घरफिचर्सस्वॅग से करेंगे सबका स्वागत !

स्वॅग से करेंगे सबका स्वागत !

Subscribe

अमुक जातीचा माणूस शेजारी बसला असेल तर मी जेवणार नाही, अशी अस्पृश्यता बाळगणं आणि झोमॅटोवरून ऑर्डर करून माणूस मुस्लीम आहे म्हणून ऑर्डर रद्द करणं यात काय फरक आहे? दोन्ही बाबी एकसारख्याच आहेत. ऑनलाइन ऑर्डर केली किंवा अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप वापरलं म्हणून कुणी मॉडर्न होत नाही. मनामध्ये जाती-धर्माची बुरशी असेल तर कुठलंही अ‍ॅप ते दूर कसं करू शकेल? अंगावर जीन्स आहे, हातात आयफोन आहे, नेटवर अवघ्या जगाची खिडकी खुली आहे, पण मनाचे दरवाजेच बंद असतील तर काय फरक पडणार !

२००७-०८ च्या आसपासची गोष्ट. मी नुकताच पुण्यात आलो होतो. एका विषयावर मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा सुरू होत्या आणि मध्येच मित्राने एका संशोधनपर लेखाचा संदर्भ दिला. मी म्हटलं ‘आता हा लेख कुठं मिळणार यार?’ तेवढ्यात दुसरी मैत्रीण म्हणाली, ‘माझ्याकडे आहे, तुझा इमेल आयडी दे.’ मी काही दिवसांपूर्वीच इमेल अकाउंट सुरू केलं होतं. मी पटकन तिला माझा इमेल आयडी सांगितला आणि माझा अकाउंटचा पासवर्डही. माझ्या बोलण्यानंतर एकच हशा पिकला. ‘पासवर्ड कुणी देतं का?’ मी ठार मॅड आहे, अशी नजर टाकत मित्र म्हणाला. त्यानंतरच्या गप्पांमध्येही मी मॉडर्न व्हायला हवं, असं खेडवळ राहता कामा नये, असं उपदेशाचं अमृत मला मिळालं.

नव्या टेक्नॉलॉजीसोबत जुळवून घेता आलं की आपण आपोआप मॉडर्न होतो, असा एक समज आहे. मला हा प्रसंग मागच्या आठवड्यातील एका बातमीनंतर पुन्हा आठवला. मागच्या आठवड्यात एका गृहस्थाने झोमॅटो नावाच्या अ‍ॅपवरून खाणं मागवलं. त्यानंतर अमुक व्यक्ती तुमची खाद्यपदार्थाची डिलीव्हरी घेऊन येत आहे, असा त्यांना मेसेज आला. डिलिव्हरी देणार्‍या व्यक्तीचं नाव पाहताच गृहस्थ वैतागले. तो मनुष्य मुस्लीम होता म्हणून त्यांनी झोमॅटोकडे तक्रार केली.

- Advertisement -

माझं खाणं घेऊन येणारा माणूस मुस्लीम आहे, ऑर्डर रद्द करा, अशी मागणी त्यानं केली. झोमॅटोने चक्क यावर उत्तर दिलं- ‘खाण्यापिण्याला कसला आहे धर्म ! अन्न हाच एक धर्म आहे.’ फेसबुक ट्विटरवर हे उत्तर व्हायरल झालं. माणूस कोणत्या जातीचा, धर्माचा यावरून आपलं वागणं बदलणार का आणि तसं असेल तर हे निषेधार्ह आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. अमुक जातीचा माणूस शेजारी बसला असेल तर मी जेवणार नाही, अशी अस्पृश्यता बाळगणं आणि झोमॅटोवरून ऑर्डर करून माणूस मुस्लीम आहे म्हणून ऑर्डर रद्द करणं यात काय फरक आहे? दोन्ही बाबी एकसारख्याच आहेत. ऑनलाइन ऑर्डर केली किंवा अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप वापरलं म्हणून कुणी मॉडर्न होत नाही. मनामध्ये जाती-धर्माची बुरशी असेल तर कुठलंही अ‍ॅप ते दूर कसं करू शकेल? अंगावर जीन्स आहे, हातात आयफोन आहे, नेटवर अवघ्या जगाची खिडकी खुली आहे, पण मनाचे दरवाजेच बंद असतील तर काय फरक पडणार !

शरीर एकविसाव्या शतकात असतानाही मन जर हजारो वर्षांपूर्वीच्या मनुस्मृतीत असेल तर आपला मोठा लोच्या झाला राव. मागे मला एकाने सांगितलं की कुठल्याही कर्मकांडासाठी आता ऑनलाइन गुरुजी (पुरोहित) मिळतील, यासाठी एक अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप आहे. फोन करून गुरुजींना बोलावून साग्रसंगीत कर्मकांड करायची, असा हा सारा गमतीचा प्रकार आहे. स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती स्मार्ट केव्हा होणार भिडू? स्मार्टनेस हा केवळ दिसण्यावर नसतो तर तो आपल्या असण्यावर, विचार करण्यावर अवलंबून असतो. वेगवेगळ्या जातींचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स आहेत. त्यांच्या निरनिराळ्या वेबसाईट्स आहेत आणि आपले जातबांधवच यात असतील याची खबरदारी घेणारे तरुण लोक जास्त आहेत. हे म्हणजे असंय ना, नई बाटली में जुनीच दारू. म्हणजे प्रत्यक्षात असणार्‍या जातींच्या वस्त्यांचे आता सोशल मीडियावर ग्रुप झाले. आपल्या मनात भेदभाव करण्याची जी वृत्ती आहे ती इतकी खोल रुजली आहे की आपण प्रत्येक ठिकाणी भेदभाव करतो. कुणी ईशान्य भारतातनं आलं असेल तर त्याला ‘नेपाळी’, ‘गुरखा’ म्हणून चिडवणं असेल किंवा उत्तर भारतातले युपी बिहारी भाई, बाबू लोक महाराष्ट्रात नकोत म्हणून आंदोलन करणं असो, आपण शक्य त्या प्रकारे भेदभाव करत राहतो.

- Advertisement -

जसा निसर्ग भेदभाव करत नाही तसंच टेक्नॉलॉजी भेदभाव करत नाही, पण ती वापरणारा माणूस मात्र ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ असं म्हणूनही चुकीचं वागत राहतो. गंमत बघा ना मॅट्रिमोनियल साईट्सवरही जाती धर्माचा कुळाचा उल्लेख केलेला असतोच. काही वर्षांपूर्वी एका आईने आपल्या मुलासाठी जाहिरात दिली तिच्या मुलाला गे पार्टनर हवा म्हणून. ती जाहिरात पाहून मला विशेष वाटलं. आपला मुलगा गे आहे हे त्या बाईनं मान्य केल्याचं मला विशेष वाटलं. पुढची ओळ वाचून मात्र मला वाईट वाटलं कारण तिथं लिहिलं होतं- अय्यर कम्युनिटीचा मुलगा असल्यास विशेष प्राधान्य. लैंगिक कल बाईंनी मान्य केला तेव्हा त्या एक पाऊल पुढं गेल्या; पण जातीचं विष शिल्लक असल्याने दोन पावलं मागे. आपला सारा राडा झाला आहे तो इथेच. ‘हे विश्वची माझे घर’ म्हणायचे आणि कुणी पोर मंदिरात शिरला तर त्याला बेदम मारायचे आणि चोखोबाची पायरी आजही जिवंत ठेवायची. एकमेकांना समान मानल्याशिवाय आपल्या सर्वांचा विकास होणं अशक्य आहे.

आपण सारे भेद विसरुन मित्र आहोत ही भावना फार महत्त्वाची. केवळ फ्रेंडशिप बॅन्ड बांधून ही भावना मनात रुजत नाही. आतून वाटलं की ते प्रकट होतंच. या ना त्या कारणावरून माणसांना फुल्या मारत गेलो की आपण एक कोश तयार करतो. आपल्याच कोशात राहिलं की डबकं होतं. डबकं झालं की साचलेपण येतं. मानवी जगणं झर्‍यासारखं प्रवाही असतं. तसं असेल तर ते खरं जगणं. असं जगता आलं पाहिजे. तर आपण खरेखुरे मॉडर्न होऊ. मनातले सारे पूर्वग्रह दूर करून मुन्नाभाईसारखे हात फैलावून जोरदार झप्पी देऊन ‘स्वॅग से करेंगे सबका स्वागत’ असं म्हणता आलं पाहिजे. तभी तो बात बनेगी और कुछ तो फ्युचर होगा अपुनको, है ना?

-श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -