्दत जडली आहे. कोणीही अशा घटनांचा फायदा राजकारणात घेऊ नये, अशी अपेक्षा असते. फायदा घेतला जातो तेव्हा त्या मोहिमेवर उगाच टीकास्त्र सोडलं जातं. यातून चांगल्या मोहिमेचं मातेरं होतं. विकसनशील राष्ट्रांच्या अशा मोहिमांवर टीका होणं हे त्या देशाच्या विकासातील मैलाचा अडथळा ठरत असतो. याची जाणीव सत्ताधार्‍यांना असायला हवी. कारण आजवर असा फायदा सत्ताधार्‍यांनीच घेतल्याचा इतिहास आहे. जशी समर्थनीय घटना सत्ताधार्‍यांसाठी फलदायी असते तशी असमर्थनीय घटना विरोधकांना उपकारक ठरत असते. दोन्हीकडून मोहिमांचं राजकारण थांबेल तेव्हाच खर्‍या अर्थाने त्याला देशहिताचा साज चढेल. आज देशहिताहून आपल्या पक्षाला अधिक महत्त्व देण्याची टूम देशात आहे. ती काही केल्या दूर होण्याचं नाव घेत नाही. चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचण्यात आलेल्या अडथळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या प्रमुखांना मारलेल्या मिठीमुळे हे सारं नमूद करावं लागत आहे. कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगाला पहिल्या प्रयत्नात यश येत नसतं, तो म्हणजे गोमुत्र पिण्यासारखा प्रयोग नाही. यासाठी प्रयोगामागून प्रयोग करावे लागतात. कोणी म्हणत असेल इहलोकीही सृष्टी असेल, तर ते मान्य करण्यासारखी परिस्थिती नाही. आपली इस्त्रो संघटना आता तुल्यबल आहे. ती जागती असताना असल्या भुळचट कुशंका घेण्याचं कारण नाही. असंख्य चुकांचा आधार घेतच असे प्रयोग करावे लागत असतात. या चुकांवर मात करूनच यश पदरात पडत असतं आणि यश आलं म्हणून हुरळून जायचं नसतं आणि अपयश आलं म्हणून निराशही व्हायचं नसतं. वर्षानुवर्ष काम केल्यावर मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद काही औरच असतो, पण यश मिळालं नाही तर खचून जायचं नसतं. यामुळे सोबत काम करणार्‍यांचंही मन खचू शकतं. एखादा प्रयोग अयशस्वी ठरल्यास त्याचं दुःख मोठं असणं स्वाभाविक असतं. यशाचे अनेक धनी असतात. अपयशाची जबाबदारी कोणीच कधी घेत नसतो. अपयश ही यशाची पायरी का समजली जाते ते यावरून कळेल. गेल्या ११ वर्षांपासून सुरू झालेल्या मोहिमेत अपयशाची शक्यता दिसू लागताच इस्त्रोच्या संशोधकांच्या भावना अनावर झाल्या. अनेक वर्षांच्या तपश्चर्येवर पाणी पडल्यासारखं त्यांना झालं, पण कायम यशाचा चमचा तोंडात घेऊन असे प्रयोग होत नसतात. तेव्हा सारं काही संपलं असं मानण्याचं कारण नाही. कसोटीच्या क्षणी धिरोदात्तपणे आपल्या सहकार्‍यांचं मनोबल वाढवण्याचं फलित काही औरच असतं. ते इस्त्रोचे प्रमुख के. सीवन यांनी दाखवायला हवं. याच भावनेचा आधार घेत पंतप्रधानांनी त्यांना मिठी मारली. तेव्हा सीवन यांच्या डोळ्यातील अश्रृ लपून राहिले नाहीत.
आता किमान या प्रसंगाचा गैरफायदा भाजपने घेऊ नये. तसं पाहिलं तर ही मोहीम ११ वर्षांपूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सुरू झाली होती. चांद्रयानाच्या तयारीला तेव्हा आघाडी सरकारने दिलेल्या हिरव्या कंदिलामुळेच सुमारे पाच वर्ष हे काम बिनदिक्कत सुरू होतं. त्याआधी मंगल यानाची उभारणी झाली होती. या यानाचं अवकाश गमन झाल्यावर कोणी ते आपल्यामुळे झालं असं म्हटलं नाही. चांद्रयानाचं निमित्त घेऊन कोणी त्याचा फायदा घेऊ नये. पंतप्रधान मोदी भरसकाळी इस्त्रोच्या मुख्यालयात पोहोचले आणि सार्‍या देशाला त्यांनी आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली. देशवासींना ही बाब सामान्य वाटली, पण निवडणुकीच्या निमित्ताने अशा गोष्टींचं होणारं राजकारण काही औरच सांगून जातं. याआधी घडलेल्या घटना याची साक्षी देतात. या घटनांचं झालेलं बाजारीपण उद्विग्न करून सोडणारं होतं. या प्रसंगाच्या लिंक सोडून त्या प्रसंगांचं पद्धतशीर मार्केटिंग करण्यात आलं. अशी एकच घटना घडली असती तर कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं, पण उरीच्या घटनेनंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसह पुलवामाच्या घटनेचा पद्धतशीर वापर राजकारणासाठी करण्यात आला. यामुळेच या घटना राजकारणासाठीच घडवल्या जात नाहीत ना, अशी शंका घेतल्या जाऊ लागल्या. सर्जिकल स्ट्राईकच्या घटनेनंतर तर हे जणू नरेंद्र मोदी यांनीच घडवल्याचा आव आणला गेला. देशभर यासंबंधीचे फ्लॅक्स नजरेत पडल्यावर सरकारच्या एकूणच दृष्टिकोणाची जाणीव झाली.
या निमित्ताने २ एप्रिल १९८४ च्या घटनेची जाणीवपूर्वक आठवण येते. तेव्हा भारतीय वायूसेनेतील स्कॉड्रन लिडर राकेश शर्मा यांना भारत सरकारने सोयूझ टी-११ या रशियाच्या यानासह अंतराळात पाठवलं होतं. तेव्हा पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी शर्मांना अंतराळातून भारत कसा दिसतो, असं विचारलं होतं. शर्मा यांनी उत्तरादाखल ‘मै बिना हिचक के कह सकता हूँ, ‘सारे जहांसे अच्छा, हिंदुस्थान हमारा’ असं म्हटलं होतं. शर्मा यांच्या या उत्कट संवादाची खूप चर्चा झाली, पण इंदिरा गांधी यांनी याचा राजकारणासाठी उपयोग करून घेतला नव्हता. अंतराळात भारताने १९८४ सालीच आपला तिरंगा रोवला होता. तरी आम्ही २०२२ पर्यंत देशवासीय तिथे जातील असं जेव्हा म्हणतो तेव्हा कोणाला काय साध्य करायचं आहे, ते लक्षात येतं. अनुभव माणसाला खूप काही शिकवून सोडत असतो. वरील अनुभवाकडे पाहता काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द करण्याच्या मुद्याबरोबरच चांद्रयानानिमित्ताने मारलेली मिठीचं राजकारण होणार नाही, असं कोणीही सांगू शकत नाही. मोदींसाठी इव्हेंट मॅनेजमेंटचं काही कमी नाही आणि त्यांच्याहून त्यांच्या भक्तांची या देशाला अजिबात कमी नाही. मोदींचं सर्वाधिक नुकसान हेच त्यांचे भक्त करत असतात. अमुकएक करू नका, असं मोदींनी सांगूनही भक्त ते करायचं सोडत नाहीत. देशाचं राजकारण कसं व्यक्तीसापेक्ष होत चाललं आहे, याचं हे उदाहरण म्हणता येईल. हीच चूक काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधींच्यावेळी केली होती. व्यक्तीस्तोम हे फार काळ टिकणारं नसतं, हे भक्तांना कोणी सांगावं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -