घरफिचर्सशरद पवार: देशाला दिशा देणारा साधा माणूस

शरद पवार: देशाला दिशा देणारा साधा माणूस

Subscribe

राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी पवार हे एका विद्यापीठासारखे आहेत. फक्त त्यांचा अभ्यास करताना पुर्वग्रहाचे चष्मे मात्र बाजुला ठेवावे लागतील... शरद पवार यांना वाढदिवसाच्या सदिच्छा...

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सर्वाधिक अनुभव असलेले एकमेव राजकारणी म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. आपल्या ५० वर्षांच्या संसदिय कारकिर्दीत आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विधीमंडळ विरोधी पक्षनेते, केंद्रीय मंत्री अशी अनेक पदं त्यांनी भुषवली. पवारांची ओळख त्यांच्या कामगिरीमुळे नावाजली जातेच, मात्र त्यापेक्षाही पवार अधिक प्रसिद्ध त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे. सामाजिक जीवनात वावरणाऱ्या प्रत्येकाला पवारांचे व्यक्तिमत्व भुरळ पाडत असतं. राजकीय-सामाजिक जीवनात आपल्या ध्येयकडे वाटचाल करत असताना कार्यकर्त्याची भूमिका, सामाजिक वावर आणि संवाद कौशल्य कसं असलं पाहीजे, याचा वस्तूपाठच पवारांनी घालून दिलाय.

पत्रकार म्हणून शरद पवार यांच्या पत्रकार परिषद, जाहीर सभा आणि पक्षीय बैठकांचे वार्तांकन करण्याची संधी मला मिळाली. या काळात खरंच पवार कसे आहेत, हे माझ्या ‘आकलना’नुसार जोखता आलं. तसं पवारांना जोखण्यात भल्याभल्याची भंबेरी उडाली. तरिही पवार लोकप्रियतेच्या शिखरावरुन आजतागायत पायउतार झालेले नाहीत. याचे एक मला कळलेले कारण म्हणजे, साधेपणावर विश्वास किंबहुना तीच त्यांची जगण्याची शैली… आत्मस्तुतीसाठी खटपटणारे आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय पीआर एजन्सी नेमणारे राजकारणी देखील आपल्या समोर आहेत. दिवसाला तीन वेळा कपडे बदलून लोकांसमोर येऊन दुष्काळ, गरीबीवर बोलणारेही पुढारी आहेत. मात्र सकाळी सात वाजल्यापासून रात्री सर्वांचा निरोप घेईपर्यंत, आपला आजार, आपली दुखणी स्वतःकडेच ठेवत लोकांसाठी कार्यरत असणारे पवार हे एकमेव.

- Advertisement -

सभेतला वावर तरुणांसाठी आदर्शवत

जाहीर सभेतले पवार मला लक्षात राहिलेले किंवा भावलेले आहेत असं म्हणा. पत्रकार असल्यामुळे मुळातच निरीक्षण करणं हा स्थायीभाव. त्यात पवारांची सभा असेल तर त्यांच्या प्रत्येक बारीक कृतीकडं सर्वांचंच लक्ष असतं. पवार कोणत्याही सभास्थळी येताना कधीच लवाजमा घेऊन येत नाही. फार फार तर जितेंद्र आव्हाड सारखा नेता सभा आयोजित करत असेल तर बाईक-मोटार रॅली काढली जाते. तरिही त्यात पवार कधीच हुरळून जात नाहीत. सभेस्थळी आल्यानंतर पवार ज्या पद्धतीने मंच, मागे लावलेला बॅनर, मंचावरील आसन व्यवस्था, तिथे कोण उपस्थित आहेत आणि मग जमलेल्या श्रोत्यांकडे कटाक्ष टाकतात. त्यांच्या हा एक कटाक्ष बरंच काही सांगून जातो.

पवारांचे वैशिष्ट म्हणजे, सभा मुंबईत असो किंवा चंद्रपूरच्या (२०१७ साली तब्बल वीस वर्षांनतंर दोन दिवसांचा दौरा केला होता.) एखाद्या तालुक्यात. पवार मंचावर आल्यानंतर आयोजकांनी दिलेली सर्व कागदपत्रे चाळून पाहतात. स्थानिक वृत्तपत्रांनी काढलेले विशेषांक असतील, पदाधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल किंवा लोकांकडून येणारे निवेदन असतील… पवार तिथल्या तिथे त्याचे वाचन करतात. आपल्या भाषणाची वेळ येईलपर्यंत पवारांचं सर्व वाचन झालेलं असतं. वाचन करता करता सहकारी वक्ता काय बोलतोय याकडेही त्यांचे ‘कान’ असतात. त्याचा मुद्दा खोडून टाकायचा असेल किंवा त्यात भर टाकायची असेल तर जागच्या जागी तो मुद्दाही ते लिहून काढतात.

- Advertisement -
sharad pawar speech
जाहीर सभेत प्रत्येक गोष्ट न्याहाळताना शरद पवार

लातूरची ती सभा लक्षात राहिली

आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन? पण, मी जेवढ्या सभा पाहिल्या आहेत. त्यात मला पवारांचेच गुण उजवे वाटलेत. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण लातूर येथे होणार होते. या सभेचे वार्तांकन करायला मी गेलो होतो. पवारांसहीत सर्वपक्षीय ज्येष्ठ नेते या सभेला उपस्थित होते. नेहमीप्रमाणे पवारांनी स्थानापन्न झाल्यावर कागदपत्रे तपासायला सुरुवात केली. लातूर मधील अनेक स्थानिक वृत्तपत्रांनी विशेषांक काढले होते. हे सर्व विशेषांक देण्यासाठी संबंधित मंडळी मंचावर येत होती. पवार प्रत्येकाचा अंक चाळत होते. आवडलेल्या अंकाच्या खाली संपादक कोण? हे ही वाचत असल्याचेही कळत होतं. यात वेगळेपण हे की, इतर पक्षांचे नेते तेच अंक हातात घेऊन बाजुला ठेवत होते. त्यामध्ये काय लिहिलंय आपण देशमुखांच्या कृतज्ञता सोहळ्यात आलो आहोत, त्यामुळे त्यांच्यासाठी काढलेल्या अंकावर नजर मारावी, इतकेही भान कदाचित कार्यव्यापामुळे त्यांच्याकडे नव्हते.

आपल्या भाषणात पवारांनी एक फोटो विशेषांक लोकांनाही दाखवला आणि त्या फोटोमागची आठवण कथन केली. त्याचबरोबर मुंडेच्या कन्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या शाब्दिक कोटीलाही जशाचतसं उत्तर देत.. आपला चाणाक्षपणा दाखवून दिला.

‘सिल्वर ओक ओपन टू ऑल’

आजही मुंबईत असताना पवार मलबार हिल येथील सिल्वर ओक या बंगल्यावर सकाळी ७ वाजल्यापासून ‘ओपन टू ऑल’ असतात. मी जेव्हा पहिल्यांदा आमच्या संपादकांसहीत त्यांना सकाळी भेटायला गेलो तेव्हा मलाच विश्वास बसत नव्हता. पण तिथे गेल्यावर पाहतो तर काय आमच्याआधी तिथे पन्नास एक लोक भेटण्यासाठी जमलेले होते. आमचा नंबर आठ वाजता आला. आम्हाला दिलेल्या दहा मिनिटांच्या वेळेत सर्वांच म्हणणं ऐकूण घेतलं. काही सल्लेही दिले आणि त्यानंतर फोटोही.

सामान्य माणसाला साध्या नगरसेवक किंवा आमदाराला भेटायचे असेल तर अनेकदा चपला घासाव्या लागतात. मात्र देशपातळीवरचा एवढा मोठा नेता स्वतःच्या घरी कुणालाही इतक्या सहज भेटतो, याचे मला आजपर्यंत नवल वाटतं.

पवारांच्या राजकीय भूमिका विवादीत आहेत. प्रत्येक जण त्याचा आपापल्या ‘आकलना’नुसार अन्वयार्थ काढतो. मात्र त्यांची राज्य आणि देशाप्रतीची तळमळ नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. म्हणूनच देशात कुठेही ‘डिझास्टर’ परिस्थिती निर्माण होते, तेव्हा पवारांचीच आठवण सर्वांना होते. (संदर्भ – वाजपेयींनी पंतप्रधान असताना भूज भुंकपानंतर पवार यांनाच पुर्नवसन करण्याची जबाबदारी दिली होती.) राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी पवार हे एक विद्यापीठ आहेत. फक्त त्यांचा अभ्यास करताना पुर्वग्रहाचे चष्मे मात्र बाजुला ठेवावे लागतील…


लेखक आपलं महानगरचे प्रतिनिधी असून हा लेख त्यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारीत आहे.

वाचा – १२ डिसेंबर: महाराष्ट्रातील या तीन दिग्गजांचा वाढदिवस!!

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -