घरफिचर्ससंपादकीय : गनिमी नव्हे; ‘मोदी’ कावा!

संपादकीय : गनिमी नव्हे; ‘मोदी’ कावा!

Subscribe

‘गनीम’ या मूळ फारसी भाषेतील शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आहे लढाईतील शत्रू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाही आणि निजामशाहीने हा शब्द मराठा सैनिकांना, मावळ्यांना बहाल केला होता. तत्कालीन बलाढ्य अशा या साम्राज्याकडे सैन्य, दारूगोळा आणि युद्ध सामुग्रीही त्यांच्या सत्तावैभवाला शोभेल अशीच विपुल होती. तरीही छत्रपतींच्या मावळ्यांसोबत होणार्‍या युद्धात ते हरत. इतकी सर्व अनुकूलता असूनही हरण्याचे कारण काय द्यायचे, तर ‘गनिमांनी म्हणजेच मराठा सैनिकांनी काव्याने लढाई केली, म्हणून ते जिंकले; नाही तर आपल्या महाकाय सैन्यापुढे एरवी त्यांचा निभाव अशक्यच.’ यातील ‘कावा’ चा अर्थ आहे चतुराई किंवा सरळसरळ ‘कपट’ असाच होतो. मराठ्यांच्या शत्रूंनी त्यांच्या युद्धतंत्राला ‘गनिमी कावा’ संबोधले आणि पुढे हा शब्द त्याच अर्थाने रूढ झाला. तर अशा या काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल करणे, हा पहिला उद्देश असतो. शत्रू बेसावध असताना हल्ला करणे आणि आपले सैन्य कमी असताना ते जास्त असल्याचे शत्रूला भासविणे या प्रकारचे तंत्र अवलंबून छत्रपती शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या. म्हणूनच या ‘गनिमी काव्या’चा त्या काळात शत्रूने धसका घेतला होता. प्राचीन भारतीय राजनीतीमध्ये प्रकाशयुद्ध, कुटयुद्ध आणि तुष्णीयुद्ध असे प्रकार नमूद केलेले आहेत. कौटिल्य म्हणतो की जेव्हा प्रकाशयुद्ध- म्हणजे दिवसा वेळ ठरवून समोरासमोर केलेले युद्ध- शक्य नसेल, तेव्हा कुटयुद्ध करावे. शत्रूचे सैन्य आपल्यापेक्षा बलाढ्य असेल, तर कुटयुद्ध करतात. उदा. शत्रूचे सैन्य डोंगर चढताना किंवा उतरताना, नदी पार करताना, गिरीदुर्ग, वनदुर्ग किंवा पाणथळ जागा, वादळी वारा सुटला असताना, वातावरण धुक्याने भरलेले असताना शत्रू स्थळावर आक्रमण करावे. तसेच रात्रीच्या वेळेसदेखील हल्ले करावेत.

सांप्रत काळी लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा जवळ आला आहे. भारत देशाने विविध क्षेत्रात प्रगती केलेली आहे. ज्या ठिकाणी प्रगती करणे शक्य नाही, अशा विमाननिर्मितीच्या क्षेत्रात राफेल सारखी विमाने दुसर्‍या देशाकडून खरेदी केली जात आहेत. देशाच्या या अशा विकासपर्वात मध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी काव्या’चा विषय कुठून आला? तसा तो आला याचे कारण म्हणजे देशाचे विद्यमान पंतप्रधान सन्माननीय, आदरणीय, महनीय श्रीमान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. त्यांनी वायूयुद्धतंत्रासंदर्भात भल्या भल्या वैज्ञानिकांनाही तोंडात बोट घालायला लावेल, अशा पद्धतीने केलेल्या आणि आतापर्यंत अतिशय गोपनीय ठेवलेल्या ‘रडार मंत्रा’मुळे. ढगाळविमाने शत्रूच्या रडारवर येणार नाहीत, असे ते अत्यंत अनमोल वक्तव्य. खरे तर गोपनीयतेच्या कारणामुळे मोदींची ही विज्ञानगुपितं ते कुणाला सांगणारच नव्हते मुळी. जर लोकसभेच्या निवडणुका आणखी चार वर्षांनी असत्या, तर कदाचित चार वर्षे तरी सामान्य जनतेला पंतप्रधानांकडील ही मौलिक आणि गोपनीय माहिती समजली नसती. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळातच लोकसभा मतदानाचा शेवटचा टप्पा शिल्लक असल्याकारणाने त्यांनी हे गुपित एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत फोडले आणि सध्या अपेक्षेप्रमाणे यत्र-तत्र-सर्वत्र त्याची आणि सोबत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचीच चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

खरे तर त्यांच्या या मौलिक मार्गदर्शनानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांना पंतप्रधान वा प्रधानसेवक याऐवजी थेट छत्रपती अशी पदवी दिली असती तरी चाललं असतं. (काहींनी खासगीत गुप्तपणे तशी ती दिलीही असेल), पण सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देशात लोकशाही अजूनही थोडीफार शिल्लक आहे. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला असावा, पण महाराष्ट्रात २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्यानंतर भाजपने जे काही जाहिरात पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यात सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत थोडीफार जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रालाही दिली गेली होती. त्यात एक घोषणावजा आवाहन होते, ‘ छत्रपतींचा आशीर्वाद-चला देऊया मोदींना साथ’ ! १९ सप्टेंबर २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या एका प्रचारसभेत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आश्वासनही दिले होते ते असे, ‘ज्याप्रकारे छत्रपतींनी रयतेचे राज्य स्थापन केले त्याचप्रकारे आमचे राज्य चालेल. मा. नरेंद्रभाई मोदी यांनी रायगडावर नतमस्तक होऊन ऊर्जा मिळवली. छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सरकार येईल तेच रयतेचे राज्य स्थापन करू शकते.’ पुढे छत्रपतींच्या नावावर राज्यात जागा वाढलेल्या भाजपने सत्ता स्थापन केली आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीही झाले.

पुढे निवडणूकपूर्व घोषणेप्रमाणे छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले रयतेचे राज्य खरंच अवतरले का? महाराष्ट्रासह देशातील बेरोजगारी, गरिबी, जातीयवाद, धर्मांधता, आरोग्याची समस्या, पाणीटंचाई, मानवनिर्मित आणि नैसर्गिक दुष्काळ, महागाईत वाढ, शेतमालाला रास्तभाव आणि शेतीच्या सिंचनाचे प्रश्न अशा अनेक समस्यांचे खरंच निवारण झालेय का? रयतेला निर्भीडपणे बोलतं केलं, तर रयत सांगू शकेल राज्य शिवरायांचं आलं की अन्य कुणाचं? पाच वर्षांपूर्वी शिवरायांचा आशीर्वाद घेणारे मोदी निवडणूक होण्याच्या काही काळ आधी सोशल मीडियावर थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी मिळत्या जुळत्या छबीतच अवतरले, त्याचा भरमसाठ प्रसार होऊ लागला. मोदी भक्तांनी त्यांना थेट महाराजांचा अवतारच करून टाकले, पण अजूनही मूळच्या छत्रपती शिवरायांबद्दलच्या जनतेच्या भावना संवेदनशील असल्याने भक्त आणि कार्यकर्त्यांच्या भावनेला स्वत: मोदींनीच गांभीर्याने घेतले नाही. मात्र, आपण बरेचशे सर्जिकल स्ट्राईक कसे केलेत? ढगाळ हवामान असतानाही विमाने उडविली किंवा ‘गनिमी काव्याचा’ कसा वापर केला? आपली छाती कशी ५६ इंचाची किंवा निधडी आहे, हे सांगून विद्यमान पंतप्रधान भाजपसाठी मते मागत आहेत. शिवाय या वक्तव्यांतून आपली प्रतिमा शिवछत्रपतींच्या जवळ जाणारी कशी आहे? असेही आडून आडून सुचवित आहेत.

- Advertisement -

विशेष म्हणजे केवळ पाच वर्षांमध्येच हा चमत्कृतीपूर्ण बदल त्यांच्या प्रतिमेत झाला आहे. सामान्यांना तो कदाचित दिसणार नाही, पण त्यांच्या भक्तांना मात्र ते पूर्णपणे अवतारी असल्यासारखे वाटते. आता आपणच अवतार झाल्यानंतर मग निवडणुकीच्या प्रचारपत्रकात छत्रपतींची साथ पाहिजे कशाला? म्हणून मग यंदा तेही गायब झाले. त्याऐवजी ‘फिर एक बार मोदी सरकार’ ने आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ या घोषणा आल्या आहेत. येणार्‍या काळात हेच सरकार सत्तेत राहिले, तर मुंबईच्या समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कदाचित होणारही नाही. कारण जे आपल्यात नाहीत त्यांचे स्मारक करतात, अवतारस्वरूपात सांप्रतकाली महाराज जर भूतलावर वावरत असतील, तर त्यांचे स्मारक करणे उचित होणार नाही असेही भक्तांना वाटू शकेल कदाचित. म्हणूनच ढग, विमान आणि रडारबद्दल द्रष्टे वक्तव्य केल्याबद्दल कदाचित लवकरच – शिवरायांचे युद्धातील तंत्र असलेला ‘गनिमी कावा’ हा शब्दप्रयोग कालबाह्य होईल आणि त्याची जागा घेईल विकास पावलेला नवा शब्द ‘मोदीकावा’!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -