घरफिचर्सजैसे ज्याचे कर्म तैसे...

जैसे ज्याचे कर्म तैसे…

Subscribe

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर नरेंद्र मेहतांचे वर्चस्व वाढले होते. मेहता फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. गिल्बर्ट मेंडोसांचा राजकीय अस्त झाल्यानंतर मेहतांचा घोडा शहरात चौफेर उधळू लागला. त्यामुळे महापालिका, पोलीस, महसूल, वन यासह सरकारी खात्यांवर मेहतांचा प्रचंड वचक बसला. विरोधकांवरही मेहतांचा धाक होता. पण राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर मेहतांनी केलेल्या वादग्रस्त गोष्टी डोकी वर काढू लागल्या. मेहता यांनी केलेल्या विविध चुकीच्या गोष्टींच्या जाळ्यात शेवटी ते अडकले. त्यामुळेच त्यांना स्वत:च एक्झिट घ्यावी लागली.

अवघ्या दोन नगरसेवकांचे बळ असलेल्या नरेंद्र मेहता यांना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन विकास आघाडी, बसपा आणि जनता दलाने मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदावर विराजमान केले. काँग्रेसला रोखण्यासाठी अर्थपूर्ण संबंधातून घडलेल्या या अनेकांना अचंबित केलेल्या नाट्यमय घडामोडीने त्यानंतर शहरातील राजकारण बदलून टाकले. ज्यांनी महापौरपदावर बसवले त्यांनाच राजकारणातून नेस्तानाबूत करीत मेहतांनी स्वतःचे वर्चस्व निर्माण केले. पण, मेहतांना आपले वर्चस्व फार काळ टिकवता आले नाही. प्रचंड आर्थिक सत्ता निर्माण केलेल्या मेहतांनी शहरात विरोधकांचे जाळे तयार केले होते. सत्तेच्या नशेत बुडालेले मेहता चुकांमागून चुका करीत राहिल्याने आपसूक त्यात अडकले गेले आणि अवघ्या काही वर्षातच मेहतांच्या राजकीय पिछेहाटीला सुरुवात झाली.

2002 सालच्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत मेहता अपक्ष म्हणून निवडून आले. निवडून आल्यानंतर काही महिन्यातच एका अनधिकृत बांधकामप्रकरणी लाच घेताना मेहतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने वादाने सुरू झालेली मेहतांची राजकीय कारकीर्द वादग्रस्तच राहिली. राजकीय गणिते मांडताना अर्थकारण करणार्‍या मेहतांनी आपल्या पहिल्याच टर्ममध्ये काँग्रेसच्या नगरसेवकांना फोडून प्रभाग समितीचे सभापतीपद पटकावले. त्यानंतर मेहतांची राजकीय कारकीर्द बहरत गेली. 2007 च्या महापौरपदाच्या निवडणुकीत तेव्हाचे राष्ट्रवादीचे नेते, मीरा-भाईंदरचे सर्वेसर्वा गिल्बर्ट मेंडोंसा यांनी काँग्रेसला, अर्थातच काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांना शह देण्यासाठी एक खेळी खेळली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्यासाठी मेंडोसांनी राष्ट्रवादीसह शिवसेना, बहुजन विकास आघाडी, बसपा आणि जनता दलाला एकत्रित करून दोन नगरसेवक असलेल्या अपक्ष नरेंद्र मेहता यांना महापौर बनवले. त्यावेळी मेंडोसांचा शब्द मोडायची हिंमत कुठल्याही पक्षात नसल्याने मेहता महापौरपदावर विराजमान झाले. पण, मेंडोसांची हीच खेळी पुढे त्यांच्या राजकीय अस्ताला कारणीभूत ठरली.

- Advertisement -

महापौरपदावर विराजमान झाल्यानंतर मेहतांनी भाजपची वाट धरली. त्यावेळी गोपीनाथ मुंडेंची साथ त्यांना मिळाली. दुसरीकडे, महापालिकेच्या सत्तेचा वापर करीत मेहतांनी टीडीआरपासून बांधकाम परवानग्यांमध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल करीत शहरात आर्थिक साम्राज्य तयार करण्यास सुरुवात केली. शहरात एकीकडे मराठी टक्का घसरत असताना जैन, मारवाडी, गुजराती मतांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत होता. भविष्यातील राजकीय गणिते जुळवत असलेल्या मेहतांनी जैन कार्ड वापरत गुजराती, मारवाडी यांच्या मतांचे राजकारण सुरु केले.

आर्थिकदृष्टया ताकदवान बनत चाललेल्या मेहतांच्या राजकीय महत्वाकांक्षा वाढत होत्या. त्यातूनच त्यांनी गिल्बर्ट मेंडोसांना आव्हान उभे करीत 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. ज्या मेंडोसांनी राजकीय बळ दिले, त्याच मेंडोन्सांपुढे मेहतांचे मोठे आव्हान होते. पण, मेहतांचा पराभव झाला. त्यानंतरच्या 2012 च्या महापालिकेच्या निवडणुकीत मेहतांनी भाजपची सत्ता आणून आपले आव्हान कायम ठेवले होते. परिणामी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत मेेंडोसांचा पराभव करीत मेहता आमदार बनले. यानंतर शहरातील मेंडोसांचे साम्राज्य खालसा झाले. मेंडोसांनी ज्याला राजकीय बळ दिले त्याच मेहतांमुळे त्यांचा राजकीय अस्त झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

- Advertisement -

राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर मेहतांचे वर्चस्व वाढले. मेहता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. मेंडोसांचा राजकीय अस्त झाल्यानंतर मेहतांचा घोडा शहरात चौफेर उधळू लागला. त्यामुळे महापालिका, पोलीस, महसूल, वन यासह सरकारी खात्यांवर मेहतांचा प्रचंड वचक बसला. विरोधकांवरही मेहतांचा धाक होता. पक्षांतर्गत विरोधकांनाही मेहतांनी बाजूला सारून आपल्या मर्जीतील माणसे पेरण्याचे काम केले. तिकडे महापालिकेत गीता जैन यांना महापौर बनवल्यानंतर मेहता यांच्याविरोधात एक गट तयार होत होता.

ही बाब लक्षात येताच मेहतांनी गीता जैन यांच्या महापौरपदाची कारकिर्द संपल्यानंतर त्यांना संपवण्याचे कामही सुरू केले. शहरात जैन, मारवाडी, गुजराती कार्ड वापरत असलेल्या मेहतांनी महापालिकेच्या महापौरपदावर गुजराती चेहराच देण्याचे काम केले. मराठी भाषिकांना मेहता दूर करीत. त्याचा अनुभव शहरातील मराठी भाषिक पत्रकारांनी घेतला. इतकेच कशाला, मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जैन धर्मीय मुनींची भाषणे सोशल मीडियावर फिरत होती. त्यात मेहतांचा प्रचार करणारे जैनमुनी दिसत होते. एका जैन मुनीने तर गीता जैन या जैन असूनही त्यांच्याबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ चांगलाच गाजला होता. यावरून धर्मगुरुंवर असलेली मेहतांची पकड लपून राहिली नव्हती.

पाच वर्षाच्या कालखंंडात मेहता सतत वादातच राहिले. महापालिकेतील टेंडरमध्ये असणारा मेहतांचा हस्तक्षेप ठेकेदार, अधिकार्‍यांना डोकेदुखी ठरत होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेना नगरसेवकांशी मेहतांचे वारंवार खडके उडत असत. गेल्यावर्षी तर मेहतांनी थेट शिवसेनाप्रमुखांवर निशाणा साधण्यासही मागेपुढे पाहिले नव्हते. टीडीआर घोटाळा, अनधिकृत बांधकामे, तिवरांच्या झाडांची कत्तल अशा अनेक आरोपांमुळे मेहता सतत वादाच्या भोवर्‍यात होते. पण, फडणवीसांसह भाजपमधील बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याने मेहता कुणालाही जुमानत नसत. गीता जैन यांचाही ते सार्वजनिक ठिकाणी अपमान करण्यास मागेपुढे पाहत नसत.

2019 विधानसभा निवडणुकीनंतर मेहतांच्या पिछेहाटीला सुरुवात झाली. गीता जैन यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेत मेहतांना आव्हान दिले. वरवर पाहता जैन यांचे आव्हान आहे असे वाटतच नव्हते. दुसरीकडे, सत्ता, संपत्ती, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची फौज असलेल्या मेहतांपुढे जैन कितपत टिकाव धरतील असेच वरवर वाटत होते. पण, आतून जनमत, वातावरण मेहतांच्या प्रचंड विरोधात होते. पक्षांतर्गत विरोधकांसह सर्वच पक्षांनी आतून एकजूट करीत मेहतांना धडा शिकवण्याचा चंग बांधला होता. गीता जैन यांनीही सकारात्मक प्रचारावर भर देत वातावरण निर्मिती केली होती. परिणामी मेहतांचा दारुण पराभव झाला. इथूनच मेहतांची सर्वच पातळ्यांवर पिछेहाट सुरु झाली. मेहतांचा गॉडफादर विरोधी बाकावर बसल्याने मेहतांविरोधातील सूर अधिकच तीव्र झाले.

महापौरपदाच्या निवडणुकीच्या आधी मेहतांनी अचानक राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर काही तासातच एकेकाळी त्यांच्या जवळ असलेल्या भाजपच्या एका नगरसेविकेने बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवून मेहतांची कोंडी केली. पीडित महिलांचा वायरल होऊ घातलेल्या व्हिडिओमुळेच मेहता यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत असतानाच राजकीय संन्यास घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर मेहतांच्या संकटांमध्ये वाढत होत आहे. त्यांच्याशी संबंधित असलेल्या सेव्हन इलेव्हन कंपनीचे बांधकाम प्रकल्प आणि हॉटेल प्रकल्प अनधिकृत बांधकामामुळे वादग्रस्त ठरले आहेत. काही गुन्हे दाखल होत आहेत, तर काही दाखल होण्याच्या मार्गावर आहेत.

मेहता यांची सामाजिक प्रतिष्ठा डागाळल्याने महापालिकेतील पदाधिकार्‍यांच्या दालनात असलेल्या मेहतांच्या तसबिरी हटवण्यात आल्या आहेत. पक्षाची धुरा आता माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मेहतांनी पक्ष सोडल्याचे कारण पुढे करीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही. नैतिकेच्या गप्पा मारणार्‍या भाजपच्या बॅनर आणि सोशल मीडियावर मेहतांचा भाजप नेते असाच उल्लेख असतो. राजकीय पिछेहाट सुुरु असलेल्या मेहतांना सध्या तरी भाजपचाच एकमेव आधार आहे.

जैसे ज्याचे कर्म तैसे…
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -