घरफिचर्ससारांश‘मी टू’ला उशिरा जाग का येते ?

‘मी टू’ला उशिरा जाग का येते ?

Subscribe

एखादी महिला कामात पुरुषापेक्षा सरस ठरते तेव्हा काही जण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. तिला बदनाम करण्याचे कारस्थान करतात. कारण कामात तिची बरोबरी करण्याची क्षमता आणि लायकीच दोन्ही त्यांच्यात नसतात. यामुळे एखाद्या महिलेचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. अशावेळी महिलेने ‘मी टू’पेक्षा सरळ त्याला कोर्टात खेचावे, पण त्या आधी त्याचा समाचार मात्र नक्की घ्यावा. जेणेकरून मागचा शहाणा होईल. दरम्यान, जर खरंच एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल किंवा होत असेल तर तिचं इतकं वषर्ंं गप्प बसणं हे समाजासाठी घातक व आरोपीसाठी मात्र पोषक आहे असंच म्हणावं लागेल.

कोरोना, पॉझीटीव्ह, निगेटीव्ह, सुशांत, हत्या, आत्महत्या, डिप्रेशन, रिया, जादू टोणा, बॉलीवूड, ड्रग्ज , कंगणा, अनुराग, दिपिका, सारा, हे मुद्दे सध्या बाजूला पडलेत. कारण या प्रकरणामध्ये ट्विटवर कंगणाचा सतत समाचार घेणार्‍या अनुराग कश्यप या दिग्दर्शकावर पायल घोष या अभिनेत्रीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेत. यामुळे अनुरागची टिवटिव बंद झाली असून आता त्याच पुढं काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तर फारशी कोणाच्या गणतीत नसणारी पायल एका आरोपामुळे घराघरात पोहचली आहे. प्रश्न एकच २०१४ साली घडलेल्या या घटनेचा आताच्या घटनेशी संबंध काय आणि पायलला ही सुबु्द्धी तेव्हाच का नाही सुचली?

त्यासाठी २०२० उजाडण्याची तिने वाट का पाहिली? आता तर जे स्वत:च्या समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देऊ शकत नाहीत ते मात्र एकदम अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत.

- Advertisement -

पायलच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. तर पायलने कंगणासारखी वाय सुरक्षा देण्याची केंद्र सरकारकडे मागणी केल्याचं वृत्त आहे. मला एक स्त्री म्हणून एकच प्रश्न पडतोय जेव्हा एखादे प्रकरण चिघळते तेव्हाच या पीडित बायकांना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची का जाणीव होते.

यातून साध्य काय होतं. पुरावे नष्ट झालेले असतात. कोणी आरोप केले म्हणून न्यायालय त्याला शिक्षाही देऊ शकत नाही. कारण न्यायालय भावनांवर नाही तर पुराव्यांवर चालते.

- Advertisement -

त्यामुळे काहीजणींनी यातून न्याय नाही, पण त्याला काही काळापुरत जेलमध्ये तरी जावं लागलं, त्याची नाचक्की झाली याचं मानसिक समाधान मिळाल्याचं सांगितलंय.

पण जर सारासार विचार केला तर आपल्यावर अन्याय करणार्‍या व्यक्तीला त्याच्या कृत्याची शिक्षा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अन्यायाने पेटून उठलेली जगातली कुठलीच स्त्री शांत झोपू शकत नाही. हा स्त्री स्वभाव आहे. कारण स्त्रीला जेव्हा एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. त्याच्या तीव्र जखमा तिच्या शरीरावरच नाही तर तिच्या मनावरही खोलवर व्रण सोडून जातात. पण जर आपण नीट या सर्व प्रकरणांकडे बघितले तर एक गोष्ट स्पष्ट जाणवते ज्या ज्या स्त्रियांनी मी टूचे आरोप केले आहेत. त्यातील प्रत्येक स्त्री ही समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी खमकी बाई आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करत होती किंवा करतेय. आत्मविश्वासाने ओतप्रोत आहे. कुटुंबाची तिला साथ आहे.

आर्थिक बाजूनेही भक्कम आहे. म्हणजे समाजाशी लढण्यासाठी जी जी अवजारं आजच्या काळात लागतात ती तिच्याकडे तेव्हाही होती आणि आजही आहेत. मग एवढ्या सक्षम महिलांनी एवढे वर्ष गप्प बसण्याचं, अन्याय सहन करण्याच कारण काय… याचाही समाजाचा भाग म्हणून विचार करणे गरजेचे आहे. २०१८ साली भारतात ही चळवळ पोहचली ती तशातच ज्या महिलांनी हे आरोप केले आहेत किंवा करत आहेत त्यातील प्रत्येकीला याची जाण आहे की, आपण पुरुषांबरोबर काम करायचंय.

त्यात काही चांगलेही असतील तर काही वांगलेही निघतील. मग अशा लंपट पुरुषांना कसे सरळ करायचे याचेही ज्ञान प्रत्येक महिलेला असतेच.

फरक फक्त एवढाच काहीजणी यावर तात्काळ रिअ‍ॅक्ट होतात. समोरच्याला जन्माची अद्दल घडवतात. तर काहीजणींना मी टूचा आधार घ्यावा लागतो. पण त्यातून कोणाला कडक शिक्षा झाल्याचे अजून तरी ऐकण्यात, वाचण्यात आले नाही. फक्त काहीजणांच्या बायका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तर काहीजणींनी नवर्‍याचे कुत्र्यासारखे हाल केले. पण नंतर सगळं शांत झालं. त्या त्याच नवर्‍याबरोबर फॉरेन ट्रीप करून आल्या. मी टूमुळे त्या वेळे पुरता विस्कटलेला संसार पुन्हा सावरला. उलट त्याच बायकांनी मग मी टू करणार्‍या बाईवर तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभारत आपला नवरा किती गुणी असल्याचे सांगत त्याचे गोडवे गायले. म्हणजेच एका स्त्रीवरील अत्याचाराच्या व्यथेकडे दुसरीने सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. कारण त्यामागचं सत्य जाणण्यात तिला काहीच इंटरेस्ट नसतो किंवा ते सत्य पचवण्याची क्षमताच नसते. यामागे आपली समाजव्यवस्थाही आहेच. कारण नवरा कसाही असला तरी तोच खरा आयुष्याचा साथीदार असतो हे तिच्या मनावर इतके बिंबवले गेलेले असते की, ती त्याच्या असंख्य चुका, थेरं समोर दिसत असूनही त्या डोळे उघडून बघण्यास तयार नसते.

कारण तिला संसार प्रिय असतो. यामुळे त्या ‘मी टू’ करणार्‍या महिलेच्या बाजूने दुसरी स्त्री कधीच विचार करत नाही. पण त्यातून नवर्‍याबद्दल एक असुया बाळगून ती संसार करत राहते.

चडफडत राहते. नंतर शांत होते. पण जिच्यावर त्याने अतिप्रसंग केलेत किंवा करण्याच्या प्रयत्न केला ती मात्र आतमध्ये धुसमसत राहते. म्हणूनच सुरूवातीला धारदार शस्त्राप्रमाणे पुरुषांवर आरोपाचे वार करणारी ‘मी टू’तली महिला नंतर आपसूकच शांत होते. तेवढ्यापुरता चर्चा रंगतात. पोलीस, न्यायालय, मीडिया, ब्रेकींग न्यूजमध्ये अशा घटना अग्रक्रमाने दाखवले जाणारे ‘मी टू’ प्रकरण नंतर बोथट होत जाते व गेले आहे. त्यातील धारच निघून जाते. कोर्ट, तारखांवर तारखाच्या जाळ्यात आरोपीबरोबरच पीडित महिलेलाही नामुष्कीचा सामना करावा लागतो.

तर दुसरीकडे तिने जे आरोप केले त्यावर गल्लोगल्लीच नाही तर घराघरात चर्चाही होतात. आरोपी पुरुषाची बाजू पुढे येण्याआधीच त्याला आपला समाज दोषी ठरवून मोकळा झालेला असतो.

त्यानंतर अजून चारजणी अवतरतात. तिला पाठिंबा देत आपल्यावरही आरोपीने किंवा दुसर्‍या कोणी असेच अत्याचार केल्याचा सामूहिक आरोप होता. पुन्हा थंड पडलेले प्रकरण पेट घेते.

पुन्हा तेच ब्रेकींग पुन्हा तेच आणि तेच. तारीख पे तारीख. आरोपीची जामिनावर सुटका. तिची चर्चा. दिवस महिने जातात. वर्ष सरत. ‘मी टू’चे तिने केलेले आरोप थंड पडलेले असतात. त्याची चर्चा आता होत नाही. लोक तिला विसरलेले नसले तरी ती जुन्या बातमीसारखी होते. पुन्हा कुठलं ‘मी टू’ प्रकरण झालं की रेफरन्ससाठी तिचं नाव गुगलवर सर्च केलं जातं. एका क्लिकवर तिचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ दिसतो. तेवढ्यापुरते तिचे फोटो चॅनेल व वर्तमानपत्रात झळकतात. नंतर परत शांत.

कारण एकच जशी ती बातमी जुनी झालेली असते तिचं महत्व कमी होत जातं शिवाय अशी प्रकरणं जेव्हा कोर्टात जातात तेव्हा ती बरीच वर्षे चालतात. त्यामुळे कधी कंटाळून तर कधी या तारखांचा ससेमिरा सोडवण्यासाठी दोन पक्ष आपसात सेटलमेंट करून प्रकरण मिटवतात.

तो त्याच्या मार्गाला जातो ती तिच्या मार्गाने निघून जाते. लोकही विसरतात. तोपर्यंत एखादी नवीन घटना घडते… मीडिया त्यामागे धावते. ‘मी टू’चे आरोप फाईलीत अडकतात.

त्यातून फारसं काही साध्य होताना दिसत नाहीये. कारण यात महिला तातडीने नाही तर काही वर्षांनी एखाद्या घटनेच्या निमित्ताने आपल्यावरील आपबीती मांडतात. ज्यात वेळही निघून गेलेली असते आणि त्या घटनेचे पुरावेही. थोडक्यात काय तर साप निघून गेल्यावर जमिनीवर काठ्या आपटण्याचा प्रकार..

यामुळे वेळीच अन्यायाविरोधात आवाज उठवणे हे कधीही योग्य. कमीत कमी आपल्यासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशात महिलांना स्वत:ची वेगळी ओळख मिळवण्यासाठी पावलोपावली झगडावे लागत आहे. मग अशावेळी जर तिच्या शरीराचा उपभोगाच्या मोबदल्यात कोणी तिला कामाचे आमिष दाखवत असेल तर तिने आहे त्याच ठिकाणी त्याचा समाचार घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘मी टू’ची गरज नाही. कमीत कमी सुशिक्षित महिलांना तर नाहीच नाही. कारण आपल्याला महिलांसाठी असलेल्या कायद्याचे ज्ञान आहे. मग असे असतानाही इतकी वर्षे का लागतात या महिलांना अत्याचाराला वाचा फोडायला हे त्यांनाच आधी कळायला हवे. कारण आता काळ बदलला आहे. स्त्रियादेखील अर्थाजनासाठी घराबाहेर पडल्या आहेत. अशावेळी घरापेक्षा ऑफिसमध्ये त्यांचा वेळ अधिक जातो. सहकारीच कुटुंब बनतात. सुखदुखाची देवाणघेवाण होते. त्यातून बर्‍याचवेळी मैत्री व प्रेम होते. पण नंतर कुठल्या कारणावरून त्यांच्यात ब्रेकअप होतो. मग दोन्ही जण सुडाने पेटून उठतात. एकमेकांवर चिखलफेक करतात. शेवटी मग काहीजणी याच मीटूचा गैरफायदा घेत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोपही करत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत.

तर काहीजणी पुरुषाच्या लंपट वृत्तीचा गैरफायदा घेत मोठी पदही मिळवत असल्याचं बघायला मिळतं. याचा अर्थ सगळेच पुरुष वाईट किंवा महिलाच बनेल असाही नाही.

तर आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येकाला पुढे जायचयं. स्पर्धा वाढत आहेत. पाश्चिमात्य संस्कृती कॉपी करत आता लग्न न करता लिव्ह इनमध्ये राहण्याकडे मुलामुलींचा कल वाढतोय.

शरीरसुखाची व्याख्या माईंड रिलॅक्सेशन अशी झाली आहे. ज्यात प्रेमापेक्षा गरजांचाच जास्त भाग आहे. यामुळे गरज संपली किंवा भूक मिटली की, कंटाळा येऊन ही मुलंमुली समोरच्याचा ससेमिरा टाळण्यासाठीही मी टूचं हत्यार उचलत आहे. यामुळे ज्या व्यक्तीवर ‘मी टू’चे आरोप आहे त्या व्यक्तीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत तरी आपण त्याला दोषी मानणं गैर आहे.

मात्र जर एखादी महिला कामात पुरुषापेक्षा सरस ठरते तेव्हा काही जण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. तिला बदनाम करण्याचे कारस्थान करतात. कारण कामात तिची बरोबरी करण्याची क्षमता आणि लायकीच दोन्ही त्यांच्यात नसतात. यामुळे एखाद्या महिलेचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. अशावेळी महिलेने ‘मी टू’पेक्षा सरळ त्याला कोर्टात खेचावे, पण त्या आधी त्याचा समाचार मात्र नक्की घ्यावा. जेणेकरून मागचा शहाणा होईल.

दरम्यान, जर खरंच एखाद्या महिलेवर अन्याय झाला असेल किंवा होत असेल तर तिचं इतकं वषर्ंं गप्प बसणं हे समाजासाठी घातक व आरोपीसाठी मात्र पोषक आहे असंच म्हणावं लागेल.

कारण तिच्या मौनालाच तो संमती समजू शकतो. ती आपलं काहीच वाकडं करू शकत नाही असा फालतू आत्मविश्वास त्याच्यात बळावतो. त्यातून मग तो अजून काही महिलांचाही छळ करतो. म्हणजेच तिच्या त्या मौनाची किंमत तिच्यासारख्याच अनेक जणींना मोजावी लागलेली असते. मग यासाठी दोष कोणाला द्यायचा. यासाठी आधी महिलांनीच काही गोष्टींबाबत ठाम असायला हवं. ‘मी टू’चा आधार घेणं अयोग्य जरी नसलं तरी ते फार प्रभावी ठरत नाहीये. हे गेल्या दोन वर्षांत मी टूचे आरोप झालेल्या व्यक्तींवरील कारवाईतून स्पष्ट झालं आहे. यामुळे उठसुठ मी टूचे आरोप करुन स्वत:ला व समोरच्याला मोठे न करता जेव्हा अन्याय होत असेल तेव्हाच आरोपीच्या
नांग्या ठेचण्याची हिंमत महिलांनी ठेवायला हवी. तेव्हाच खर्‍या अर्थाने महिलांना न्याय मिळेल.

#MeToo ही चळवळ १५ ऑक्टोबर २०१७ साली मानवी अधिकारासाठी लढणार्‍या समाजसेवक तराना बर्क या महिलेने खर्‍या अर्थाने सुरू केली होती.
बर्क यांनी कार्यालयात महिलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही चळवळ सुरू केली. सुरुवातीलाच या चळवळीला महिलांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला.
यामुळे दोन महिन्यातच या चळवळीचा समावेश नामांकित टाईम मॅगेझिनच्या पर्सन ऑफ द इयरमध्ये करण्यात आला.
मात्र ही चळवळ खरं तर ११ वर्षांपूर्वीच मायस्पेस नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुरू झाली होती. पण त्याचा प्रमुख उद्देश हा लिंग, वर्ण व भेदभाव या मुद्यांवर लढण्याचा होता.
पण याच चळवळीच्या हॅशटॅगखाली २०१७ साली हॉलीवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हीने निर्माता हार्वी वाइंस्टाइन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.
त्यानंतर जगभरात खळबळ उडाली अनेक स्त्रियांनी तिला पाठिंबा देत आपल्यावरही अन्याय झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर तब्बल ८३ देशांत #MeToo चळवळ पोहचली.
भारतात २०१८ साली तनुश्री दत्ता या अभिनेत्रीने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर काही वर्षांपूर्वी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यानंतर देशात अनेक सेलिब्रिटींच्या अडचणी वाढल्या.
अनेकजणींनी पुढे येऊन त्यांच्यावर एकेकाळी झालेल्या लैंगिक अत्याचारांचा लेखाजोगाच मांडला. यात अनेक दिग्गजांचा समावेश होता.
ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ, किरण नगरकर, सुहैल सेठ, साजिद खान यांसारख्या विविध सेलिब्रिटीजबरोबरच पत्रकारांचाही समावेश होता. ती एक लाट होती.
नंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. पण आज ते ही सामान्य जीवन जगत आहेत. शिक्षेपर्यंत कोणीही पोहचलेले नाही. मग काय उपयोग या ‘मी टू’चा.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -