घरफिचर्ससीटीएस चेक प्रणाली देशभरात कार्यरत होणार !!

सीटीएस चेक प्रणाली देशभरात कार्यरत होणार !!

Subscribe

डिजिटल चेकद्वारे जलद क्लिअरिंग

भारत सरकारने सीटीएस ही आधुनिक व्यवस्था सप्टेंबर 2020 पासून संपूर्ण देशातील पेमेंट सिस्टीमसाठी अंमलात आणण्याचे ठरवलेले आहे. 2014 पासून सुरू झालेला धोरणात्मक प्रवास हा नजीकच्या काळात पूर्णत्वास जाईल असा अंदाज आहे. काही मोजक्या ठिकाणी यशस्वी झालेली सीटीएस पद्धती आता संपूर्ण देशभरात राबवली गेली तर संपूर्ण बँकिंग व्यवहारातील ते एक महत्वाचे पाऊल असेल, ज्याचे अनेक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसू शकतील. आपली अर्थव्यवस्था पेमेंट सिस्टीमबाबत सशक्त होणे ही काळाचीच गरज आहे. देशातील अंतर्गत व्यापारवृद्धी व विदेशातील गुंतवणूक वाढीसाठी हे नक्कीच उपकारक ठरेल.

भारतात ‘डिजिटल इंडिया’चा नारा जोरदार चालू असल्याने जलद व सुकर पेमेंटबाबतीत ऑनलाईन मोड अधिक विकसित होतोय ही चांगली बाब आहे. कारण व्यवहार व्यापारी असोत किंवा व्यक्तिगत, ज्यात योग्य वेळेत, योग्य पद्धतीने मिळणे अत्यावश्यक असते. पेमेन्टच्या ‘कागदी युगा’तून आपण ‘डिजिटल’मध्ये संक्रमित होतो आहे, याचा अर्थ असा नाही की, एकाच फटक्यात संपूर्ण व्यवहार इलेक्ट्रॉनिक व्हावेत आणि कागदी साधने नामशेष व्हावीत. जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थेतही अजून नोटा व चेक्स आहेत, रद्दबातल झालेले नाहीत. आपल्याकडे मात्र ‘चेक’ म्हणजे धनादेश बंद होणार ! अशा वावड्या उठत असतात, पण खरेच तसे होऊ शकेल का? महाकाय इकॉनॉमीला हे शक्य होणार आहे का? आज चेक व डिजिटल पेमेंटची काय स्थिती आहे, हे पाहणार आहोत. ‘डिजिटल चेक’ ने क्लिअरिंग वेगवान कसे झाले आहे हे पाहूया.

- Advertisement -

पार्श्वभूमी – आपल्याकडे गेली अनेक दशके चेकच्या माध्यमातून ‘पेमेंट’ होतात आणि त्याकरिता रिझर्व्ह बँकेची ‘क्लिअरिंग हाऊस’ सिस्टीम कार्यरत आहे. वाढता चेक-व्यवहार लक्षात घेऊन मध्यवर्ती बँकेने आधुनिकीकरण प्रक्रिया सुरु केली, त्यातून ‘सीटीएस’ योजना कार्यान्वित झाली. पूर्वीच्या क्लिअरिंगमध्ये आपण भरलेला चेक आपल्या बँकेकडून दुसर्‍या बँकेकडे जातो, हे सर्व क्लिअरिंग पद्धती मार्फत होत असते. मुंबई आणि अन्य क्लिअरिंग हाऊसेसमध्ये लाखो चेक्स येत असतात आणि अनेक बँकांकडे प्रत्यक्षात हस्तांतरित होत असतात. एका दिवसाला कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असतात म्हणूनच जेव्हा बँका संप किंवा बंद असतो, तेव्हा सर्व पेमेंट व्यवहार ठप्प होतात !! आपली बँकिंग आधुनिक व्हावी व पेमेंट सुरक्षित व जलदगतीने करण्याच्या हेतूने सिटीएस अंमलात आणली गेली.

सिटीएस [Cheque Truncation System] प्रणालीची कार्यपद्धती- थेट चेक न वापरता त्यांची इमेज वापरून क्लिअरिंग करणे म्हणजेच ही सिस्टीम. काही मोजक्या केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर ही राबवली गेली, त्याचे यश व सुलभता पाहून आता ही योजना देशभरात राबवली जाणार आहे. असे केल्यास देशातील पेमेंट सिस्टीम आधुनिक तर होईलच पण मोठ्या प्रमाणावर वेळ व मनुष्यबळाची बचत होऊ शकेल. लाखो फिजिकल चेक्स घेऊन क्लिअरिंग हाऊसमध्ये नेणे हे प्रशासकीय, आर्थिक व जोखीमबाबतीत अवघड असल्याने इमेजद्वारे क्लिअरिंग हे खूप सोयीचे व सोयीस्कर असल्याचे सिद्ध झालेले आहे.

- Advertisement -

आता आपल्याकडे असलेले चेक -चेकबुक हे सीटीएस प्रणालीला साजेसे असे आहेत. इतर म्हणजे नॉन-सीटीएस चेक हे अजूनही वापरात आहेत, यापुढे त्यांचा वापर बंद करावा कारण यापुढे संपूर्ण देशातील चेक व्यवहार हे सीटीएस चेक्सद्वारे होणार असल्याचे सांगितले गेले आहे. या दृष्टीने बँक ग्राहकांनी आपल्याकडील नॉन-सीटीएस चेक्स यापुढे वापरू नयेत, त्याऐवजी फक्त सीटीएस चेकबुकांचा वापर करावा.

सीटीएस प्रणालीमध्ये नेमके काय होते – आपण आपल्या बँकेकडे दिलेला चेक पूर्वी थेट क्लिअरिंग हाऊसकडे पाठवला जायचा, आता सीटीएस चेक हे त्या-त्या बँकेत स्कॅन केले जातात, नंतर इमेज पाठवली जाते व त्याद्वारे क्लिअरिंग प्रक्रिया होते. हजारो चेक्स हाताळणे, यादी करून पाठवणे, याऐवजी स्कॅन केले की, तडक पाठवले जातात यात वेळेचीही बचत होते.

सीटीएसचे फायदे –
1) कमी वेळात -जलदगतीने होणारा चेक -पेमेंटचा व्यवहार
2) खर्चाबाबत किफायतशीर
3) चेक नेणे -आणणे असे दळणवळण व त्याकरिता मनुष्यबळ ह्यात बचत
4) अधिक चेक्सचे सुलभ पद्धतीने क्लिअरिंग
5) चेक गहाळ होण्याची शक्यता नाहीच
6) चेक हाताळले जात नसल्याने व्यवहार कमी जोखमीचे व अधिक सुरक्षित

तोटा किंवा अडचण – चेकवरील हस्ताक्षर किंवा स्वाक्षरी स्पष्ट किंवा खाडाखोड वगैरे असल्यास तसा चेक ‘रिजेक्ट’ होण्याची शक्यता व त्यातून क्लिअरिंगसाठी अडचण होऊ शकते.

उपाय – चेक लिहिताना खबरदारी म्हणून स्वच्छ अक्षरात लिहिले जावे. कोणतेही पेन वापरावे पण ठळक, सुस्पष्ट असावे. हलके किंवा लाईट पेनने लिहिलेल्या चेकची इमेज स्पष्ट न आल्याने क्लिअरिंगसाठी अडचण होऊ शकते.

सीटीएस प्रणालीचा परिणाम – एकीकडे आपले सरकार डिजिटल व्यवहारांचा पुरस्कार करत असताना, फिजिकल चेक्सचा वापर कमी करणे हे स्वाभाविकच आहे. मात्र संपूर्ण देशाच्या आर्थिक व्यवहारांतून ‘चेक – धनादेश ’ हद्दपार करणे तसे अशक्यप्राय आहे. कारण कितीही मोबाईल व इंटरनेट आधारित डिजिटल पेमेंट सिस्टीम आली तरीदेखील चेक्सचा वापर बंद होणार नाही. कारण छोटे व्यापारी, लघु उद्योजक हे त्यांच्या सोयीसाठी चेकबुक वापरतात, त्यांना अशा पद्धतीने पेमेंट करणे रास्त व सोयीचे वाटते. तसे पहिले तर अनेकजण आजही मोबाईल किंवा तत्सम प्रकारच्या अ‍ॅप्सबाबत तितके माहितगार नसतात, त्यांना अवगत नसते हादेखील मुद्दा असतो. म्हणूनच केवळ डिजिटलचा पाठपुरावा करायचा म्हणून ‘चेक सिस्टीम’ मोडीत नाही काढता येणार. परंतु अनेक पर्याय उपलब्ध करून दिले, तर हळूहळू बहुसंख्य जनता आधुनिक पेमेंट सिस्टीम वापरू लागले, शिवाय त्यांना त्याचे महत्व पटू शकेल.

आज रिझर्व्ह बँकेतर्फे क्लिअरिंग सिस्टीममध्ये चेकची इमेज पाठवली जाते, म्हणजेच आपला चेक डिजिटल स्वरूपात रूपांतरित होतो व पेमेंट वेगाने होण्यास मदत करतो. हे अप्रत्यक्ष डिजिटलच आहे. एखादी जुनी सिस्टीम तात्काळ निकालात न काढता, त्याला सुयोग्य असा पर्याय सुरु करून समांतर पद्धतीने राबवणे आणि नंतर जुनी पद्धत ‘कालबाह्य’ ठरवणे हे अधिक व्यवहार्य म्हणता येईल. नेमके हेच धोरण आपल्याकडे सीटीएस प्रणालीने होत आहे, म्हणूनच भारत सरकारने ही आधुनिक व्यवस्था सप्टेंबर 2020 पासून संपूर्ण देशातील पेमेंट सिस्टीमसाठी अंमलात आणण्याचे ठरवलेले आहे. 2014 पासून सुरू झालेला धोरणात्मक प्रवास हा नजीकच्या काळात पूर्णत्वास जाईल असा अंदाज आहे. काही मोजक्या ठिकाणी यशस्वी झालेली सीटीएस पद्धती आता संपूर्ण देशभरात राबवली गेली तर संपूर्ण बँकिंग व्यवहारातील ते एक महत्वाचे पाऊल असेल, ज्याचे अनेक पातळीवर सकारात्मक परिणाम दिसू शकतील. आपली अर्थव्यवस्था पेमेंट सिस्टीमबाबत सशक्त होणे ही काळाचीच गरज आहे. देशातील अंतर्गत व्यापारवृद्धी व विदेशातील गुंतवणूक वाढीसाठी हे नक्कीच उपकारक ठरेल.

चेक वापराचे प्रमाण घटले – एका आकडेवारीनुसार 2012 ते 2017 या कालावधीत चेकच्या वापराबाबत जे सर्वेक्षण केले गेले, त्यातून असे आढळते की, गेल्या काही वर्षात चेकने पेमेंट करण्याचा टक्का कमी होत चाललेला आहे. नेमके सांगायचे तर -10. 8 टक्के इतके कमी. याचे मुख्य कारण म्हणजे नोटबंदीच्या काळात सुरु झालेला मोबाईल-इंटरनेट पेमेंट सिस्टीमचा वापर. पेटीएम किंवा तशा अनेक अ‍ॅप्समुळे व वाढत्या मोबाईल्स-इंटरनेटच्या कारणांनी ‘एका क्लिक’वर पेमेंट करणे सोयीचे वाटत आहे. इंटरनेट बँकिंगने जलद व थेट पेमेंट घडते आहे. मग चेक वापरा, बँकेत किंवा एटीएम बूथमध्ये जाऊन भरा ! क्लिअर झाला की बाऊन्स झाला की नाही? हे बघा अशी झिगझिग नकोशी वाटते.

शिवाय आता लोकांकडे वेळ नाही, परिणामी चेकपेक्षा मोबाईल /इंटरनेट आधारित पेमेंट सिस्टीम खूप सोयीस्कर वाटते. 2021 पर्यंत हा चेक वापराचा टक्का अधिक घसरेल अशी अटकळ आहे. चेकचा वापर कमी व्हावा, खातेदारांनी बँकेच्या वास्तूत येऊन व्यवहार करू नयेत याकरिता बँका अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. चेक वापरण्यावर मर्यादा असावी म्हणून नवीन चेकबुक किंवा अतिरिक्त चेकबुकसाठी अधिक चार्जेस आकारीत आहेत. ज्यांना आधुनिक पद्धतीचे व्यवहार सफाईने हाताळता येत नाही, किंवा भीती वाटते त्यांना आजही चेक हा सुलभ-सुरक्षित पर्याय वाटतो आहे. अशी खातेदार संख्या कमी-कमी झाल्यास, अधिक लोकसंख्या मोबाईल-नेटद्वारा पेमेंट करू लागल्यास चेकचा वापर कमी प्रमाणात होऊ शकेल. शेवटी जे सुटसुटीत आहे, तेच टिकते हा व्यवहाराचा साधा सोप्पा नियम आहे. मग चेक तरी अपवाद कसा असेल ?.

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ-अभ्यासक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -