घरफिचर्समॉब लिंचिंग : किती खरे किती खोटे !

मॉब लिंचिंग : किती खरे किती खोटे !

Subscribe

गो-रक्षकांकडून झालेल्या मारहाणीचे कुणीही समर्थन करणार नाही. मात्र, म्हणून सर्वच प्रकरणांमध्ये हिंदुत्ववाद्यांना दोषी ठरवण्याचा दुराग्रह दिसून येत आहे. अनेक प्रकरणांत ‘जय श्रीराम’चा नारा देत नाही म्हणून मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे, तशा तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वच तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे समोर येत आहे.

सध्या मॉब लिंचिंग या मुद्यावरून समाजकारण ढवळून निघत आहे. ‘जय श्रीराम’ चा जयघोष करत हिंदू धर्मीयांकडून अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप मोठ्या प्रमाणात देशातील सर्व बाजूंनी एकाच वेळी करण्यात येत आहे. असा आरोप करणारे कालपर्यंत माध्यमांसमोर बोलत होते, ठिकठिकाणी चर्चासत्रे घेत होते, आता गटागटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवत आहेत, त्यात ४९ विचारवंतांचाही गट आहे. विचारवंतांच्या पत्रात १ जानेवारी २००९ ते २९ ऑक्टोबर २०१८ या कालखंडात धर्माच्या आधारे २५४ मॉब लिंचिंग (झुंडशाही)ची प्रकरणे घडली, ज्यात ९१ जणांचा मृत्यू झाला, विशेष म्हणजे यातील ९० टक्केे घटना या २०१४ नंतरच्या आहेत, असे आवर्जून यात नमुद करण्यात आले आहे. म्हणजे भाजपचे सरकार आल्यानंतर मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्याचे अप्रत्यक्षपणे या पत्रात म्हटले आहे. गो-रक्षकांकडून झालेल्या मारहाणीचे कुणीही समर्थन करणार नाही. मात्र, म्हणून सर्वच प्रकरणांमध्ये हिंदुत्ववाद्यांना दोषी ठरवण्याचा दुराग्रह दिसून येत आहे. अनेक प्रकरणांत ‘जय श्रीराम’चा नारा देत नाही म्हणून मारहाण करण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे, तशा तक्रारीही झाल्या आहेत. मात्र, त्यातील सर्वच तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचे समोर येत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबादमध्येही ‘जय श्रीराम म्हणा नाही तर मारहाण करू…’ अशा धमक्या दिल्या जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तर हडको कॉर्नर येथे ‘जय श्रीराम’ म्हणत नाही, म्हणून एक मुसलमान तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. या घटनेवरून एमआयएमच्या नगरसेवकाने बरेच वातावरण तापवले, पण हा निव्वळ बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तसे औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले. हडको कॉर्नर येथे ‘जय श्रीराम’ म्हणण्याची जबरदस्ती करण्यात आली नव्हती, तेथे केवळ किरकोळ भांडण झाले होते. तिथे ‘जय श्रीराम’ घोषणा दिली नाही तर मारहाण करू, असे घडलेच नव्हते, असे पोलीस तपासात उघड झाले. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात तक्रारदारानेच तशी कबुली पोलिसांना दिली होती, असेही वृत्त आहे. त्यामुळे खोट्या तक्रारी करणार्‍यांना क्षमा नाही, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला.

- Advertisement -

अशारीतीने देशात बहुसंख्य हिंदूंविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचे यामागे षड्यंत्र आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण ज्या ज्या प्रकरणांमध्ये ‘जय श्रीराम’ची घोषणा देत हिंदूंनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला, त्यातील काही प्रकरणांच्या चौकशीनंतर त्या घटनेच्या वेळी ‘जय श्रीराम’ घोषणेचा दुरान्वयाने संबंध नसल्याचे जर उघडकीस येत असेल, तर याचा अर्थ हिंदूंविरोधात बनाव निर्माण करून देशभरात हिंदुत्ववादी हैदोस घालत असल्याची वातावरणनिर्मिती करण्यात येत आहे, असे म्हणायला वाव आहे. यातून देशांतर्गत असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, कारण या वाक्यालाही पुष्टी देणारी घटना घडली आहे. जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या मुद्याचा आधार घेत स्वतःचे रक्षण करण्यासाठी शस्त्र बाळगण्याचे आवाहन शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाद यांनी मुसलमानांना केले आहे. विशेष म्हणजे मौलाना कल्बे जवाद यांनी पत्रकार परिषद घेऊन असे आवाहन करण्याचे धारिष्ठ्य दाखवले आहे. त्याही पुढे जाऊन ‘कायदेशीररित्या शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सरकार दरबारी कसे प्रयत्न करायचे?, याविषयीचे मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रमच मौलाना कल्बे जवाद यांनी हाती घेतला आहे. जवाद यांची ही चिथावणी प्रसारमाध्यमे, प्रशासन, पोलीस किंवा शासन यांनी मनावर घेतलेली दिसत नाही. त्यामुळे याविषयी कुठेच चर्चा किंवा वार्तालाप झाल्याचे ऐकिवात नाही. यातून हिंदू हिंसक, मारक आणि मुसलमान शांत, गरीब असे चित्र मुसलमानांचे धर्मगुरू रंगवत आहेत आणि स्वसंरक्षणाच्या नावाखाली शस्त्र बाळगण्यासाठी मुस्लिमांना उद्युक्त करत आहेत. याला पुरोगामी, निधर्मीवादी आणि कथित विचारवंत हेही खतपाणी घालत आहेत. ‘आम्हाला शस्त्र बाळगण्यासाठी हिंदूंनी भाग पाडले’, असे जगाला सांगून सहानुभूती मिळवून कायद्याचा आधार घेऊन जातीय दंगल घडवण्याचा कट भारतात शिजत आहे का, अशी शंका यामुळे येते.

या कटाकडे दुर्लक्ष केले, तर भारतात मोठे गृहयुद्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरेतर हिंसा हिंदूंनी घडवली किंवा मुसलमानांनी घडवली, ती निषेधार्हच आहे. धार्मिक सलोखा राखणे हे देशहितासाठी सर्व नागरिकांचे प्रथम प्राधान्य असणे अपेक्षित आहे. देशाच्या सत्तास्थानी भाजप सरकार आहे. त्यांना स्पष्ट बहुमत प्राप्त आहे. त्यामुळे सरकार जर आकड्यांच्या जोरावर अस्थिर करता येत नसेल, तर धार्मिक द्वेष पसरवत देशात ठिकठिकाणी दंगली घडवून देश अस्थिर करण्याचे कारस्थान कुणी रचत असेल, तर ते देशद्रोही ठरतात. मॉब लिंचिंगच्या घटनांचा जर खरोखरीच मागोवा घ्यायचा असेल, तर मग राजस्थानमधील अलवर येथे हरिश नावाच्या हिंदू तरुणाला कोणी ठार मारले? काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगर येथे हिंदूंच्या शिवमंदिरावर कोणी हल्ले केले? महाराष्ट्रातील हिंगोली येथे पेट्रोलपंपावर क्षुल्लक कारणावरून तेथील हिंदू कर्मचार्‍याला कोणी मारहाण केली? महाराष्ट्रात आजवर गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव या काळात मिरवणुका निघाल्यावर त्यांच्यावर मशिदींमधून दगडफेक करण्याच्या घटना घडल्या, त्या कुणी केल्या? आझाद मैदानात रझा अकादमीने मोर्चा काढला होता, त्यावेळी महिला पोलिसांचे कपडे फाडून त्यांचा विनयभंग केला, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मारहाण करून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला, या घटना कुणी केल्या? याची उत्तरे मौलाना कल्बे जवाद आणि त्यांच्या पाठीराख्यांनी देणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

शस्त्र बाळगण्याचे आवाहन करणारे मौलाना कल्बे जवाद ही काही पहिली व्यक्ती नाही. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टातील वकील अ‍ॅड. महमूद प्राचा यांनीही मुसलमानांना शस्त्र बाळगण्याचे आवाहन केले होते. एजाज खान या अभिनेत्याने सामाजिक माध्यमावर अशाच आशयाचे चिथावणीखोर वक्तव्य केले होते. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी तर वारंवार हिंसक वक्तव्य करतात, यावरून भारतातील एका विशिष्ट समाजातील सर्वच स्तरांवरील लोक शस्त्र हाती घेण्याची भाषा करू लागले आहेत, हे लक्षात येते. सर्वच जणांनी एका विशिष्ट कालावधीत असे विधान करणे, हे संशयास्पद आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन यांची जबाबदारी वाढली आहे. आतापर्यंत देशात जिथे जिथे दंगली झाल्या, त्या पूर्वनियोजित होत्या. आताही अशी आवाहने करणे, हा मोठ्या षड्यंत्राचा भाग असू शकतो. हे पोलीस आणि प्रशासन यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. भारतात एकाच वेळी असा हिंसक जमाव रस्त्यावर उतरवून त्याने दहशत माजवल्यास परिस्थिती हाताळण्यास प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे का? मुंबईत आझाद मैदानाच्या परिसरात झालेल्या दंगलीच्या वेळी पोलिसांवर आक्रमण झाले. त्या वेळी हिंसक जमावासमोर पोलीस हतबल होते. भारतभर एकाच वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली, तर ती कशी हाताळणार? आगामी गृहयुद्धाची ही पेरणी आहे का? त्यामुळे मॉब लिंचिंग या घटनांच्या नावाखाली देशात हिंदू-मुसलमान यांच्यात द्वेष पसरवला जात आहे का, या दृष्टीनेही आता याचा तपास होणे गरजेचे आहे, कारण मौलाना, मौलवींकडून मुसलमान बांधवांना शस्त्रे बाळगण्याचे आवाहन केले जाऊ लागले आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -