घरफिचर्सजैवविविधता लोकज्ञानाची शेवटची पिढी

जैवविविधता लोकज्ञानाची शेवटची पिढी

Subscribe

माणूस निसर्गाशी संघर्ष आणि संवाद करत सतत नवनवीन गोष्टी शिकत असतो. निसर्गातील उपद्रवी असणार्‍या, वाटणार्‍या गोष्टीशी संघर्ष करणे. उपयोगी वाटणार्‍या गोष्टीशी संवाद साधणेे, सहवास वाढवणे. हे असं सध्या साठीत असणार्‍या पिढीपर्यंत जैविक पद्धतीने सुरू होते. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचे माणसांनी नामकरणही केले आहे. भलेही ते स्थानिक भाषेतील असो.

अनेकदा वनस्पतींची वनस्पतीशास्त्रीय नावे सांगताना स्थानिक नावांकडे अशास्त्रीय आहेत, असे काहीसे बघितले जाते. मात्र एखाद्या घटकाला नाव देतांना त्यामध्ये लोकांचे निरीक्षण आणि अनुभव असतो. ते आपल्याला नीट समजून घ्यावे लागते, तरवड नावाच्या वनस्पतीला कोरकू भाषेतलं नाव आहे चांभार कोदळे, हे एक छोटेसे झुडूप असते. याची पाने कातडी कमावण्याच्या कामात वापरली जातात. ही पाने ‘चांबडी ’ला मऊ बनवतात. पाडव्याला खारीक-खोबार्‍याचे हार बनवण्याची प्रथा आहे. खारीक टणक असतात. त्यातून सुई सहज जात नाही. रात्रभर खारीक तरवडच्या पानात ठेवली तर ती मऊ पडतात. ही माहिती व ज्ञान कालोघात लुप्त पावत जाईल. दुसरे उदाहरण घेऊ. ज्या पक्षाला पुस्तकी नाव ‘स्वर्गीय नर्तक’ असे दिले आहे, त्याला गोंडी भाषेत ‘मुंजाल पिट्टे’ म्हणतात. मुंजाल म्हणजे माकड. पिट्टे म्हणजे पक्षी. माकडासारखी शेपटी असलेला पक्षी म्हणून त्याला मुंजाल पिट्टे. स्वर्गीय नर्तक हे नाव मात्र इंग्रजी ‘पॅरडाईस प्लाईकॅचर’ याचे शब्दशः भाषांतर आहे. हे लोकज्ञान फक्त वेगवेळ्या जैवविविधता असलेल्या घटकांच्या नावातच आहे, असे नाही.

सद्या साठी-सत्तरीत असलेली पिढी अनुभवसंपन्न आहे. त्याचं जगणं हे निसर्गात होतं. निसर्गातील प्रत्येक घटकाशी ते जैविक पद्धतीने एकरूप झालेले होते. निसर्गाची ओळख होण्याचा धागा जरी ‘उपयोग’ आणि ‘उपद्रव’ असला तरी, त्यांच्या सांस्कृतिक जीवनात निसर्ग, निसर्गातील वेगवेगळे घटक यांना महत्वाचे स्थान होते. शेतीत कामं करीत असताना अनेकदा जखमा होतात. हात-पाय कापले जातात. धस्कटं लागतात. आता हे धस्कटं काय भानगड आहे. ही खूप कमी लोकांना माहिती असेल. ज्वारी, बाजरी, तूर ही पिके कापून घेतल्यावर उरलेला जमिनीतील भाग धस्कट असते. ते पायाला लागून खूप मोठ्या जखमा होतात. शेतकरी काही लगेच दवाखान्यात जात नाहीत. शेतीत, बांधावर सहसा पाच सहा प्रकारच्या वनस्पती असतात. ज्या जखम भरण्यासाठी उपयुक्त असतात. जखमजोडी म्हणून ज्याला ओळखले जाते ती वनस्पती सर्व भागात जखमेवर गुणकारी म्हणून वापरली जाते. जखमजोडीला घावटीचा पाला, दगडीपाला अशी अनेक प्रदेशनिहाय नावे आहेत. जखम छोटी असेल तर वेगळा पाला, खोलवर असेल तर वेगळा. मुका मार लागला तर त्याला शेकण्यासाठी वेगवेगळी पाने. ही सगळी माहिती फक्त लोकांच्या आठवणीत आहे. अगदी मोजकेच ज्ञान कुठेतरी, कोणीतरी नोंदवल्याचे संदर्भ आढळतात, बाकी सर्व रामभरोसे.

- Advertisement -

कामानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जाणे होते. गावात गेल्यावर गाव परिसरातील जंगल हिंडून पाहणे, हे माझं पहिलं काम असतं. लोकांसोबत शिवारात फिरत असताना एखाद्या अनोळखी झाडाबद्दल माहिती विचारली तर सोबतचे लोक, अलीकडेच ज्यांचे निधन झाले त्यांचे नावे घेऊन सांगतात, कि ‘अमुक-अमुक माणूस राहिला असता तर त्याने तुम्हाला ही सगळी माहिती सांगितली असती.’ असे सांगणार्‍यांना मी विचारतो, ‘तुम्ही त्या माणसाकडून ही माहिती का करून घेतली नाही? आता या पिढीत एखादा तरी माणूस आहे का, ज्याला ही झाडं, वनस्पती माहिती आहेत?’ बहुतेक गावात दुर्दैवाने या दोन्ही प्रश्नांचे उत्तर नाही असे येते. आपल्या पूर्वजांनी मिळवलेली इतक्या मोलाची माहिती, वापराचे ज्ञान, याकडे आपण सर्रास दुर्लक्ष करीत आलो आहोत.

घरात दळण करण्यासाठी जातं वापरण्यात येत होतं. यामध्ये दोन प्रकारचे लाकूड वापरले जायचे. दोन दगडांना जोडणारी एक छोटी आतील खुट्टी व वरील जाते फिरविण्यासाठी हातात धरावयाची मुठ. जात्यावर दळण करणार्‍या स्त्रीला या दोन्ही ठिकाणी लागणार्‍या दोन विशेष गुणधर्माचे लाकूड देणार्‍या झाडांची ओळख झालेली असायची. विळा व खुरपे यांना लाकडी मुठ असतात. फळभाजी व भाजीपाला कापायची विळी वेगळी व शेतीत काम करण्यासाठी वापरण्यात येणारा विळा वेगळा. स्वयंपाक घरातील विळ्यासाठी कोणतेही लाकूड वापरून चालत नाही. त्यावर कापलेल्या गोष्टी खाण्यात वापरात येत असल्याने ती विशेष काळजी घ्यावी लागते. बाजाचे चारी बाजू, त्याचे पाय ही वेगळ्या वेगळ्या लाकडाचे असतात. पायासाठी लागणारा लाकूड हा न चिरणारा टणक असा असावा लागतो. शेतात फिकाची रास करण्यासाठी, धान्यामधील कचरा साफ करण्यासाठी तिपाईवर उभे राहून धान्य उदळावे लागते. या तिपाईचे तीन पाय आणि त्यावर बसविण्यात येणारी जाडसर फळी यासाठी लागणारे लाकूड. अशा प्रकारे कृषी जीवनात माणसाचा हजार पद्धतीने त्याच्या परिसरातील जैवविविधतेशी संबंध येत होता. त्यातून तो त्याची निरीक्षणे करून नोंदी ठेवत होता.

- Advertisement -

आपण शेतशिवाराकडे किती चौकस बुद्धीने पाहतो? एखाद्या गोष्टीचे सातत्याने निरीक्षणे करतोत? आपली दृष्टी अर्जुनासारखी फक्त पक्षाच्या डोळ्यावर लागले आहे. चार बांधाच्या आतील वावरात पेरलेले पिक म्हणजेच शेती हे समीकरण पक्के झाले आहे. पिकं जोमाने यावीत, त्याला कीड लागू नये, उत्पन्न वाढावं यासाठी काहीही करायला आपण तयार आहोत. अतिविषारी कीटकनाशके, तणनाशके मारणे व भरघोस पिकाची अपेक्षा करणे. इतकीच आपली आजची शेती बनली आहे. या दृष्टिकोनामुळे परंपरागत आलेले ज्ञान आपण दुर्लक्षिले आहे. जुनी पिढी त्यांच्या माहिती, अनुभव, ज्ञान यासह अडगळीत टाकली गेली आहे.

येणारी नवीन पिढी ही अधिकाधिक हुशार आणि प्रगतीशील पिढी आहे. नवनवीन क्षेत्रात विकासाचे नवनवीन उच्चांक गाठत आहे. म्हटले जाते की, या पिढीला खूप पुढचं आणि दूरवरच दिसतं. मात्र आत्ताची पिढी त्याच्या अगोदरील पिढीच्या अनुभवांच्या खांद्यावर बसून पाहते. ही वस्तुस्थिती आपण विसरून जातो. नवीन पिढीने जर आधीच्या पिढीचे अनुभव, ज्ञान, कौशल्य, मोडीत काढून सर्व काही नव्याने सुरू करावयाचे म्हटले तर नवीन पिढीला पुढचे-लांबचे काय जवळपासचेही काही दिसणार नाही. यासाठी नव्या पिढीने हे भान ठेवले पाहिजे की, आपण आधीच्या पिढीच्या अनुभवाने शहाणे झालो आहोत. आधीच्या पिढीनेही नवीन पिढीची दृष्टी समजावू घेऊन त्यांना योग्य ती संधी द्यावी आणि मार्गदर्शनही केले पाहिजे.

यानिमित्ताने शाळा आणि गाव यांचा एक चांगला मिलाप होऊ शकतो. संकलित मूल्यांकनाचा भाग म्हणून शिक्षकांना मुलाकडून वेगवेगळे प्रकल्प करून घ्यावे लागतात. सध्या प्रकल्पाच्या नावाखाली अतिशय सुमार दर्जाची स्टिकर्स, फोटो प्रोजेक्ट वही मध्ये चिकटवून सादर केले जाते. प्रकल्पाचा भाग म्हणून शिक्षकांनी गावातील जुन्या पिढीशी संवाद साधला पाहिजे. त्यातून मुलांना जैवविविधता लोकज्ञानाची ओळख होऊ शकते. त्यातून नव्या संशोधनाच्या प्रेरणा मिळू शकतात. लोकांकडील सगळीच माहिती अगदी खरी-खुरी आहे. असे समजण्याची गरज नाही. पहिला टप्पा म्हणून जी काही माहिती आहे ती आपण त्यांच्या त्यांच्या नावे जतन करावी.

गावातील मेंढपाळ, गुराखी, वैरण गोळा करणार्‍या महिला, शेती करणारे शेतकरी, तळ्यात व नदीत मासे पकडणारी लोकं यांना त्यांच्या कामातून आलेलं, विकसित झालेलं ज्ञान असतं. मौखिक परंपरा आणि कथाकथन यांचा आपल्या समाजावर खूप मोठा पगडा आहे. हा पगडा आजही कायम दिसतो. मात्र आज लिहिता वाचता येणार्‍यांची संख्या वाढली आहे. अगदी खेडेगावातदेखील लिहिता येत नाही असे खूप कमी तरुण सापडतील. आपल्या आधीच्या पिढीशी संवाद साधून त्यांचे जीवन-अनुभव, मागच्या पिढीच्या आठवणीत जतन केलेले ज्ञान लिहून घेता येऊ शकते. तंत्रज्ञानाच्या क्रांतीतून आज आवाज रेकॉर्ड करण्याची सुविधा देखील गावपातळी पर्यंत पोहोचली आहे. गरज आहे फक्त संवादाची. वेळीच आपण हा संवाद साधला नाही तर, आपण नेमके किती आणि काय-काय गमावतो आहोत, याची देखील मोजदाद आपल्याला करता येणार नाही. आपल्या हाती उरेल फक्त हरवल्याची खंत.

-बसवंत विठाबाई बाबाराव
(लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -