घरफिचर्समाणसे मेलीच पाहिजेत!

माणसे मेलीच पाहिजेत!

Subscribe

यवतमाळ जिल्ह्यात कोरडवाहू जमिनीची संख्या मोठी. पाऊस झाला तरच पीकपाणी, अन्यथा भूकमारी. अशा जगण्याच्या झोंबीत येथील कास्तकारांसमोर अवनी वाघिणीशी गेली दोन वर्षे रोज झुंज द्यावी लागत होती. ही दहशत होती. शेतीत काम करत असताना आणि गुरे चरवत असताना माणसे मारली गेली.

सरदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारताना त्याच्या पायथ्याशी नर्मदेच्या काठावर राहणारी माणसे जिवंत राहिली काय आणि मेली काय, याचा जसा विचार झाला नाही, तसाच प्रकार आता विदर्भातील मेलेल्या अवनी वाघिणीबाबत सुरू आहे. खरे तर 13 माणसांना खाणार्‍या अवनीचे प्राणीप्रेमी मनेकाबाई गांधी यांनी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारले पाहिजे… माणसे मेलीच पाहिजेत आणि नरभक्षक वाघ जिवंत राहिले पाहिजेत. मनेकाबाईंनी यासाठी मुंबई आणि दिल्लीत गारेगार ऑफिसमध्ये बसून अवनीच्या नावाने सतत अश्रू ढाळणार्‍या प्राणीमित्र संघटना आणि कार्यकर्त्यांची मदत घ्यायला हवी. माणसे मेली तरी हरकत नाही; पण त्यांना खाणारे वाघ जिवंत राहिले पाहिजेत, यासाठी त्यांना मिळणारा विदेशी पैसा नाही तर कधी कामाला येणार.

मेलेल्या 13 माणसांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली असताना त्यांना मदत करायला या प्राणिप्रेमींकडे पैसा नसेल; पण अवनीसाठी कोर्टात सतत याचिका दाखल करायला लाखो रुपये यांच्याकडे वाहतायत… नर्मदा धरणाने उद्ध्वस्त झालेल्या आदिवासींचे अजूनही नीट पुनर्वसन झालेले नाही. कुशीत धरण असून हंडाभर पाण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते, हाताला काम नाही. अशी जगण्याच्या परिघातून फेकली गेलेल्या माणसांना जिवंत राहण्याचा हक्क नाही. ती मेलीच पाहिजेत. जशी अवनीने 13 माणसांना ठार केली तशीच…

- Advertisement -

मी गेली काही वर्षे विदर्भात अगदी गडचिरोलीच्या टोकावरील भामरागडपर्यंत आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या गावांत बातमीदार म्हणून फिरलो आहे. एका परिसराने जगता येत नाही म्हणून हातात बंदुका घेतल्या आहेत आणि दुसर्‍या भागाने रोज मरण्यापेक्षा एकदाच गळ्याला फास लावून जीव संपवला आहे. देशातील सर्वाधिक आत्महत्या असणारा हा जिल्हा आजही तसाच आहे. शेतकर्‍यांच्या या अवस्थेला काँग्रेसचा नालायक कारभार कारणीभूत आहे म्हणून त्यांच्या नावाने रोज शिमगा करणारी भाजप आणि शिवसेनेने गेल्या 4 वर्षांत गडचिरोली आणि यवतमाळमध्ये मोठी हरितक्रांती केलेली नाही. जशी 4 वर्षांपूर्वी माणसे जगत होती, तशीच ती आजही जगत आहेत… मरता येत नाही म्हणून जगतायत. अशा माणसांना अवनीने मारले तर काय फरक पडतो. मात्र अवनी गेली, फारच वाईट झाले! नीट जगता येत नाही म्हणून कोणी हौस म्हणून हाती बंदूक घेत नाही आणि आपल्या माणसांना जगवता येत नाही म्हणून लगेच कोणी विषाचा प्याला तोंडाला लावत नाही… ती एक जीवाची प्रचंड घालमेल असते. अनेक दिवसांची आणि रोज मेल्याची.

यवतमाळ जिल्ह्यात कोरडवाहू जमिनीची संख्या मोठी. पाऊस झाला तरच पीकपाणी, अन्यथा भूकमारी. अशा जगण्याच्या झोंबीत येथील कास्तकारांसमोर अवनी वाघिणीशी गेली दोन वर्षे रोज झुंज द्यावी लागत होती. ही दहशत होती. शेतीत काम करत असताना आणि गुरे चरवत असताना माणसे मारली गेली. मात्र उत्तर भारतीयांच्या नावाने दिवसा गळे काढून आणि रात्री मतांचा हिशोब मांडणार्‍या काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मेलेली माणसे सकाळी उघड्यावर शौचाला गेली होती, असा जावई शोध लावला… निरुपम हे महाराष्ट्राचे जावई असल्याने त्यांच्या या शोधाला डॉक्टरेट दिली पाहिजे. फडणवीस सरकारच्या हागणदारीमुक्त महाराष्ट्राच्या घोषणेची चिरफाड करायची असेल तर मेलेल्या माणसांच्या शिल्लक राहिलेल्या कुटुंबाच्या जीवाला तरी त्रास देऊ नका, निरुपमसाहेब! तुम्हाला फडणवीसांची पोलखोल करायची असेल तर दूर यवतमाळला दुर्बीण कशाला लावता. कांदिवली, मालाड, गोरेगाव, माहिम, सायन अशा रेल्वे स्टेशनला पहाटे भेट द्या. तेथे तुमचे उत्तर प्रदेश आणि बिहारचे अनेक नातेवाईक सकाळचे विधी उरकताना दिसतील. त्यांना आधी गुलाब द्या आणि त्याच अवस्थेतील त्यांचे फोटो काढून मुख्यमंत्र्यांना पाठवा. फडणवीसांवर राजकीय टीका करायची म्हणून मेलेल्या माणसांना कशाला वरून खाली आणता…

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून वन खात्याकडून अवनीला जेरबंद करण्याचा प्रयत्न केला जात होता. पांढरकवडा वनविभागात वाघांची १० पेक्षा अधिक संख्या आहे. विशेष म्हणजे तेथील जंगलांची क्षमता संपली असून जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. मागील २ वर्षांत अवनीला ५ वेळा ट्रँक्विलाइज करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ज्या दिवशी ती मारली गेली त्या दिवशीही ग्रामस्थांना ती दिसली होती. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारली जाऊ नये म्हणून विशेष चमू त्या ठिकाणी गेला असता वनअधिकार्‍यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला होता. पण ती आणखी उत्तेजित झाली आणि वन विभाग चमूच्या वाहनावर ती झेपावली व त्यांनी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली. हा अपघाती मृत्यू असतानाही त्यावर होत असलेला वाद अतिशय लाज आणणारा आहे.

यवतमाळ येथील पांढरकवडा वन विभागात वाघिणीने दहशत माजविल्यानंतर राळेगाव केळापूर तालुक्यातील ७० आदिवासीबहुल खेड्यात सुमारे १ लाखांवर शेतकरी व आदिवासी सतत दहशतीला जगत होते. एक एक करत या वाघिणीने १३ लोकांचा जीव घेतल्याने या परिसरातील जनजीवन जवळ जवळ संपले होते. शेती व्यवसाय ठप्प झाला होता आणि वन खाते तसेच महसूल अधिकार्‍यांवर प्रचंड असंतोष वाढला होता. अनेक वेळा आंदोलनसुद्धा हिंसक झाले. त्यानंतर वन अधिकार्‍यांनी अवनीला जेरबंद करण्यासाठी मोहीम उघडली खरी, तर त्याला नख लावण्याचा प्रकार दिल्ली, मुंबई, पुण्याला बसलेल्या प्राणीप्रेमींकडून सुरू झाला. उच्च न्यायालयात वारंवार वनखात्याविरोधात जनहित याचिका दाखल करून ही मोहीम बंद पाडली गेली.

शेवटी सुप्रीम कोर्टाने वनअधिकार्‍यांना राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्याही आदेशाला वारंवार प्राणीप्रेमींनी रोखण्याचा सतत प्रयत्न केला. मात्र, ७० आदिवासीबहुल खेड्यात सुमारे १ लाख लोकांना वाचविण्यासाठी मोहीम कायम ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला गेला. तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचार्‍यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामीटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात यश येत नव्हते. अखेर या शोध चमूवर तिने हल्ला केल्यानंतर अवनीला गोळ्या घातल्या गेल्या.

या सर्व प्रकारानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. अर्थातच यात मनेका गांधी आघाडीवर होत्या. सारासार विचार करता या प्रकरणानंतर मनेकाबाईंनी आधी सुधीरभाऊंना फोन करून माहिती घेणे अपेक्षित होते किंवा मंत्र्यांशी बोलायला त्यांना फार त्रास झाला असता तर त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बातचीत करून प्रकार समजून घ्यायला हवा होता. मात्र तसे काही न करता बाईंनी सोशल मीडियावरून मुनगंटीवार हेच कसे मारेकरी आहेत, हे दळण दळायला सुरुवात केली.

याचा परिणाम असा झाला की टीव्ही मीडियालाही चेव आला आणि त्यांनी कोर्ट मार्शल करत मुनगंटीवार आणि वन विभाग यांना दोषी ठरवून मोकळे झाले. हे कमी म्हणून की काय वाघांवर प्रचंड प्रेम करणार्‍या ‘मातोश्री’लाही जाग आली. बाळराजे आदित्य ठाकरे यांच्या तर डोळ्यातून पाण्याच्या गंगा वाहू लागल्या. त्यांना गेले काही दिवस अन्नही गोड लागत नाही, असे समजते. अवनी वाघिण आणि माणूस ही लढाई काही आजकालची नव्हती. दोन वर्षे सुरू होती. हा नक्की काय प्रकार आहे, हे युवराजाना माहीत करून घेता आले असते. पण त्यासाठी आधी त्यांना तर मातोश्री सोडावी लागली असती. त्यानंतर मेलेल्या 13 जणांच्या शिल्लक राहिलेल्या कुटुंबाला भेटता आले असते, माणसांची विचारपूस करता आली असती किंवा या भागात मुक्काम ठोकून अवनीचे दर्शनही त्यांना घेता आले असते.

मात्र मुंबईच्या नाईट लाईफचे समर्थन करण्याएवढे हे काम सोपे नसल्याने त्यांनी दुर्लक्ष केले आणि अवनीचा मृत्यू होताच सोशल मीडियावरून बाळराजे मुनगंटीवार यांच्यावर संतापले. आता बाळराजे यांना झालेले अमाप दुःख पाहून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असा सतत जप करणार्‍या उद्धव ठाकरे यांनाही खूप खूप वेदना झाल्या आणि त्यांनी अधिवेशनात मुनगंटीवार यांना घेरण्याचे आदेश दिले… माणसे मेल्याचे दुःख नाही, नरभक्षक वाघीण मेली, फार वाईट झाले! मातोश्रीने थोडी माहिती घेतल्यास एक लक्षात येईल की तुमच्या युती सरकारच्या काळात एकट्या विदर्भात 24 पेक्षा जास्त वाघ वाढले आहेत आणि उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेले व्याघ्र पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे. ताडोबा आणि आजूबाजूच्या जंगलांमध्ये आता वाघ सुरक्षित आहेत. जैविक साखळीतील हा सर्वात महत्त्वाचा प्राणी वाढतो आहे.

आनंदाची बातमी आहे; पण माणसांना खाणारी एक वाघिण काय मेली तर मनेकाबाईंसकट सर्व राजकीय लोकांनी साप समजून भुई थोपटायला सुरुवात केली… यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतली. या दोन जणांनी मिळून आणखी एक शोध लावला. राळेगाव परिसरात जंगल नाही, वाघ नाही असे दाखवून फडणवीस सरकारला हा परिसर अनिल अंबानी यांना औष्णिक प्रकल्पासाठी घशात घालायचा आहे. यासाठी अवनीला ठरवून मारण्यात आले. जयंत पाटील यांच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात याच भागात किती प्रकल्प आणले गेले याचीही त्यांनी माहिती द्यावी. चंद्रपूर जिल्हा तर जगातील सर्वात प्रदूषित जिल्हा जयंतराव तुमच्या काळात तर बनला. आता मगरीचे अश्रू काढून काय फायदा. आता राष्ट्रवादीचे नेते रडतात म्हणून राज ठाकरे यांचाही गळा भरून आला आहे. शरद पवार यांच्याबरोबर वाढलेल्या मैत्रीचा हा परिणाम असू शकतो… राजकारणात काहीही होऊ शकते!

सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये यावर्षी ४ वाघिणी बाहेर आल्या आहेत. झरी, केळापूर, मारेगाव, वणी, राळेगाव येथे सध्या ९ वाघिणींचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरू आहे. त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या वाघिणीच्या वणी कोळसा खदानीच्या परिसरात हैदोस सुरू झाला आहे. यामुळे अवनी वाघिणी मेल्याने हा वाद संपणारा नसून या परिसरातील सुमारे ५ लाखांवर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे.

मनेकाबाई यवतमाळला तथाकथित योग गुरूला भेटण्यासाठी काही दिवसांपूर्वी आल्या होत्या. आपल्या आणि आपल्या मुलाचे राजकीय भविष्य काय असेल याची माहिती घ्यायला. कारण पंतप्रधान मोदी विचारत नसल्यामुळे बाई चिंतेत आहेत. मात्र पत्रिका, हातबित आणि भाग्य बघून झाल्यानंतर थोडा वेळ काढून भारताच्या महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या या बाईंनी अवनीच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबातील महिला आणि बालके यांच्या उपासमारीची विचारपूस केली असती आणि वाघिणीचा बंदोबस्त करा, असे आदेश दिले असते तर बाईंना आपल्या खात्याच्या नावाची आब राखता आली असती. पण, बाईंना माणसांपेक्षा नरभक्षक वाघिण महत्त्वाची वाटते… बरोबर आहे त्यांचे. माणसे मेलीच पाहिजेत!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -