घरफिचर्सदुसरी राणीची बाग

दुसरी राणीची बाग

Subscribe

मुंबईचे क्रॉफर्ड मार्केटबद्दल मी याच मालिकेत लिहिले होते. मुंबईतील सर्वात पहिले मोठे मार्केट अथवा त्या काळातील पहिला मॉल क्रॉफर्ड मार्केट. मॉलची संकल्पना मुंबईत याच क्रॉफर्ड मार्केटमधून पुढे विकसित झाली असावी. मॉल ही भारतीय संकल्पना नाही. ती युरोप, अमेरिकेतून भारतात आली आहे. तसेच क्रॉफर्ड मार्केट ही संकल्पना इंग्रजांनी मुंबई, पर्यायाने भारतात आणली.

एकाच छताखाली सर्व वस्तू उपलब्ध होणे यास मॉल असे म्हटले जाते. मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये असेच एकाच छताखाली त्यावेळी अनेक गोष्टी उपलब्ध होत होत्या. म्हणजे क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्यावेळी किराणा माल, फर्निचर, हार्डवेअर, कपडे, खाण्याच्या विविध वस्तू, भाजीपाला, फळे मिळायची. तसेच कोंबडी, बकर्‍याचे मांस, मासे विकले जायचे. इतकेच नव्हेतर या बाजारात विविध प्रकारचे पक्षी, कुत्रा, मांजरासारखे प्राणी विकले जायचे.

या मार्केटमध्ये हरणाचे बछडे, घोरपड, माकड, अस्वलाचे पिल्लू, साप, अजगर विकायला ठेवल्याचेही मी पाहिले आहे. पुढे वन्यजीव आणि पक्ष्यांबद्दल कायदे कडक झाले आणि वन्यजीव मार्केटमध्ये दिसेनासे झाले. तरीही आता या बाजारात पोपट, कबुतर, विविध चिमण्या विकायला ठेवलेल्या पाहायला मिळतात.

- Advertisement -

लहानपणी मुंबईतील राणीच्या बागेनंतर आमचे सर्वाधिक आवडीचे फिरण्याचे ठिकाण क्रॉफर्ड मार्केटमधील हा प्राणी विभाग होता. मार्केटच्या मागच्या बाजूला विकायला आणलेल्या प्राण्यांचे पिंजरे होते. या भागात फिरवून आणणार तरच मी तुमच्यासोबत क्रॉफर्डला येतो अशी रितसर अट घातली जायची. आज कोणाला सांगून खरे वाटणार नाही; पण त्या काळात आम्हा मुलांना क्रॉफर्डचे आकर्षण फक्त तेव्हढ्या एका गोष्टीमुळे होते.

एकदा असेच मामासोबत क्रॉफर्डला गेलो होतो. मामाच्या मित्राला त्यावेळी घोडा खरेदी करायचा होता. या मार्केटमध्ये घोडाही मिळतो याचे आश्चर्य वाटले. आम्ही साधारणतः 60 ला झुकलेल्या नासिमभाईकडे गेलो. मामा त्याच्याशी बोलणी करत होता आणि मी घोडा कुठे दिसतोय का हे शोधत होतो. त्यांची बोलणी झाली आणि नासिमभाईने आम्हाला मार्केटबाहेर नेले.

- Advertisement -

तेथे चक्क चार घोडे बांधून ठेवले होते. ते बघून खूप आनंद झाला. एका घोड्याला मी हातही लावला आणि मामाची ओरडणं ही ऐकले. पुढे त्यांच्यात त्या घोड्याची डील झाली नाही. पण नासिमभाई चांगले ओळखीचे झाले. कॉलेजमध्ये असताना मग या मार्केटमध्ये अनेकदा येणे जाणे व्हायचे. तेव्हा नासिमभाईंनी मला एकदा अस्वलाचे पिल्लू आणि घोरपड विकायला ठेवल्याचे दाखवले होते. पक्षी, शोभेचे मासे, विविध जातीचे कुत्रे, मांजरी खरेदी करण्यासाठी त्याकाळी मुंबईकरांची येथे गर्दी व्हायची. या गर्दीत एकदा दर्दी प्राणीप्रेमी येथील दुकानदार अलगद हेरायचे आणि मग अशाच लोकांकडे वन्यप्राण्यांच्या विक्रीचा विषय काढला जायचा.

1988 सालची गोष्ट असेल मी दोन मित्रांसोबत या मार्केटमध्ये फिरायला गेलो होतो. एका दुकानाबाहेर पिंजर्‍यात मांजरीसारखी दिसणारी दोन पिल्ले ठेवली होती. माझ्या मित्राने त्या दुकानदाराला विचारले, ये क्या है, त्याने बिल्ली म्हणून उत्तर दिले. पण ती मांजरीची पिल्ले वाटत नव्हती. आमचा अंदाज खरा ठरला. कारण त्यानंतर आम्ही एक आठवड्याने पुन्हा मार्केटमध्ये गेलो तेव्हा ती पिल्ले तेथे नव्हती.

मार्केट मैं शेर के बच्चे बेचे गये, अशी माहिती आम्हाला त्यावेळी नासिमभाईने दिली. तर सांगायचा मुद्दा असा की या बाजारात काहीही विकले जायचे. एका माणसाने अजगर खरेदी केल्याचे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे. आता या बाजारात नासिमभाई नाहीत आणि हा बाजार पूर्वीसारखा राहिलेला नाही. नासिमभाईचे सात वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर माझेही मार्केटमध्ये जाणे बंद झाले. गेल्या आठवड्यात कामासाठी त्या भागात गेलो असताना मी मार्केटमध्ये एक फेरफटका मारला. मार्केटमध्ये मरगळ आल्याचे दिसले.

पक्ष्याचे पिंजरे होते, त्यात काही रंगीबेरंगी पोपट, चिमण्या होत्या. कबुतरे होती, कुत्रे, मांजरे होती. काही पाळीव ससेही होते; पण माझी नजर जे शोधत होती तसे काहीच दिसले नाही. पण मी निराश नव्हतो. कोणीही आपली रोजीरोटी धोक्यात घालून काहीही विकणार नाही, हे उमजत होते. पण कुठेतरी कमतरता जाणवत होती. मुंबईच्या राणीच्या बागेप्रमाणे ही दुसरी बाग उद्ध्वस्त झाली होती.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -