कालचा दशावतार आजही आहे तसाच !

दशावतार नाट्य ग्रामदेवतेच्या उत्सवात खेडोपाडी होत असतात. साधारण कार्तिक पौर्णिमेपासून ते चैत्र महिन्यापर्यंत हे नाट्य प्रयोग होत असतात. मालवणी मुलखात या नाट्य प्रकाराला धयकाले असेच म्हणतात. दशावतारी नाटकाची खासियत अशी की हे नाटक मध्यरात्री सुरू होऊन सकाळी संपते. साधारणपणे दशावतारी नाट्य हे विष्णूचे दहावतार दाखवून संपवले जाते. या दशावतारी नाटकात प्रथम, सूत्रधार, नंतर गणेशागमन, सरस्वती स्तुती असे क्रम आहेत. पारंपरिक आड दशावतार जे आजच्या मितीला गावच्या वार्षिक उत्सवात होतात त्याचे स्वरूप बघता असे जाणवते की, तो एक वार्षिक उत्सवाचा भाग म्हणून पूर्ण केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमाच्या काळात आणि विविध वाहिन्या दाखवणार्‍या केबल टीव्हीच्या जमान्यात ही लोककला तेवढा प्रभाव पडताना आढळत नाही.

दशावतार ही दक्षिण कोकणातली लोककला आहे, आणि मुख्य म्हणजे काळाच्या प्रवाहात आजही टिकून राहिली आहे. दशावतारी या संज्ञेचा अर्थ विशद करताना दश+अवतार म्हणजे दहा अवतार, परमेश्वराच्या दहा अवताराचे सोंग घेऊन जे नाटक सादर केले जाते त्याला दशावतारी नाटक असे म्हटले जाते. विष्णुच्या दहा अवताराचे जे नाट्यरुप दर्शन घडवले जाते त्याला दशावतारी नाट्य असे म्हटले जाते. हा नाट्य प्रकार दक्षिण कोकणात विशेषतः राजापूरपासून ते अगदी गोव्याच्या पेडणे महालांपर्यंत विकसित पावला. अभ्यासकांच्या मते हे नाट्य श्री. श्यामजी काळे यांनी इसवि सन 1728 च्या सुमारास कर्नाटकातून कोकणात आणले, म्हणून कर्नाटकातल्या यक्षगाणं आणि दशवतारात अनेक बाबी सारख्या आढळतात, म्हणून आजही तळकोकणात दशावतारी नाट्य सूत्रधार नाट्य सुरू होण्याअगोदर काळे बुवा, दशावतारास चला, अशी विनंती करताना आढळतो.

दशावतार नाट्य ग्रामदेवतेच्या उत्सवात खेडोपाडी होत असतात, साधारण कार्तिक पौर्णिमेपासून ते चैत्र महिन्यापर्यंत हे नाट्य प्रयोग होत असतात. मालवणी मुलखात या नाट्य प्रकाराला धयकाले असेच म्हणतात. दशावतारी नाटकाची खासियत अशी की हे नाटक मध्यरात्री सुरू होऊन सकाळी संपते. साधारणपणे दशावतारी नाट्य हे विष्णूचे दहा अवतार दाखवून संपवले जाते. या दशावतारी नाटकात प्रथम, सूत्रधार, नंतर गणेशागमन, सरस्वती स्तुती असे क्रम आहेत.

या दशावतार कलेत बहुतेक कोकणातील देवळीसमाज अग्रगण्य आहे, आजसुद्धा कोकणात किंवा अनेक ठिकाणी दशावतारी नाट्य चालू आहे.

दशावतारी कलाकार

कोकणातल्या बाबी नालंग, बाबी कलीगण, आजच्या काळातील ओमप्रकाश चव्हाण अशा कलाकारांनी या कलेचा ध्यास घेतला आहे, दशावतारी नाटकात जे कलाकार काम करतात त्यांनी आपले केस वाढवलेले असतात, दशवतारात स्त्री पात्र हे पुरुष कलाकारांचं करतो, या कलावंतांना, पार्टी असे संबोधले जाते, त्यात राजाचा अभिनय करणारे, राजपार्टी, स्त्रियांचा अभिनय करणारे, स्त्रीपार्टी, अजून कोण राक्षसपार्टी अशी अनेक कलावंत असतात, या नाटकाच्या वेळी रंगमंचावर फक्त एक मोठे बाकडे किंवा चोपळा ठेवला जातो हेच नेपथ्याचे सामान, बाकी साथीला म्हणून पेटीवाला, तबला वाजवणारा, आणि चकवा वाजवणारे रंगमंचावर एका बाजूला असतात, या नाटकांना ठराविक अशी लिखित स्वरूपाची संहिता नसते, नाटकातले कलावंत आपल्या ज्ञानाच्या जोरावर आणि शब्दसमर्थ्यावर आपल्याला आलेली भूमिका ठोस पार पाडतात.

या नाटकात युद्धाचा प्रसंग ज्यांनी बघितला आहे, त्यांना एक गोष्ट निदर्शनास येईल ती म्हणजे युद्धाच्या वेळी हे कलाकार विशिष्ट पदन्यास करत युद्ध करतात, हे पदन्यास मात्र विशिष्ट कलाकारांकडून ते शिकून घेतात, हे पदन्यास म्हणजे या नाटकाचा मूळ गाभा आहे. मागे मुंबईत एकदा एक कंपनी दशावतारी प्रयोग घेऊन आली होती त्यांच्या मालकाशी गप्पा मारताना ते म्हणाले की, ज्या कलाकाराला हा पदन्यास जमला त्याला अर्ध नाट्य जमले. पूर्वी हे कलाकार डोक्यावर कापडेपटाचा पेटारा घेऊन गावोगाव फिरत असत, पण आज काळ बदलला आहे, प्रत्येक दशावतारी कंपनी आपली गाडीने किंवा यजमानाने नेमून दिलेल्या वाहनाने प्रवास करते. त्यामुळे, रातचो राजा नि सकाळी उठल्यावर बोजा, ही जुनी म्हण दशावतारी कलावंतांना आज लागू पडत नाही. हे नाटक संपूर्णपणे प्रमाण भाषेत होते; पण या नाटकातील शंकासुर हे पात्र मात्र मालवणी बोलीत संवाद साधते. हे शंकासूर नावाचे पात्र चालू घडामोडीवर आपले भाष्य करते. या चालू घडामोडी बहुतेक राजकीय असतात, त्यातून अनेक अंगाने विनोदनिर्मिती होते. त्यामुळे संकासूर हे पात्र आबालवृद्ध यात लोकप्रिय आहे.

अभ्यासकांची मते

दशावतारासंदर्भात सावंतवाडी येथील ज्येष्ठ लेखक हरिहर आठलेकर यांनी दुसरे मालवणी संमेलनाच्या स्मरण पत्रिकेत मालवणी कलेचा राजा, दशावतार, या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यानुसार खालील निष्कर्ष मिळतील, दशवताराचे मूळ हे बंगाल येथे असून गोरे म्हणून एका शास्त्रीने ते कोकणात सादर केले. त्यासाठी त्यांनी सावंतवाडीच्या संस्थानिकांकडून नेमणुकीची सनद मिळवली, त्यानंतर गोरेंनी दशावतारी कंपनीची स्थापना केली आणि आपला पहिला प्रयोग वालावल येथे केला, तेव्हापासून दरवर्षी वालावलच्या देवळात कार्तिक शुद्ध एकादशीला गोरे मंडळीचा प्रयोग होत असतो. तसेच पुढे हे गोरे चेंदवन या ठिकाणी स्थायिक झाल्याने त्यांचा दुसरा प्रयोग चेंदवन गावी होतो. हा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दाखला आठलेकरांनी दिला.

त्याच प्रमाणे अर्जुन जयराम परब यांनी लोककला दशावतार या त्यांच्या ग्रंथात दशावतार, ही लोकांनी मोठी केलेली कला आहे. त्यामुळे ती लोकवेद-जनवेद आहे, असे मत प्रतिपादन केल्याचे आपणास आढळते.

पूर्वी एखादे पौराणिक कथानक घेऊन त्यानुसार हे नाट्य रचले जाई, संधीकालाच्या सुमारास ही दशावतारी मंडळी ज्या ठिकाणी नाटक होणार आहे त्याठिकाणी, एका तात्पुरत्या बांधलेल्या तंबूत, बल्बच्या प्रकाशात ही मंडळी आपला मेकअप करतात, आपले कपडे, मेकअप ही मंडळी स्वतःच करताना दिसतात. अर्जुन परब यांच्या ग्रंथात शेवटी मात्र, या लोककलावंतांचे शेवटचे जगणे कसे असते यावर भाष्य आहे, जे खूपच विदारक सत्य आहे. आजसुद्धा दशावतारी कलाकारांना मिळणारे मानधन हा चर्चेचा विषय आहे, दशवताराचे बाह्यरुप, म्हणजे भौतिकस्वरूप बदलले तरी कलाकार मंडळींची सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचे मानधन याबाबत आजही तेवढी जागरूकता समाजात नाही हे एक दुःख आहे. कामगार कल्याण मंडल येथे होणार्‍या दशावतार नाट्य स्पर्धा सोडल्या तर बाकी कलेच्या बाबत एक उपेक्षाच दिसते.

डॉ. महेश केळुस्कर यांनी आपल्या, मालवणी मुलखातील काही प्रयोगात्म लोककला या आपल्या पीएचडीसाठी सादर केलेल्या ग्रंथात दशावतारी लोककलेबद्दल लिहिताना, दशावतार हे एक मुक्त रंगपीठ असते, या दशावताराचा संबंध थेट धार्मिकतेशी असल्याने, याची सुरुवात जांब विधीने होते. नंतर पेटारा, मुखवटा यांची धार्मिक पूजा केली जाते, मगच नाटक उभे राहते. दशावताराचे एकूण स्वरूप बघितल्यावर, त्याचे संगीत, पार्श्वसंगीत ऐकल्यावर आपणास त्या प्रादेशिक संगीतकलेचा अनुभव येतो. लोककलावंत हा मुळात जन्माला यावा लागतो, तो प्रशिक्षण घेऊन तयार होत नाही.

दशावताराचे पारंपरिक स्वरूप
दशावतारात कोणतेही नेपथ्य नसल्याने, एखादी घटना कलावंत आपल्या अभिनयाने, संवादातून प्रकट करतो. उदा. एखादा आगीचा प्रसंग असेल तर रंगमंचावर प्रत्यक्ष आग लावली जात नाही, यावेळी हा लोककलावंत आपल्या संवादशक्तीने तो प्रसंग प्रेक्षकांसमोर उभा करतो, ही कला त्याने आपल्या वरिष्ठ लोककलाकाराचे अभिनय बघून आत्मसात केलेली असते. दशावतार या लोककलेला आजही लोकाश्रय मिळत आहे, दरवर्षी गावच्या जत्रेनिमित्त होणारे दशावतारी नाटक गावकरी मध्यरात्रीपासून दिवस उजडेपर्यंत डोळ्याची पापणी न हलवता, एका जागी खिळून बघायचे, पण लोककलाकाराच्या उतारवयातल्या जगण्याची काय सोय? हा मुद्दा आजही चिंतनाचा आहे, मध्यंतरी एक दशावतारी लोककलावंत हृदयविकाराचा झटका येऊन अंथरुणात होता, काही सामाजिक कार्यकर्ते, रसिक प्रेक्षक त्याच्या मदतीला धावले; पण प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही, या लोककलाकारांच्या भविष्याबद्दल आपण जागरूक असणे तेवढेच गरजेचे आहे. पूर्वीच्या काळी तळकोकणात मुख्यतः जत्रेत दशावतारी नाटक हे एकच मनोरंजनाचे माध्यम होते. त्यामुळे रात्रभर नाटक बघण्यासाठी लोक तयार असत. त्यात नाटकातील संहिता ही पौराणिक असल्याने तेव्हाचा भोळाभाबडा शेतकरी वर्ग त्यात रमून जायचा.

दशावतारी नाटकांचे सध्याचे स्वरूप

पारंपरिक आड दशावतार जे आजच्या मितीला गावच्या वार्षिक उत्सवात होतात त्याचे स्वरूप बघता असे जाणवते की, तो एक वार्षिक उत्सवाचा भाग म्हणून पूर्ण केला जातो. आजच्या सामाजिक माध्यमाच्या जमान्यात किंवा विविध वाहिन्या दाखवणार्‍या केबल टीव्हीच्या जमान्यात ही लोककला तेवढा प्रभाव पडताना आढळत नाही. रात्री देव देवळात आले की सकाळपर्यंत हे नाटक चालवायचे म्हणून कलाकार आपापल्या संवादात भर टाकताना आढळतात. त्यात सामाजिक प्रश्न किंवा राजकीय प्रश्न मांडताना आढळत नाहीत. याचेच कारण काही विशिष्ट कंपन्यांचे दशावतारी नाटके वगळता आडदशावतार सध्याच्या काळात आपला प्रभाव पडताना आढळत नाही, त्यात तोच तोचपणा आल्यासारखा वाटतो म्हणजे गणपती येतो, पूजा होते, सरस्वतीस्तुती नंतर संकासूर येऊन थोडे हसवतो. त्यात एखादा कलाकार आपल्या कलेने प्रयोग पुढे नेतो. पण त्याचवेळी समोरचा प्रेक्षक मात्र यात कुठेच नसतो. या प्रयोगाला असणारा प्रेक्षक म्हणजे साठीच्या पुढचा, हा प्रयोग तिशी-चाळीशीच्या प्रेक्षकांना आकर्षित करू शकत नाही हे या लोककलेतली गोम आहे.

वास्तविक काळाबरोबर या लोककलेत बदल होत गेला पाहिजे, परंतु या प्रयोगातून मिळणारे उत्पन्न हा एक महत्त्वाचा भाग आहे. आजही वार्षिक जत्रोत्सव करताना नाटकाला कमीतकमीत मानधनात कसे भागवता येईल याकडे गावकरी लक्ष ठेऊन असतात. त्यामुळे आर्थिक स्थित्यंतर नसल्याने ही कला पुढे कशी नेता येईल याबाबत कलाकार संभ्रमात आहेत. आज लोककलेच्या बाबतीत साठ वर्षांपासून ज्या समस्या होत्या त्याआजही कायम आहेत. आडदशावतारापेक्षा इतर दशावतार जनमानसात लोकप्रिय होण्याची हीच काही कारणे आपणास दिसून येतील.

भारुड, कठबाहुली, लळीत यासारख्या लोककलेतून सामाजिक प्रश्न हाताळले गेल्याचे आपणास लक्षात येईल हीच अपेक्षा आड दशावताराच्या माध्यमातून अपेक्षित आहे. खरेतर हाच लोककलेचा पाया आहे. हा पाया अजून स्थिर करण्यासाठी काळानुसार बदलण्याची गरज तर आहेच, शिवाय लोककलेकडे बघण्याची आपली दृष्टीकोन बदलायला हवा.