चला फिरायला, जंगल बोलावतंय

जंगलात जाऊन काय काय पहायचे, काय काय करायचे? जंगल काही व्हिडिओ गेम नाही. पब्जीसारख्या गेममध्ये परिस्थिती, आपली टीम स्वतः ठरवून तासंतास घालवलेल्या वेळेपेक्षा जंगलातील एक दिवस निश्चितच फलदायी ठरेल. सोबतच थोडीफार फळेही खायला मिळतील. तुम्ही ज्या ठिकाणी जायचे ठरवले आहे, त्या ठिकाणी एक पूर्ण दिवस देणे महत्त्वाचे आहे. जंगल परिसरातील एखादे गाव मुक्कामासाठी निवडावे. अलीकडे गाव परीसरात हॉटेल्स, लॉज झाले आहेत. मात्र होमस्टे हा पर्याय उत्तम राहील.

Mumbai
जंगल

आंबा मोहरलाय, काटेसावर, पांगारा फुललाय. जांभूळ, चारोळी बहरले आहेत. एकूणच जंगल फुलांच्या सुगंधाने दरवळत आहे. अनेक झाडांना कोवळी पाने यायला सुरुवात झाली आहे. ह्या मोहरण्या, बहरण्याचे, फुलण्याचे आस्वाद निसर्गातील प्रत्येक जीव घेत आहेत. पक्षी, फुलपाखरे, मधमाशी, खारुताई ह्यांची लगबग सुरु झालीय. कुणी मधुरस खात आहेत, कुणी फुलाच्या पाकळ्या. तर काही पक्षी फुलात अडकलेले कीटक. काही नुसतेच निवार्‍याला बसले आहेत. जंगलात एक प्रकारे उत्सव सुरू आहे. जंगलातील वेगवेळ्या फुलांचा जो गंध आहे, तो मानसला साद घालतो आहे. निसर्गाच्या सौंदर्याला दाद द्यायला, चला जंगलात फिरायला.

जंगलात सुरू असलेल्या ह्या उत्सवात आपण का मागे राहायचे? घर दारं गरम झाली आहेत, ओसरी-ओटे पोळत आहेत, रस्ते झळा घालत आहेत. वेळीच उन्हाळाच्या सुट्ट्यांचे नियोजन केलं नाही तर निव्वळ हाच उकाडा आपल्याला लाभेल. जवळपासचे एखादे गाव निवडा. थोडसं नियोजन करा आणि चला फिरायला. तुम्हाला मोठी सुट्टी शक्य असेल तर मेळघाट, नागझिरा नवेगाव बांध, पितळखोरे, कोयना-चांदोली अशा थोड्या लांबवरील ठिकाणचे नियोजन करा. कमी दिवस असतील तर तुम्ही राह्रत असलेल्या शहाराच्या पन्नास साठ किलोमीटरच्या परिघात अशी भरपूर ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला ह्या निसर्गउत्साहाचे आनंद लुटता येईल.

जंगल टिकले पाहिजे, कारण जंगल हे पर्यावरणातील महत्त्वाचा घटक आहे. अशी मांडणी केली जाते. पुस्तकातून जंगलाचे महत्व सांगितले जाते. एक झाड किती ऑक्सिजन देते, हेच ऑक्सिजन विकत घायचे झाले तर किती किंमत मोजावी लागेल असे संदेश वारंवार वाचतोच. पण ह्यातून तितके जंगलाचे महत्त्व नाही समजणार. जंगलाचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर जंगलात एखादा दिवस घालवावा लागेल. शहरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पिढीला तर याची अधिकच गरज आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यासाठीही अशी जंगलसफारी खूप गरजेची असते. जंगल सफारी म्हणजे निव्वळ वनविभागाच्या गाडीत बसून गाईड दाखवील ती ठिकाणे पाहणे इतकेच नाही. जंगलातील अतिशय छोट्यातल्या छोट्या गोष्टी टिपणे, मोठ्या गोष्टी अस्तित्वात राहण्यासाठी ह्या छोट्या गोष्टींचे महत्त्व जाणणे, ह्यासाठी जंगलात वेळ घालवणे म्हणजे जंगल सफारी होय.

जंगलात जाऊन काय काय पहायचे, काय काय करायचे? जंगल काही व्हिडिओ गेम नाही. पब्जीसारख्या गेममध्ये परिस्थिती, आपली टीम स्वतः ठरवून तासंतास घालवलेल्या वेळेपेक्षा जंगलातील एक दिवस निश्चितच फलदायी ठरेल. सोबतच थोडीफार फळेही खायला मिळतील. तुम्ही ज्या ठिकाणी जायचे ठरवले आहे, त्या ठिकाणी एक पूर्ण दिवस देणे महत्त्वाचे आहे. जंगल परिसरातील एखादे गाव मुक्कामासाठी निवडावे. अलीकडे गाव परीसरात हॉटेल्स, लॉज झाले आहेत. मात्र होमस्टे हा पर्याय उत्तम राहील. तुमच्या राहण्याची, खाण्याची उत्तम सोय होईलच, शिवाय गावशिवाराची बरीच नवीन माहिती मिळेल. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण दिवस जंगलात घालवणार आहात, त्याच्या आदल्या दिवशी जवळपासच्या गावात मुक्कामी रहा. म्हणजे दुसर्‍या दिवशी जंगलात नेमके कुठे काय पहायचे हे ठरवता येईल. अनेकदा गावातील लोकं निसर्गाशी इतके परिचित झालेले असतात की त्यांना निसर्गातील काही घटना यात काही नाविन्य वाटेलच असे नाही. तेव्हा गावशिवारात काय-काय आहे ह्याचा अंदाज घ्या. कोणत्या भागात कोणती झाडे आहेत? करवंदाची जाळी कोणत्या माळाला आहे? जंगलात एखादी पाणथळ जागा असेल तर वेगवेगळ्या पक्षी आणि प्राणी यांच्या भेटीचा योग अधिक असतो.

पक्षी निरीक्षण हा एक छान अनुभव असतो. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी एखाद्या फुललेल्या झाडाजवळ, तास दोन तास बसून राहिलो तर किमान पाच सहा प्रकारचे पक्षी सहज पाहता येतात. तेही पारवा, कावळा व चिमणी हे पक्षी सोडून बरं का. ह्या झाडावर तेही येतात, मात्र आपल्या माहितीतील ह्या पक्ष्यांशिवाय इतर पक्षी, त्याचे आवाज, त्याचे वागणे हे सगळे टिपता येते. तेच फुललेलं झाड जर काटेसावरीचे असेल तर किमान दहा प्रकारचे पक्षी सहज पाहता येतात. कोल्हापूर येथील रमण कुलकर्णी नावाच्या मित्राने तर काटेसावरीच्या झाडावर चोवीस प्रकारचे पक्षी आल्याचे नोंदवले आहेत. निसर्ग अभ्यासक राजर टोरी पीटरसन्स पक्षी परिस्थितीचा लिटमस कागद असतात, असे म्हटले आहे. पक्ष्यांना सर्वात आधी वातावरणातील बदल, निसर्गातील संदेश लक्षात येतात. किडीवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम पक्षी करतात.

भारतात तीस हजारहून अधिक प्रकारच्या किडींची नोंद झालेली आहे. एक अळी एका दिवसात तिच्या वजनाच्या दोन पट पाने खाऊन पस्त करते. असे म्हटले जाते की, पक्षी जर नसते तर पृथ्वीचे वाळवंटच झाले असते. ह्या किडी खाऊन पृथ्वीला बहरण्यात पक्षीच तर मदत करीत असतात. मधमाशाचे पोळे असलेले एखादे झाड असेल तर तिथे कोतवाल पक्ष्याची करामत तुम्हाला पाहता येईल. पंखाने आधी माशा उडवणे, मग उडत्या माशांना हवेतच पकडून फस्त करणे हे त्याचे नित्याचे काम असते. हे असे चित्र मी कैकदा पाहिलं आहे. जंगलात भटकंती करणार्‍या कुणालाही हे दृश्य पाहता येते. कोतवाल पक्ष्याची दुसरी खासियत म्हणजे, तो वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज काढतो. तो इतर छोट्या मोठ्या पक्ष्यांच्या घरट्यांचे, अंड्याचे रक्षण करतो. म्हणून इतर पक्षी त्याच्या घराशेजारी आपले घर बांधतात. म्हणून तर त्याला कोतवाल असे नाव दिलं आहे. हे आपल्या जुन्या पिढीचे विज्ञानच तर आहे.

दोन मिनिटे डोळे बंद करून आवाज मोजण्याचे प्रयोग हा आपल्याला जंगलाच्या अधिक जवळ घेऊन जातो. प्राणायाम करताना शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितले जाते, तसे आपला थोडाही आवाज होऊ न देता दोन मिनिटे शांत राहिलो तर किमान सात आठ वेगवेळे निसर्गातील आवाज सहज ऐकता येतील. काही पक्षी हे आवाजानेच पाहावे लागतात. निसर्ग वाचण्यासाठी काही कोणती लिपी शिकावी लागत नाही. आपला आवाज बंद ठेवून कान आणि डोळे सतर्क ठेवले तर आपल्याला निसर्ग खूप वेगळ्या पद्धतीने दिसेल. आपल्या दैनंदिन जीवनातील धावपळ बाजूला ठेवून शांत, निश्चित निसर्गात वेळ घालवला तर खूपच ताजेतवाने होऊ. त्यातून पुढे वर्षभर कामासाठीची ऊर्जा मिळते.

जंगलात जाताना सोबत पुरेसे पिण्यास पाणी न्यावे. जंगलात तुम्ही तुमचा थोडाही कचरा करू नये. सहसा कचरा होईल अशा पॅकिंगच्या वस्तू सोबत नेणे टाळावे. अपरिहार्यपणे अशा गोष्टी न्याव्या लागल्या तरी आपला पूर्ण कचरा आपण सोबत घेऊन यावा. अनेकांना जंगलात गेलं की, भूतदया येते. माकडांना खाऊ दिले जाते. मात्र हे त्या माकडांच्या आरोग्यालाच घातक असते. बहुतेकवेळा ही बाब वनविभागात काम करणार्‍या अनेक अधिकारी कर्मचार्‍यांनाही माहिती नसते. त्यामुळे असे प्रकार टाळावेत.

जंगलातून येताना आठवण म्हणून काही बिया सोबत आणू शकता. येत्या पावसाळ्यात कुठूनतरी विकत आणलेलं झाड लावण्यापेक्षा बियापासून तुम्ही स्वतः रोपं बनवून त्याची लागवड करू शकता. जंगलात तुम्हाला जे झाड खूप आवडलं त्या झाडांच्या बिया जमा करा. काही झाडांच्या बिया आता लगेच मिळणार नाहीत. मात्र अशा झाडांचे जीवनचक्र समजून घ्या. पालवी कधी येते, फुलं कधी येतात, फळ किंवा शेंगा कधी लागतात, बिया कधी पक्व होतात. प्रत्येक झाडाच्या बिया नुसत्या तशाच रुजवल्या तर येत नाहीत. काही बियांवर विशिष्ट प्रक्रिया करावी लागते. काहीना थंड पाण्यात भिजत ठेवावे लागते, तर काहींना गरम पाण्यात. काही बिया ह्या शेणात भिजत ठेवाव्या लागतात. हिरड्यासारख्या बियांना थंडीचा शॉक द्यावा लागतो. त्या-त्या बियांच्या रचनेवरून आपल्याला हे अंदाज बांधता येऊ शकतात. आता जंगलात तुम्हाला बहाव्याच्या बिया सहज उपलब्ध होऊ शकतात. एकीकडे बहाव्याची पिवळी धमक फुलं आणि त्यांच्या मधोमध फुटभर लांब चॉकलेटी रंगाच्या शेंगा लोंबत असतात.

झाडांची स्वाक्षरी : कार्यक्रमात एखाद्या विषयतज्ज्ञ किंवा पाहुण्याला भेटल्यावर त्याची सही घेण्याचा छंद अनेकांना असतो. अशा सह्यांची वही जपून ठेवली जाते. जेव्हा केव्हा ही वही उघडून पाहू तेव्हा आठवणींना उजाळा मिळतो. अशीच सही आपण जंगलातील वेगवेळ्या झाडांची घेऊ शकतो. काही झाडांची खोडं ही भेगाळलेली असतात तर काहींची सफाईदार. भेगाळलेल्या खोडांचेदेखील वेगवेगळे पॅटर्न असतात. काही झाडांना उभ्या भेगा असतात तर काहींना आडव्या. काहींच्या सरळ रेषेत तर काहींच्या असमान वेड्या वाकड्या भेगा असतात. ह्या अशा वेगवेगळ्या खोडावर कोरा कागद ठेवून, वरच्या बाजूला पेन्सिल गिरवल्यास खोडाचे पॅटर्न कागदावर उमटतात. शाळेत असताना आपण नाण्यावर कागद ठेऊन असे अनेकदा केलेलं असेलही. हा उपक्रम आपल्या मुलांकडून करून घेणे खूपच मजेशीर बाब असते. यात मोठ्यांनाही खूप मजा येते. सोबतच वेगवेगळ्या प्रकरच्या खोडांची, झाडांची ओळख होते. ज्यांना अधिक आवड असेल त्यांनी हे शोधण्याचे प्रयत्न करावे की वेगवेगळ्या झाडावर अशा वेगवेगळ्या भेगा किंवा पॅटर्न का असतात? केनियामधील टॉड पाल्मर आणि त्याच्या सहकार्‍यांनी मिळून असाच एक मजेशीर अभ्यास केला आहे.

बाभळीचे झाड आणि मुंग्या याचा सहसंबंध शोधून काढला आहे. ह्या मुंग्यांना आकर्षित करण्यासाठी बाभळीचे झाड गोड रस सोडत असतं व राहण्यासाठी घर बनवत असतं. बाभळीच्या या सहकार्याच्या बदल्यात मुंग्याही झाडाचे रक्षण करतात. बाभळीचा पाला खाणार्‍या जंगली जनावरांना तेथून पळवून लावण्याचे काम मुंग्या करीत असतात. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपणही शोधू शकू. त्यासाठी निसर्गाच्या सहवासात जायला हवं. आता निसर्गही बहरलाय. चला फिरायला जाऊया, जंगल बोलावतंय.

-बसवंत विठाबाई बाबाराव
-(लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक आहेत.)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here