घरफिचर्ससारांशज्वारी श्रीमंत झाली!

ज्वारी श्रीमंत झाली!

Subscribe

दगडी, मालदांडी, मंठी, डुकरी, तुळजापुरी, गीडग्याप, कावळी, पिवळी अशी ज्वारीची बरीच वाणं महाराष्ट्रात घेतली जातात. महाराष्ट्र जनुक कोश ह्या कार्येक्रमांतर्गत ज्वारीचे संवर्धन होण्यासाठी बरेच प्रयत्नही केले गेलेत. ज्वारीचे कणीस दगडासारखे घट्ट ज्यामुळे पाखरांना खायला थोडं अडचणीचं होई आणि धाट जरी खाली पडले तरी त्याचे दाणे पडून जाणार नाहीत ती दगडी ज्वारी. मऊ भाकर देणारी ज्वारी, गोड हुरड्यासाठीची ज्वारी, पीक काढणीच्या वेळी अलगद उपसून काढता येईल, जनावरं आवडीने चारा खातात अशी काही गुण वैशिष्ठ्ये पाहून, निरीक्षणातून शेतकर्‍यांनी ज्वारीची आपली बियाणे जपली होती. असं स्वतःचं बियाणं जपून ठेवण्यार्‍यांचं प्रमाण कमी कमी होत जातंय.

ज्वारी कोणती पेरली? असं एखाद्याला विचारलं तर आजकाल बहुतेक लोकं, ज्वारीच पेरली नाही! असं सांगतात. ज्वारी न पेरण्यामागील कारणं पाहिली तर, ज्वारीला कमी भाव आहे किंवा ज्वारी त्यांना घरी खाण्यासाठी नको आहे, असं काहीच नाही. मागील एक दोन दशकांचा विचार करता ज्वारीचा भाव हल्ली तेजीत आहे. ज्वारी सोबतच कडब्यालादेखील विशेष मागणी आहे. घराघरातून आता पुन्हा ज्वारीची भाकर खाण्याचा नवीन ट्रेंड सुरू होतोय. बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपचन, जास्तीचे वजन अशा प्रकारच्या आरोग्याच्या समस्यापासून मुक्तीसाठी हल्ली डॉक्टरदेखील ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देत आहेत. रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी खा असं सांगितलं जातं. पाच दहा वर्षे मागे गेलो तर गहू खाणे प्रतिष्ठेचा विषय बनला होता. आज ज्वारीपेक्षा गव्हाची किंमत प्रतीकिलोमागे दहा ते वीस रुपये इतके कमी असल्यामुळे तो गरिबांचा मुख्य आहार बनला. आता ज्वारीची भाकर खाणे ही चैनीची व प्रतिष्ठेची बाब बनत चालली आहे. तरीही ज्वारी पेरण्याचे का टाळले जात आहे?

वीस पंचवीस वर्षांपूर्वी बहुतेक शेतकरी कुटुंबात पद्धत होती, दुभत्या जनावरांना पिवळ्या ज्वारीची आंबील करून पाजायचे. आमच्या घरी सकाळी आंबील बनवायचं काम माझ्याकडे होतं. घरात सगळी पिठं ठेवण्याची एक ठरलेली जागा होती. तिथे टाळका ज्वारीचं पीठ भाकरीसाठी व पिवळ्या ज्वारीचे पीठ म्हशीच्या आंबीलसाठी सोबतच हरभरा पीठ ठेवलेलं असायचं. म्हशीसाठी आंबील बनविण्याची जबाबदारी मी हौसेने घेतली होती. त्या निमित्ताने चुलीपुढे गरम बसून राहता येई. आंबील बनवायला चुलीवर मडक्यात पाणी ठेवायचं. पाणी उकळत येईपर्यंत दुसर्‍या पातेल्यात पीठ कालवून त्यात ओतायचं. मग पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून त्यात सारखी पळी फिरवत राहायचं. थोडसं मीठ टाकायचं. झाली आंबील. अशी आंबील म्हशीला खूप मानवायची. तबियत बनायची. दूध जास्तीचं द्यायची. एका दिवशी आंबील बनवायचं थोड गणित चुकलं.

- Advertisement -

पिवळ्या ज्वारीच्या पीठाऐवजी टाळकीचं पीठ घेतलं गेलं. हे तेव्हा कळलं, जेव्हा पिठाच्या गुठळ्या होऊ नये म्हणून पळी फिरवत होतो. आता आई रागवणार. आईला कळू द्यायचं नसेल तर काय करायचं? ह्या विचारात असतानाच आई चुलीपाशी हजर. आंबील रोज पिवळसर होते आज पांढरी शुभ्र. पीठ कोणतं घेतलं रे? इतकचं विचारून आई इतर कामात गुंतली. पिठाला रंग थोडं पिवळसर यावं आणि बोलणी खावी लागू नये म्हणून युक्ती केली. हळूच अर्धा चमचा हळद टाकली. मग परत पळी फिरवणं सुरू केलं. आता आलेला पिवळा रंग इतका गडद होता की आंबील आता हरभर्‍याच्या पीठासारखी दिसायला लागली. आता आईचा मार खाण्याचं पक्क झालं. मग घाईघाईने पातेले उतरवून ठेवून दिलं. मग झाल्या प्रकाराची आईला कबुली देऊन सुटका करून घेतली.

माझ्या भीतीची तीव्रता ही टाळकी ज्वारी आणि पिवळी ज्वारी ह्यांच्या किमतीतील तफावत सांगणारी आहे. ही साधारण मी पाचवी सहावीत शिकत असतानाची गोष्ट आहे. म्हणजे साधारण 1995 ते 2000 चा काळ. तेव्हा हायब्रीड ज्वारीचे काही वाणे मराठवाड्यातील गावोगावी पेरली जायची. उत्पन्न मुबलक निघायचं. मात्र हवामानात विशेष चढउतार झाले की सगळी पिके मातीमोल व्हायची. हायब्रीड ज्वारीचा कडबा, फक्त पानं पानं खाऊन गोठ्यात चीपाडांचा खच जमायचा. वडिलांनी एक-दोन वर्षे हायब्रीड ज्वारीचे रंग रूप बघून घेतलं आणि तिसर्‍या वर्षी राम राम ठोकला. घरात नेहमी दुभती म्हस असायची. तिच्या चार्‍याची सोय व्हावी म्हणून वडील खरीपात पिवळी ज्वारी पेरायचे. पिवळ्या ज्वारीची भाकरी थोडी लालसर, काळसर व्हायची. अगदी गरीब कुटुंबातील लोक हायब्रीड किंवा पिवळी ज्वारीची भाकर खायचे.

- Advertisement -

चारपाच गावचे लोक परगावी एकत्र कामाला असतील, दुपारचा डबा खायच्या वेळी, पिवळ्या ज्वारीची भाकर खाणार्‍या माणसाला प्रचंड कमीपणाचे वाटून रहायचे. मी लहान असताना आमच्या घरी बरीच वर्षे पिवळी ज्वारी खाल्ली जायची. मग अचानक टाळकी ज्वारी आली. टाळकी हा एक ज्वारीचा प्रकार आहे. मात्र मोठ्या प्रमाणात ही ज्वारी खाल्ली जाऊ लागल्याने ‘टाळकी’ हा ज्वारीला पर्यायी शब्द बनून गेला. मग पिवळ्या ज्वारीचा दर टाळकीपेक्षा बराच कमी झाला. टाळकीला बडी ज्वारी असंही म्हटलं जायचं. बडी ज्वारी म्हणताना त्यातल्या बडी वर जोर देऊन, आम्ही बडी ज्वारी खातो! असं सांगितलं जायचं. पण याही दिवसात गहू हे ज्वारीपेक्षा श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. गरिबांना फक्त सणासुदीला गहू खाणे परवडायचं.

तेव्हा पिवळ्या ज्वारीची धाटे आमच्या गावात बरेच लोक ऊस म्हणून खायचे. शेतीतून येताना वडील आम्हाला हमखास हे ऊस घेऊन यायचे. कोरडवाहू भाग असल्याने आमच्याकडे ऊस नव्हताच. देगलूर तालुक्यातील शेळगाव हे मावशीचं गाव. एकदा त्यांच्या गावी जाणं झालं तेव्हा तिथे ऊस पाहायला मिळाला. आजही आमच्या येरगी गावात उसाला गुळाचा ऊस व ज्वारीच्या धाटाला नुसता ऊस म्हटलं जातं. हल्ली असा ऊस खाण्याचा प्रकार अगदी दुर्मीळ झाला आहे. दहा वीस वर्षांपूर्वी खरीपात पिवळ्या ज्वारीचा तर रब्बीत टाळकी ज्वारीचा ऊस मनसोक्त खाल्ला जायचा.

दगडी, मालदांडी, मंठी, डुकरी, तुळजापुरी, गीडग्याप, कावळी, पिवळी अशी ज्वारीची बरीच वाणं महाराष्ट्रात घेतली जातात. महाराष्ट्र जनुक कोश ह्या कार्येक्रमांतर्गत ज्वारीचे संवर्धन होण्यासाठी बरेच प्रयत्नही केले गेलेत. ज्वारीचे कणीस दगडासारखे घट्ट ज्यामुळे पाखरांना खायला थोडं अडचणीचं होई आणि धाट जरी खाली पडले तरी त्याचे दाणे पडून जाणार नाहीत ती दगडी ज्वारी. मऊ भाकर देणारी ज्वारी, गोड हुरड्यासाठीची ज्वारी, पीक काढणीच्या वेळी अलगद उपसून काढता येईल, जनावरं आवडीने चारा खातात अशी काही गुण वैशिष्ठ्ये पाहून, निरीक्षणातून शेतकर्‍यांनी ज्वारीची आपली बियाणे जपली होती. असं स्वतःचं बियाणं जपून ठेवण्यार्‍यांचं प्रमाण कमी कमी होत जातंय.

आता शेजारी कुणीच ज्वारी पेरत नाहीत. फक्त आमचीच ज्वारी असेल तर डुकरं नुकसान करतात. पाखरं खाऊन टाकतात. ज्वारी पेरली तर दिवसरात्र राखावं लागेल. हे असले उपद्व्याप विकत घ्यायला कुणी सांगितले, म्हणून ज्वारी पेरत नाही. खायला हवी तेवढी विकत घेतो. साधारण ऐंशी नव्वदीच्या दशकात शिवारात चिट्ट हुली (छोटा वाघ) असल्याचं, त्याने शेळी, मेंढी, वासरं पळविल्याच्या आठवणी लोक सांगतात. आता ह्या भागातून ते पूर्ण नामशेष झालेत. परिसंस्थेतील रानडुकरं, हरणं, अशा तृणभक्षी घटकावर नियंत्रण ठेवणारे घटक नाहीसे झाल्याने शेतीचे नुकसान करणार्‍या घटकात भर पडत गेली. ऐशी नव्वदीच्या दशकातच मिरची व भुईमुग मोठ्या प्रमाणावर घेतले जायचे. आज तेही आता दुर्मीळ झालेयत. कारण लोक ठेवणार नाहीत. जवळच्या गावातील एक आंब्याचे झाड काही दिवसापूर्वीच तोडण्यात आलं. मी तोडण्याचं कारण विचारलं, शिवारातील हे एकमेव आंब्याचे झाड होतं. लोकं सनावाराला पानं तोडायला येथेच यायचे. लोकांचा खूप उपदर (उपद्रव) झाला होता, मग दिले तोडून. ज्वारीचीही तीच गत होतेय.

बदलता पाऊस पाणी, बाजारभाव, सरकारी धोरण ह्या बरोबरच असे अनेक घटक आहेत ज्यामुळे आपल्या शेत शिवारातील पिकं बदलत आहेत. शेती विषयाला घेऊन आज फक्त शहरातूनच मोठ्या प्रमाणत संवाद, परिसंवाद होतात. खेड्यातील लोकांत आता असे संवाद, चर्चा करण्याची आवशकता आहे.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एजुकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -