घरफिचर्सआपलं काम प्रभावी असणं जास्त महत्त्वाचं!

आपलं काम प्रभावी असणं जास्त महत्त्वाचं!

Subscribe

लाईट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शनच्या झगमगत्या दुनियेत स्वतःच वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी वर्षोनुवर्ष स्ट्रगल करणारे अनेक कलाकार असतात. मात्र आपल्या कामातून समाधान शोधणारे, समाजऋण म्हणून सामाजिक विषयांवरील कलाकृती सादर करून प्रेक्षकांचे प्रबोधन करणारे आणि केवळ ग्लॅमरस दुनियेचा भाग बनून राहण्यासाठी मिळेल ती कामे न स्वीकारणारे काही निवडक कलाकार आजही या क्षेत्रात पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे ’अभिनेत्री शुभांगी भुजबळ’. त्यांनी ’आपलं महानगर’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

सिनेसृष्टीतील प्रयोगशील अभिनेत्री अशी ओळख बनली असली तरी अभिनयाच्या क्षेत्रात येईन अस कधीही वाटलं नव्हतं. लहानपणापासून खेळाची आवड असल्यामुळे पुढे जाऊन स्पोरट्समध्येच करिअर करायच असं मी ठरवलं. किंबहुना मिलिटरीमध्ये जायच हे मनाशी पक्क केलं. मात्र काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. शिवाय नृत्याची आवड होतीच. त्यामुळे भरतनाट्यम आणि कथ्थकचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं. त्यात विशारद संपादन केलं. दरम्यान, लहानपणी अनेक नाट्य शिबिरांमध्ये सहभागी झाले होते. पालकांच्या आग्रहाखातर तिथे गेले खरं पण या क्षेत्राची आवड निर्माण होत गेली आणि अभिनयाकडे वळले. एक मनाशी पक्क केलं होत. ज्या कोणत्या क्षेत्रात जाईन. त्याच संपूर्ण शिक्षण घेईन. त्यामुळे अभिनय क्षेत्राची निवड केल्यानंतर दिल्लीतील सरकारमान्य नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत प्रवेश घेण्याच निश्चित केलं. मात्र अ‍ॅडमिशनची संधी हुकली. त्याच काळात मुंबई विद्यापीठात वामन केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमी आणि अभिनयविषयावर कोर्स पूर्ण केला. अभिनय क्षेत्राच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होते.

विद्यापीठातील दोनही वर्ष टॉप केले. दरम्यान माझे थोडेफार कला क्षेत्रातील काम सुरुच होते. विद्यापीठातून बाहेर पडल्यानंतर वामन केंद्रे यांना अनेक वर्कशॉप, नाटकांसाठी असिस्ट केले. केंद्रे सरांसारखे शिक्षक मला या सर्व प्रोसेसमध्ये लाभले. ते माझे गुरू, वडिल, मित्र, मार्गदर्शक बनले. अभिनय क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर अनेक दिग्गज नाट्यनिर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत काम करण्याचा योग आला. मात्र कधीही त्यांची भीती वाटली नाही. त्या उलट प्रत्येकाकडून काही न काही शिकण्याची संधीच मिळत गेली. त्यांच्या समोर आल्यावर घाबरण्यापेक्षा त्यांचे कामातील निरिक्षण करून स्वतःला कसं उत्तमोत्तम करता येईल. याचाच प्रयत्न करत राहीले.

- Advertisement -

नाटकांसोबत स्त्रीमुक्ती चळवळीकडे वळले ती म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि स्त्री मुक्ती चळवळीसाठी प्रयत्नशील असणार्‍या सुषमा देशपांडे यांच्यामुळे. त्यांच्या ’संगीत, बया दार उघड’ या नाटकात मी काम केले. त्यानंतर माझ्या नाट्यक्षेत्रातील टर्निंग पॉईंट ठरलेले ’आयदान’ हे नाटक प्रेक्षकांसमोर आहे. उर्मिला पवार लिखित या कादंबरीचे नाट्यरुपांतर सुषमा देशपांडे यांनी केले असून ज्योती म्हापसेकर यांनी ही संकल्पना मांडली होती. अतिशय मोजक्या साहित्यासोबत तीन कलाकार ४० हून अधिक व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर सादर करणार हे नाटक एक प्रकारचं आव्हानच होत. यामध्ये अभिनेत्री नंदिता पाटकर आणि शिल्पा साने यांची साथ मला मिळाली. हे नाटक आम्ही अक्षरशः जगलो. त्याशिवाय ’पळा पळा पुढे कोण पळे तो’, ’घोळात घोळ’, ’ठष्ट’ सारख्या नाटकांमधूनही प्रेक्षकांच्या समोर आले.
नाटकांसोबतच मालिका आणि चित्रपटांमध्येही कामं सुरू होती. ’वाघी’ या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवल्यानंतर ’होणार सून मी या घरची’, ’गुलमोहर’ सारख्या मालिकाही केल्या.

छोट्या पडद्यावरील ’गाव गाता गजाली’ने विशेष ओळख दिली. मालवणी पार्श्वभूमी नसतानाही त्यातील भूमिका साकारताना तेथील स्थानिक आणि दिग्दर्शक तसेच इतर कलाकार मंडळींची खूप मदत झाली. दरम्यान काही जाहीराती देखील केल्या. तर कच्चा लिंबूमधील छोटीशी भूमिका साकारण्याचा अनुभवही खूप काही शिकवून गेला. मला नेहमी वाटतं की भूमिका किती छोटी किंवा मोठी असण्यापेक्षा ती किती प्रभावी असते हे कलाकारासाठी जास्त महत्त्वाच असतं. त्यामुळे भूमिका निवडताना ती प्रेक्षकांवर कोणता चुकीचा प्रभाव तर टाकत नाही ना एवढचं मी बघते. शिवाय आपल्या प्रत्येक भूमिकेला न्याय देता यावा, याचा प्रयत्न करते. सध्या अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि ऋषिकेश जोशी यांच्यासोबत ’जुगाड’ या नाटकांत काम करत आहे. दोन्ही अनुभवी आणि अभ्यासू कलाकार, लेखकांसोबत काम करण्याची गंमत काही निराळीच आहे. नाटकाच्या प्रत्येक प्रयोगासोबत मला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळत आहे. कॅरेक्टर वर्कींग काय असतं हे जवळून पाहतेय. हाच अनुभव नवाजुद्दीन सिद्धिकीसोबत ’बॉम्बे टॉकिज’ आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासमोर ’सरकार ३’ या हिंदी सिनेमांमध्ये काम करतानाही आला.

- Advertisement -

नाटक, मालिका आणि चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये काम करत असले तरी माझं आवडत क्षेत्र हे कायम नाटकचं राहील. या माध्यमामुळे प्रेक्षकांशी थेट कनेक्ट होता येत. तिथे तुम्ही फक्त त्या भूमिकेत असता. एकदा कलाकृती सादर झाली की त्यात बदल होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम म्हणून नाटकांकडे पाहिलं जातं. प्रेक्षकांचा थेट प्रतिसाद मिळणे ही माध्यमाची ताकद आहे. शिवाय जाहीरात क्षेत्राचीही वेगळीच मज्जा आहे. अवघ्या काही मिनिटात आपल्याला संबंधित उत्पादन प्रेक्षकांसमोर मांडायचं असतं. त्यामुळे कमालीचं आव्हानात्मक असतं.

नेहमीच भरमसाठ कामं घेऊन सतत प्रेक्षकांच्या समोर राहण्यापेक्षा निवडक कामातून आनंद मिळवणं मला कधीही समाधानकारक वाटतं. शिवाय गेल्या नऊ वर्षांपासून एफएम रोनबोवर आरजे म्हणून काम करताना आपल्या आवाजाच्या माध्यमातूनही मी श्रोत्यांच्या संपर्कात राहत आहे, याचा मला आनंद आहे. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीच्या वनिता मंडळ कार्यक्रमात सहभागी होताना तसेच व्हॉईस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून कामं करतानाची मजाही वेगळीच असते.

मी आणि माझं महानगर

१५ ऑगस्टच्या निमित्ताने या गप्पा होत असताना आपल्या देशाविषयी अभिमान असणे हे जास्त महत्त्वाचे आहे. असं मला सांगावसं वाटेल. आपली देशभक्ती किंवा देशप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीपुरतीच मर्यादीत न राहता ३६५ दिवस आपण ही भावना जोपासायला हवी. मी एक नागरिक म्हणून आपल्या देशासाठी आपल्या शहरासाठी काय करू शकते, हे सर्वांनी पाहणं गरजेच आहे. त्यामुळे मला एक मुंबईकर म्हणून आपल्या शहरासाठी काय करता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. माझ्या मुंबईत अनेक अडचणी आहेत. पण त्यावर मात आपल्यालाच करायची आहे. नेहमी सरकारवर अवलंबून राहणं योग्य नाही. त्या दिशेने पावलं टाकत स्वच्छ आणि सुंदर मुंबई बनवण्यासाठी मी माझे काम सामाजिक स्तरातून सुरू केले आहे. हे काम सर्व मुंबईकरांनीही हाती घ्यावे इतकच सांगावसं वाटेल.

 


(संकलन – रश्मी माने)

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -