घरफिचर्सप्रधान, बाक आणि सायकल

प्रधान, बाक आणि सायकल

Subscribe

एका राज्यात एक राजा होता. तो हुकूमशाही पद्धतीने आणि एकाधिकारपणाने राज्य करत होता. या राजाचा प्रधान लोकांना खूप छळत होता. लोकांवर अन्याय, अत्याचार करत होता. त्याचं सारं खापर राजावरच फुटत होतं. या सगळ्याला कंटाळून एके दिवशी राज्यातील जनतेने उठाव केला आणि हुकूमशाही राजाची सत्ता उलथवली. त्यानंतर जनतेनं आपल्यापैकीच एका गरीब कनवाळू, शेतकर्‍याला राजा म्हणून नियुक्त केलं. नव्या राजाच्या निवडीनं जनता आनंदून गेली होती. वाजत-गाजत काढलेल्या मिरवणुकीत अग्रभागी हुकुमशाही-जुलमी राजाचा प्रधान जोरात नाचत होता. उत्साहात हसत- खिदळत होता. त्याचं हे खिदळणं बघून अनेक लोक आवाक झाले. एकाने धाडस करून प्रधानाला विचारलं, प्रधानजी तुम्ही तर त्या जुलमीराजाचे प्रधान होतात मग या नव्या राजाच्या मिरवणुकीत कसं काय बुवा नाचताय? प्रधान मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला, अरे वेड्यांनो तुम्ही राजा बदललाय प्रधान म्हणून मीच राहणार आहे... चला नाचा...

सध्या महाराष्ट्रात पळवापळवी सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने पंधरा वर्षांत महाराष्ट्राची धूळधाण केली असं म्हणत जो भाजप सत्तेवर आला तो सत्तेवर येण्याआधीपासून आणि आता पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत आपल्या निष्ठावंतांना बाजूला ठेवून जुलमी राजाच्या प्रधानांना कवटाळत बसलेला आहे. भाजपा-शिवसेना युती सरकारचा कार्यकाळ पूर्ण होताना पुन्हा एकदा महाभरतीला सुरुवात झालेली आहे. जो उठतोय तो भाजपात जातोय जणूकाही भाजप कल्पवृक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. या कल्पवृक्षाखाली बसून तुम्ही मनात आणाल ते तुम्हाला मिळेल अशी भाजपात जाणार्‍यांची धारणा झाली आहे. २०१४ ला शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे लढले. तेव्हा सर्वत्र मोदींची लाट होती. उभा राहील तो निवडून येत होता आताही परिस्थिती फार बदललेली नाही. मोदींनी दिल्लीत तीनशेपार झेंडा रोवल्यानंतर जो तो भाजपाची वाट धरतोय. नगरचे विखे पाटील, अकोल्याचे पिचड, नवी मुंबईचे नाईक, सातार्‍याच्या शिवेंद्रराजे भोसले ही आणि अशी अनेक मंडळी महाराष्ट्रात राजकीय संस्थानिक म्हणून परिचित आहेत. यांना सारं काही आपल्याच घरात आणि खानदानीत असावं असं वाटत असतं. सरदार वल्लभ पटेल यांनी संस्थानिकांची संस्थानं खालसा केली; पण या राजकीय संस्थानिकांची मक्तेदारी राज्यात गेली अनेक वर्षे कायम आहे.

मंत्रालयात सत्ता कोणाचीही असो. राज्याच्या भागात आणि गावागावात याच सगळ्यात राजे, दादा, अण्णा, आप्पा, भाई आणि भाऊ यांची दादागिरी सुरूच आहे. या राजकीय संस्थानिकांना चेक-मेट दिला जाईल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात पंधरा वर्षे सत्तेचा अमर्याद मलिदा खाणार्‍यांना फडणवीसांनी ‘रेड कार्पेट’ घालून आपल्या पक्षात निमंत्रित केलंय. इथे एकटा भाजप आज काही दोषी नाहीये तर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतही तीच स्थिती आहे. जयदत्त क्षीरसागर, सचिन अहिर यासारख्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना शिवसेनेने पायघड्या घातल्या तर मंत्रिपदाच्या विस्तारात तानाजी सावंत सारख्या शिक्षण सम्राटांना मंत्रिपदाच्या अंबारीत बसवलं आहे. या मेगाभरती पॅकेजमधल्या अनेकांना आपण कुठल्या पक्षात जाणार आहोत याचे ठोकताळे बांधता येत नव्हते. त्यामध्ये नायगावचे कालिदास कोळंबकर, नवी मुंबईचे गणेश नाईक यांचा समावेश आहे. कोणत्या पक्षात जायचं आणि आपलं राजकीय पुनर्वसन करायचं याचे या नेत्यांचे स्वतंत्र आराखडे आणि आडाखे आहेत. आपल्या बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, शिक्षण संस्था, दूध डेअर्‍या, स्थानिक रस्त्यांची कंत्राटं, रेतीचं उत्खनन या सगळ्या गोष्टी बिनबोभाट चालाव्यात यासाठी या जुलमी प्रधानांनी कोलांट्या उड्या मारायला सुरुवात केलीय. यांना जुलमी इतक्यासाठी म्हणायचं की, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित साधावं एवढाच एक कार्यक्रम या मंडळींकडे आहे.

- Advertisement -

स्वतः काहीशे कोटींचे मालक होता ना कार्यकर्त्यांना मात्र चतकोर भाकरीच्या तुकड्यावर ठेवण्याची यांची जी मानसिकता आहे ती जुलमी राजाच्या प्रधानापेक्षा वेगळी नाहीये. आपल्या बरोबरीने कार्यकर्ता येणारच नाही याची तजवीज या सगळ्या मंडळींनी गेली वर्षोनुवर्ष करून ठेवली आहे. इतकंच काय पण छोट्या मोठ्या कामासाठी मंत्रालयात जाताना या मंडळींच्या कार्यकर्त्यांना तासन्तास मंत्रालय प्रवेशाच्या पासासाठी तिष्ठत राहावं लागतं. यांच्या गाड्या तिथून झोकात जात असतात. पण फक्त मंत्रालय प्रवेशासाठी गर्दीचा कोलाहल करणार्‍या त्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला या सगळ्या सत्ताधुंद संस्थानिकांना वेळच नाहीये. १९९९ साली गोपीनाथ मुंडे त्यांच्याच खास मर्जीतल्या प्रदेशाध्यक्ष पांडुरंग फुंडकर आणि नितीन गडकरी यांनी अशाच पद्धतीने अनेक नेत्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले. तिकीट दिली. यथावकाश ती मंडळी निवडून आली; पण त्यांना पक्षात घेणारे मुंडे पुन्हा सत्तेत येऊ शकले नाहीत. एक काळ असा आला मुंडे पक्षात पूर्णत: एकाकी पडले त्यावेळेला मुंडेंच्या जवळ राहणं हे याच आयारामांना अडचणीचं वाटू लागलं. जेव्हा सत्ता होती तेव्हा ‘मुंडे म्हणे सो कायदा’ अशी परिस्थिती होती. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून मुंडेंकडे पाहिले जात होतं. मात्र आधी काहीसा राजकीय विजनवास आणि नंतर अचानक निघून जाण्यामुळे अख्खा मुंडे गड पोरका झाला. त्यातल्या काहींना फडणवीसांनी जवळ केलं तर काहींनी गडकरींचा हात धरला.पण आता तर राज्यात फक्त देवेंद्रायनम: सुरू आहे. कारण फडणवीसांच्या राजकीय डावपेचांचा मुकाबला करण्यासाठी आपण सक्षम नसल्याचं स्वत: गडकरींनी नागपुरी निकटवर्तीयांसमोर जाहीर करून टाकलंय. त्यामुळे फडणवीस म्हणतील त्याला मान डोलावून समर्थन देणं इतकंच भाजपा नेत्यांच्या हाती राहिलंय. अर्थात मुंडे यांचे गुण आणि अवगुण हे फडणवीसांपेक्षा थोडे वेगळे आहेत. प्रमोद महाजन हे मुंडे यांचे गॉडफादर होते. प्रमोदजींकडून हवं ते करून घेण्याची क्षमता स्व.गोपीनाथरावांमध्ये होती. आताही नरेंद्र मोदी हे फडणवीस यांचे गॉडफादर आहेत. दिल्लीमध्ये अनेक प्रस्थापित खासदार आणि भाजपा नेते मोदींसमोर अक्षरश: थरथरतात. त्याच मोदींचा ब्ल्यूआय बॉय म्हणून आपलं स्थान फडणवीसांनी बनवलं आहे.त्यामुळेच अमित शहा सुद्धा अनेक कसोटीच्या क्षणी फडणवीस यांच्या बाजूने कौल देतात. चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त होणं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. फडणवीस यांनी आगामी काळात आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या आड येऊ शकणार्‍या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या ‘डेंजर झोन’मध्ये उभं करून टाकलं आहे.मग ते खडसे असो किंवा पंकजा मुंडे… तावडे, शेलार यांची राजकीय स्थिती तर नाजूक झालीय. काम न केल्यामुळे प्रकाश मेहतांना (ते अमित शहा, मोदींचे लाडके असूनही) ज्या पद्धतीनं घरचा रस्ता दाखवला गेल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलीय.

एक ऑगस्टपासून मुख्यमंत्री फडणवीस आपल्या महाराष्ट्र दौर्‍याला सुरुवात करणार आहेत. आगामी विधानसभेमध्ये 220 पेक्षा अधिक जागा जिंकणे हे फडणवीस यांचं मिशन आहे. त्यानंतर गेल्या महिन्याभरात शिवसेना आणि भाजप युतीमध्ये नव्या पक्षप्रवेशाचं जे पेवं फुटलं आहे ते पाहता युती होणार नाही असं दबक्या आवाजात दुतर्फा बोललं जात आहे. सध्या राज्यात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद दुप्पट आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी आपणच पुढील मुख्यमंत्री असल्याचं आत्मविश्वासानं सांगून टाकलं आहे. तेव्हापासून मित्रपक्ष शिवसेनाही काहीसा विचलित होऊन गेला आहे. त्यामुळे सेनेनं आपल्याकडे काही मंडळींची खेचाखेची सुरू केली. राज्याच्या राजकारणातली ‘हेवी पॅकेजेस’ आपल्याकडे आणण्यासाठी ‘कॅरिअर’ म्हणूनही दोन्ही बाजूने तितक्याच विश्वासू आणि खमक्या लोकांची फळी उभी करण्यात आली आहे. सेनेकडून चाणक्य मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि युवराज आदित्य यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड यांना यासाठी प्रामुख्याने वापरलं जात आहे. येणार्‍या प्रत्येकाला काहीतरी ‘शब्द’ हवा आहे.

- Advertisement -

भाजपकडून हा शब्द देण्याचं काम दस्तुरखुद्द मुख्यमंत्री फडणवीस करतात तर सेनेचे सर्वाधिकार अर्थात पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे आहे. आज खरा प्रश्न आहे ह्यातले किती आमदार बनणार? किती विधान परिषदेवर जाणार? किती मंत्री बनणार? किती महामंडळाचे अध्यक्ष बनणार हीच मोठी समस्या आहे? देवेंद्र फडणवीस हे असेल ते नियमानं आणि कायद्यानं करावं असा त्यांचा सर्वसाधारण रिवाज असतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या टोळ्यांतील अनेक महाराज, शेठ, भाई, भाऊ यांना आपल्या पक्षाचा टिळा लावून कमळ हाती दिलेलं आहे. अनेकांच्या कारखान्यांवरचा कर्जाचा बोजा, ईडीच्या चौकश्या, पोलीस केसेस हे सगळे थांबवायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांना कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन आदेश द्यावे लागणार. आज ताठ मानेनं आणि स्वच्छ चारित्र्यानं राज्यातील जनतेला सामोरे जाणारे मुख्यमंत्री फडणवीस हे आगामी कार्यकाळात इतकेच बेदाग असतील याची खात्री खरंच देता येईल का हा प्रश्न आहे. आताही सेनेपेक्षा भाजप ताकदीनं दुप्पट आहे. आगामी निवडणूक ही राज्यात फक्त मोदी-फडणवीसांच्या ब्रॅण्डवरच लढवली जाणार आहे. येणार्‍या काळात राज्यभर मुख्यमंत्र्यांच्या सव्वाशे सभा, मोदींच्या १२ आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या १२ सभांचा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. या इतक्या मोठ्या प्रचार सभांनंतर सगळं वातावरण भाजपमय होऊन जाणार यात वाद नाही.

दुसर्‍या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पूर्णपणे क्षीण झालेले आहेत. कार्यकर्त्यांना दिशा द्यायला नेतेच नाहीत. संपर्कासाठी दुर्मिळ असलेले मिलिंद देवरा, ८२ वर्षीय एकनाथ गायकवाड, आणि आवाकाहीन बाळासाहेब थोरात हे तर लढाई आधीच पराभूत झाल्यासारखे वावरतायत. राष्ट्रवादीत तर कोणता नेता खमका? हेच कार्यकर्त्यांना कळत नाहीय. वडाळा मतदार संघ युतीमध्ये सेनेकडे आहे तिथे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे काँग्रेसचे आहेत. त्यांनी पक्षप्रवेशासाठी भाजपची निवड केली आहे. आता युती राहिली तर कोळंबळकरांचं काय? हा मतदारसंघ सेना सोडणार का? हीच गोष्ट कोकणातल्या सावंतवाडीची. तिथे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आमदार आहेत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. भाजपच्या राजन तेली यांना तिथून निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी गडकरी-फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावून थेट मातोश्रीच्या चाणक्यांना केसरकरांना बदलण्याची गळ घातली आहे. युती राहिली तर काही जागांची अदलाबदल होणारच आहे. बरं हे नेते कुण्या एका पक्षात असतात का?एकाच पक्षाकडे जातात का? एकाच नेत्याचं कुंकु लावतात का तर उत्तर ‘नाही’ असंच मिळेल.

राज्यभरातले हे भाडेकरु दलबदलू घेऊन कदाचित भाजपा-सेनेची सत्ता येईल; पण हे सगळे इलेक्ट्रोल मेरिटवाले फडणवीस-उध्दव यांना कधीच मनापासून आदर देणार नाहीत किंवा नेताही मानणार नाहीत. परवाच स्वत: सचिन अहिरांनी जाहीरपणे सांगून टाकलंय ‘माझ्या हृदयात पवार साहेब आहेत आणि अंगात उध्दवजी आणि आदित्य आहेत’. कुणी स्वर्गीय प्रमोद महाजनांशी आपण किती जवळ होतो हे हिरीरीने सांगण्याचा प्रयत्न करतोय तर कुणी सायकलवर भगवा झेंडा लावून आपण साहेबांच्या ‘आदेशाने’ कसे विभाग विभागात फिरत होतो हे सांगताहेत. राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या शाळेतल्या बाकाची एक आख्यायिका गमतीनं सांगितली जाते. कारण काही वर्षांपूर्वी राजकीय क्षेत्रातील पंचवीस माणसांपैकी अनेकजण आपण शाळेत पवारांच्या बाकावर बसायचो असं बिनधास्त ठोकून द्यायचे.आणि शरद पवारांशी आपली नसलेली जवळीक दाखवायचा प्रयत्न करायचे.आता पवारांचा दौर मागे पडलाय. पण या सत्तेसाठी हपापलेल्यांची आणि पदाच्या खुर्चीसाठी वाटेल ते करणार्‍यांची संख्या काही कमी होत नाहीय.त्यामुळे गेली अनेक वर्षे मी तो पवारसाहेबांचा शाळेतला बाक आणि ‘साहेबांचा’ आदेश घेऊन फिरणारी भगवा झेंडा लावलेली सायकल शोधतोय… मला खात्री आहे दोन्हींचा वापर करणारा तो राजाचा प्रधान आहे. जो सत्तेच्या मिरवणुकीत सर्वात पुढे आणि तितक्याच उत्साहात नाचतोय, त्याच्यासाठी फक्त राजा बदललाय… हुकूमशाही आणि जुलूम करणार्‍या राजाची सत्ता उलथवणारी जनता मात्र आपला उर बडवतेय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -