नटसम्राटाची नाही, एका पित्याची वैश्विक शोकांतिका

किंग लियर ही शेक्सपियरची अजरामर शोकांतिका सतराव्या शतकाच्या आरंभी रंगमंचावर आली. ब्रिटनचा राजा लियर आपले राज्य, तीन मुलींपैकी छोटीला बाजूला करून, दोघींत वाटतो ज्या उतारवयात त्याला वाईट वागणूक देतात. मूळचा विक्षिप्त राजा मग भ्रमिष्ट होत, सैरभैर भटकत राहतो. लियरचे कथानक कोणत्याही काळातील, कोणत्याही बापाशी रीलेट होणारे. त्यामुळे ते तीन शतकांनंतर ही वेगवेगळ्या स्वरुपात जगाच्या पाठीवर अविरत प्रयोगात आहे.

Mumbai
Natsamrat

मराठीत त्याचे रूपांतर वि. वा. शिरवाडकरांनी केले ते नटसम्राट. १९७० साली त्याच्या मूळ प्रयोगात होते डॉक्टर श्रीराम लागू आणि शांता जोग. दिग्दर्शन केले होते दारव्हेकर मास्तरांनी. या नंतर दत्ता भट, सतीश दुभाषींपासून ते रजतपटावर नाना पाटेकरांपर्यंत अनेकांना नटसम्राटाचे आव्हान पेलण्याचा मोह झाला. याचे कारण शिरवाडकरांच्या लेखणीत आहे. त्यांच्यातील कवीने नटसम्राट हे एखाद्या महाकाव्यासारखेच लिहिले आहे. त्यातील संवादांना एक लय आहे. ज्या काळात ते लिहिले गेले, त्या काळातील पल्लेदार संवादी पटावर ते खुलते आणि प्रेक्षकांनाही ते त्यामुळेच रिझवते. असे करताना त्यामध्ये एक मेलोड्रामा दडलेला आहेच. सत्तरीच्या दशकांत त्याचे तसे असणे हा दोष नव्हता. त्यामुळे नटसम्राटमधील अप्पा बेलवलकरांची शोकांतिका ही, नटसम्राटाच्या शोकांतिकेआडून बापाची शोकांतिका दाखवत होती. रंगमंचावर शिरवाडकरांचे काव्यात्मक संवाद आणि नटसम्राटाची आतषबाजी, हे दोन महत्वाचे गुण पहायला प्रेक्षक गर्दी करत. त्यातील मेलोड्रामाची त्यांना फिकीर नसे.

पन्नास वर्षांनंतर आज त्या कृतीला साकारताना दोन महत्वाचे मुद्दे येतात. एक- ही नटसम्राटाच्या आयुष्याचा बॅकड्रॉप असलेल्या एका बापाची शोकांतिका कशी होईल? आणि दोन- तिला संभाव्य मेलोड्रामापासून दूर कसे ठेवता येईल? आजच्या दिग्दर्शकांनी म्हणजे रजतपटावर महेश मांजरेकर यांनी आणि नाटकात ऋषिकेश जोशी यांनी हा विचार करूनच आपापली रूपांतरे पेश केली. मांजरेकरांनी नाना पाटेकरांची निवड करून मेलोड्रामातील भडकनाट्य सौम्य होईल हे पाहिले. इथे ऋषिकेश जोशींनी ती एका बापाची शोकांतिका कशी होईल? हे पाहिले. दोन्ही अप्रोच त्या दृष्टीने पाहता योग्यच आहेत.

ऋषिकेश जोशी आज तीन अंकांचे दोन अंक करताना, पल्लेदार, नोस्टल्जिक संवादांना फाटा देत ट्रीटमेंटमध्ये नाटक सौम्य करतात. असे करताना नाटकातील पताका संवादांना फाटा देतात. त्यामुळे नाटक एका पित्याचे, आजच्या काळातील वाटायला लागते. त्याच्या केंद्रस्थानी अप्पा बेलवलकर असल्याने, प्रदीर्घ संवाद त्यांच्या वाट्याला येतात. मोहन जोशींची ही या प्रकारची पहिलीच भूमिका असावी. जोशींनी नटा मागील माणूस शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजवर नटसम्राट त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारांनी केला होता. इथे जोशींना ही भूमिका योग्यवेळी मिळाली म्हणता येईल. नटाच्या पल्लेदार संवादाला फाटा देऊन, सहजपणे ते प्रेक्षकांशी संवाद साधतात. दुसर्‍या अंकातील अप्पांच्या भ्रमिष्टपणाची पेरणी ते पहिल्या अंकात जाणवणार्‍या स्मृतिभ्रंशातून, विस्मरणातून करतात, हे त्यांनी भूमिकेवर केलेला विचार दाखवते. नटसम्राटमधील काव्यात्म संवाद वेगळे केले तर कावेरी वेगळी होईल. हा ही प्रयोग इथे झाला आहे आणि रोहिणी हट्टंगडी या दिग्गज अभिनेत्री तो समर्थपणे पार पाडतात.

इतर अभिनेत्यांमध्ये अभिजीत झुंझारराव यांचा विठ्ठल चांगली छाप पडतो. आशीर्वाद मराठे तीन वेगळ्या भूमिका समजून , योग्य प्रकारे करतात. शुभंकर तावडे यांची समज उत्तम दिसते. भक्ती देसाई आणि श्वेता मेहेंदळे मुलगी आणि सून म्हणून व्यवस्थित काम करतात. मुलगा आणि जावई या भूमिकेतील पोज, सुशील इनामदार आणि मिलिंद अधिकारी अजून शोधत आहेत, असे वाटले. सायली काजरोळकर आणि राम सईदपुरे यांची साथ नीटस.

प्रदीप मुळे यांचे नेपथ्य, प्रकाश नाटकाच्या मुल्यांत भर घालतात. नरेंद्र भिडे यांचे संगीत आणि मृणाल देशपांडे यांची वेषभूषा नाटकाच्या प्रकृतीशी सुसंगत. एकदंत क्रिएशनच्या चंद्रकांत लोहकरे यांनी या नाटकाची, दर्जात कुठेही तडजोड न करता, उत्तम निर्मिती केली आहे.

– आभास आनंद

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here