घरफिचर्सशेतीमधील गुंता

शेतीमधील गुंता

Subscribe

खरीपाची पेरणी होते. मुग, उडीत, तूर, कपाशी, अलीकडे सगळीकडे वर्चस्व गाजवणारं सोयाबीन उगवून येते. ह्या पिकामधेच, ह्या पिकांशी स्पर्धा करीत उगवतात ते तादूळ कुंद्रा, भुई आवळी, पाथरी, कुरडू, केना, टाकळा, उंदीरकानी इत्यादी उगवतं. पिकांच्या दोन ओळीमध्ये उगवलेलं हे सर्व तन असते. तन काढण्यासाठी शेतकरी परंपरागत कोळपणी करतात. गावात त्याला कोळपं धरनं म्हणतात. पिकांच नुकसान होऊ न देता अलगदपणे गवत काढण्यासाठी कोळप्याचं रूमनं धरून चालायचं असते. वखरनी करायच्या औजारपेक्षा हे छोटेसे असते. एका हाताने अलगद सहज उचलतात येते. पीक लहान असताना कोळपणी करून तन काढून टाकलं जातं.

थोडं पीक मोठं झालं की, खुरपणी करावी लागते. खुरपे घेऊन पिकाच्या दोन ओळीतील गवत काढले जाते म्हणून त्याला खुरपणी म्हणतात. काही भागात यालाच निंदन म्हणतात. निंदायचं काम गावोगावी महिलाच करतात. हे तसं कौशल्याचं काम असतं. दिवसभर कमरेत वाकून निंदावे लागते. गावातील काही पुरुषदेखील हे निदायचं काम करतात. मात्र अशा पुरुषांना बायकाबरोबर खुरपतो म्हणून बाईल्या असं म्हटलं जातं. अलीकडे तर निंदन करणारे पुरुष दुर्मिळ होत आहेत.

निंदन करताना महिला निघणार्‍या तनाचे तीन भागात वर्गीकरण करतात. एकमध्ये पाथरी, कुरडूची कोवळी पाने, तांदूळ कुंद्राची पाने, सराटा हे सगळं एकत्र करून कुंचीत किंवा साडीच्या निर्‍या कमरेत खोऊन छान कप्पा करून त्यात गोळा केल्या जातात. हे सगळं आपसूक मिळालेल्या मौल्यवान रानभाज्या होत. कुंची ही जुन्या साड्या व इतर कपडे एकमेकांना जोडून, दोन बाजूंना शिवून बनवलेली असते. ही कुंची शेतीत जाणार्‍यासाठी खूप मोलाची असते. पावसात पांघरायला येते, ऊन, थंडीपासूनही कुंची रक्षण करते. शेतीतून भाज्या, गुर्‍हाना चारा, कधी जळतन असं काही न्यायला उपयोगी असते. कापूस कुंची बांधूनच वेचले जाते. कुंचीला एक विशिष्ट प्रकारचं उब असते. अलीकडे ह्या कुंच्या दुर्मीळ होत आहेत.

- Advertisement -

खुरपलेल्या मध्ये बरेच तन हे गुर्‍हाना चारा म्हणून उपयोगी असते. ज्यांच्याकडे जास्तीची गुर्‍हे आहेत ते लोक दररोज कुणाच्या शेतीत खुरपणी सुरुय ह्याच्या माघावर असतात. संध्याकाळी जाऊन खुरपलेलं सर्व तन घेऊन आपल्या गुर्‍हाना खायला देतात. कोळपणी नंतर काहीजण एक वेळ तर काही जन दोन वेळा खुरपतात. तसं गावशिवारातील खुरपणी साधारण एक महिनाभर चालतो. ह्या महिन्याभरात घरी भरपूर हिरव्या पाल्याभाज्या खाल्ल्या जातात. जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न मिटतो. रानभज्याचा व गुर्‍हाना चारा घेऊन झाल्यावर उरलेला भाग फक्त तन म्हणून वेगळा केला जातो. हा तन शेतीच्या बांधावर, गंडीला टाकला जातो. शेतीला जास्त झालेलं पाणी एकाद्या ठिकाणी बांध फोडून दुसर्‍या शेतीत वाहून जात असते. वर्षानुवर्षे असं पाणी जाऊन तिथे खड्डा झालेलं असते. ते दगड, तन टाकून शेतकरी भूजवत असतो. ह्या भागाला गंडी म्हणतात.

शेतीत खुरपनं किंवा निंदनं हे जरी एक काम असलं तरी त्यातून घरी भाज्या, चारा मिळत असतो. खुरप्याने सर्व वावर निंदत असताना सगळ्या पिकावरून शेतकरी मायेन हात फिरवत असतो. पिकाशी, शेतीशी शेतकर्‍याचं एक नाते तयार होते. अशा शेतकर्‍यावर जेव्हा शेती विकायची वेळ येते, तेव्हा डोळ्यात पाणी उभं राहते. पश्चिमी देशातील शेती आणि आपल्याकडी शेती ह्यात एक मोठा फरक आहे. जे हरितक्रांतीच्या नावाखाली आपल्या देशातही उत्तरेकडून खाली झिरपायला लागलीय. आपल्याकडे कुटुंबाची सरासरी जमीनधारणा हे पाच एकरच्या जवळपास इतकी आहे. मात्र युरोपात व इतर पश्चिमी देशात ही जमीनधारणा हजारोएकरची असते. यंत्राने मशागत आणि पेरणी केली जाते. रासायनिक कीड नाशके आणि अलीकडे तननाशके फवारली जातात. त्यातून शेती ही एक उद्योग झाला आहे. भांडवलदार आणि कामगार असे शेतीमध्येही वर्ग तयार झाले आहेत.

- Advertisement -

तथाकथित हरितक्रांतीत आपले पाय रोवून हळूहळू आपल्याकडेही शेतीचे यांत्रिकीकरण होत आहे. शेती यंत्राच्या सहायाने करणे चुकीचे आहे का? तसे मुळीच नाहीय. पण अनेकांकडील शेती काढून ती काहींच्या हातात देणे, यंत्राचे निमित्त करून पिकांचे एकसुरीकरण करणे, प्रचंड कीड नाशके व तन नाशके वापरणे ह्यातून शेतीचा मृत्यू होत आहे. माती ही जिवंत गोष्ट असते. त्यात कैक जीवाणू असतात. पोषकतत्वे असतात. ह्या अघोरी पद्धतीमुळे मातीचा, शेतीचा मृत्यू होत आहे.

शेत शिवारात सापडणार्‍या रानभाज्या कमी होत आहेत. उपद्रवी किडी, मित्र किडी ह्यांची एक परिसंस्था असते. ही परिसंस्था मोडकळीस येते आहे. पिकं खाणार्‍या किडी, त्यांना खाणार्‍या किडी, ह्या दोघांना व शेतीत डोलणारी कणसं, शेंगा खाणारे पक्षी ह्यांचा सुंदर मिलाप असतो. त्यातून पिकांचे परागीभवन होत असते. शेतीत येणार्‍या मधमाशा, फुलपाखरे, इतर असंख्य ओळखीच्या व अनोळखी असलेल्या किडीमुळे पिक अधिक बहरत असते. जाणकार शेतकरी शेतीत मधमाशा व फुलपाखरे, पक्षी यावेत म्हणून बांधावर ह्यांना आकर्षित करणारी झाडे लावत असतात. त्यातून शेतीत एकप्रकारची समृद्धता येत असते.

कीडनाशके आणि तन नाशके ह्यांनी शेतीमधील समृद्धतेचा जीव घेतला आहे. औतावर पेरणी करताना शेतकरी शेतीच्या छोट्या छोट्या तुकड्यात वेगवेगळी पिकं पेरायचा. कुळीथ, लाखोळी, तीळ, कारळ, नाचणी, वरई, करडई असं सगळं शेतीत थोडं थोडं असायचं. एक बाजूला गुरांना खायला बाटूक, घरी भाजीला, पोरांना खायला मिश्र पाटा पेरलं जायचं. हा पाटा घरच्या लहान्यांचं, बायकांचं, म्हातार्‍यांच पोषण करण्याबरोबरच शेतीतील किडी नियंत्रणासाठी देखील मोलाचे काम करीत असत. हे सगळं आता दुर्मिळ होत जातंय. काही दिवसापूर्वी शेतीतून मला रिकाम्याहाती परत यावं लागलं. न राहवून एका ठिकाणी बांधालगत तादूळ कुंद्रा भाजी तोडून घेतली. मात्र पुढं येऊन ते टाकून द्यावं लागलं. कारण त्या शेतीत आधीच्याच दिवशी कीडनाशक फवारलेलं होतं.

शेतीत काम करायला माणसं मिळत नाहीत. रोजगार हमी योजनेत लोकांना फुकट पैसे मिळतात म्हणून शेतीत कामाला येत नाहीत. दिवसभर बसून राहतील पण कामाला लोकं येत नाहीत. लोकांना ऐतं खायची सवय लागलीय. म्हणून आम्हाला तननाशके फवारावी लागातत. मुग, उडीत जेव्हा काढायला येतात तेव्हा पाऊस सुरु असतो. तेव्हा तर शेतीत कामाला माणसं मिळत नाहीत. ह्या दिवसात माणसं पळवली जातात. एकाच्या शेतीच्या वाटेवर निघालेले लोक मधेच अडवून अधिक पैशाची बोली करून दुसर्‍याच्या शेतीत नेली जातात. सोयाबिन हे पावसात थोडं तगून राहणारे पीक आहे, माणसं नाही आली तरी थोडे दिवस टिकून राहते म्हणून सोयाबीन पेरावे लागेत. तसं सोयाबिनला भाव पण चांगला असतो. ही एक दोन ठिकाणचे नव्हे तर महाराष्ट्रातील कोरडवाहू भागातील बहुतेक ठिकाणची ही परिस्थिती आहे. शेती प्रश्नाचा गुंता हा अनेक धाग्यांनी वेढलेला आहे. बाजारभाव, खते, कीटकनाशके आणि तन नाशके, बियाणे, शेतीत येणारी नवनवीन औजारं, शेतीत काम करणारी माणसं, शेतजमिनीची मालकी असं बहुविध धाग्यांनी हा गुंता घट्ट होत जातोय. शेतीची म्हणजे जमिनीच्या किमती वाढत आहेत. अनेक लोक शेती घेत आहेत. मात्र शेती करायला उत्सुक लोक कमी होत आहेत. शेती करणारेदेखील शेतीतून आपल्या कुटुंबांची अन्नाची सुरक्षितता, पोषकता ह्यापेक्षा अधिकचे उत्पन्न घेऊन आर्थिक नफा मिळविण्यावर भर देत आहेत.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -