घरफिचर्स’व्याख्यानांची दुकानदारी’

’व्याख्यानांची दुकानदारी’

Subscribe

प्रबोधनची परंपरा महाराष्ट्रदेशी तशी प्राचीन, कालोघात तिची माध्यमं फक्त बदलली. पूर्वी गावोगावी भक्तीमार्गाने प्रबोधन केले जाई. प्रवचन, कीर्तन ही त्याची प्रभावी माध्यमं, नंतरच्या काळात शाहिरी परंपरेतून निर्मित ‘जलश्यां’नी सत्यशोधक व आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान दिले. इंग्रजी सत्तेच्या विरोधात सामान्य जनतेला जागृत करण्यासाठी ‘सार्वजनिक सभा’तून ‘भाषण’हा मार्ग स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांनी अवलंबला. यासर्वांचा उद्देश समाजाला जागृत व संघटीत करणे हाच होता. अगदी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ही अशा ’वाक्य’कौशल्ये असणार्‍या समाजधुरीणांमुळेच यशस्वी झाली. परंतु पुढे ही समाज प्रबोधनाची प्रभावी ‘माध्यमं’ फक्त ’पैसा’ कमविण्याची ‘साधनं’ होतील.असा विचार या परंपरेतल्या पूर्वसुरींच्या मनात कधीही आला नसेल, परंतु दुर्दैवाने हे आजचे ‘वर्तमान’आहे.

स्वातंत्र्यानंतर समाज शिकला, प्रगती झाली. प्रबोधन युगाने दिलेल्या वैचारिक परंपरा पोटात घेऊन नव्या काळावर इथली माणसं स्वार झाली. खरं तर समाजाच्या उत्थानासाठी अहोरात्र संघर्षाचे अग्निदिव्य पेलून पहिली धेय्यवादी व तत्वनिष्ठ पिढी झिजली. खादीचा अंगरखा आणि खांद्यावरची शबनम इतकीच संपत्ती बाळगून हजारो किमीचे पदभ्रमण करुन समाज ‘जागृती’करण्याचे ‘व्रत’ घेतलेली मंडळी या भूमीवर होऊन गेली. असे पुढच्या पिढीला सांगितले तर कदाचित यावर उद्या कुणाचा विश्वास बसणार नाही. कारण काळ फार बदलला, तशी माणसं बदलली.’तत्वनिष्ठा’वगैरे शब्द ’पोथीनिष्ठ’झाले. डोक्यात विचारांपेक्षा ’व्यवहार’अधिक शिरला आणि माणसांचे वर्तन ’धेय्यवादा’कडून ’अर्थवादा’कडे वळले. याला आज तथाकथित ’प्रबोधन’(?)कर्ती जमात ही अपवाद नाही.( अर्थात काही अपवाद आहेत त्यांना मानाचा मुजरा) तर गोष्ट अशी आहे की सध्या ’व्याख्यानां’चा हंगाम सुरू आहे.

शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांनी सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्ताने व्याख्यानांसह विविध उपक्रमांचे आयोजन करावे हा दूरदृष्टीचा व उदात्त निर्णय सरकारने काही वर्षांपूर्वी घेतल्यानंतर तो खर्‍या अर्थाने पथ्यावर पडला वक्तृत्वासह मार्केटिंग कला अंगी असणार्‍या लोकांच्या. यांनी काळाची पाऊले ओळखून ’दुकानदारी’थाटली. या दुकानात छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सावरकर, विवेकानंदासह सर्व संत(जातीसह)ते नव्या फर्मानानुसार पंडित दिन दयाल यांच्यापर्यंत सर्व विषय एका छताखाली ’विकली’ जातात. अशी सर्वसमावेशक(?)व्याख्याने देणारी नवी जमात समाजात मोठ्या प्रमाणात उदयास आली.’विषय’ त्यांना कोणताच वर्ज्य नाही. फक्त बाकी व्यवस्था उत्तम पाहिजे. यात काही तर पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत चार दोन विषयाची ’कोंडी’ फोडता न आलेले सुद्धा अर्ध्या पदवीवरच नावापुढे प्राध्यापक, अभ्यासक,व् याख्याते अशी विशेषणे लावून हा बिनभांडवली व्यवसाय करतात. तर काहींनी स्वतःला स्वजातीच्या महापुरुषांपुरते लिमिटेड करुन घेतले. महाराष्ट्रात रुजू लागलेली प्रबोधनाची ही नवी परंपरा विचार करायला लावणारी आहे. अगदी या सर्वच महापुरुषांच्या अनुयायांच्या बाबतीत सत्य असले तरी अगदी उदाहरणादाखल ’शिवजयंती’च्या निमित्ताने याचा विचार करुयात.

- Advertisement -

आताच्या काळात शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राभर सर्वत्र व्याख्यानांचे आयोजन केले जातात. हे चित्र तसे खूप प्रेरक, आशादायी व सकारात्मक. त्याचे श्रेय अर्थात मराठा सेवा संघाला जाते. सेवा संघ प्रणित विविध संघटनांनी गावोगावी या प्रकारे उत्साहात ’शिवजयंती’साजरी करुन शिव’जागरा’चे नवे पर्व सुरू केले. म्हणून आता सार्वजनिक शिवजयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. खरं तर प्रबोधनाचा वारसा समाजात रुजविण्यासाठी आपली पूर्ण हयात खर्च केलेले समाजसुधारणांचे अग्रणी महात्मा जोतिराव फुलेंनी पहिल्यांदा सार्वजनिक पातळीवर ’शिवजयंती’ साजरी केली. बहुजन समाजाने कोणत्या दिशेने जावे हे सूचित केले. तरीही पुढे अनेक वर्ष गावोगावी फक्त सार्वत्रिक ’गणेशोत्सव’असायाचा. आता मात्र त्यापेक्षाही शिवजयंती सार्वजनिक पातळीवर खेड्यात मोठ्या प्रमाणात साजरी होवू लागली याचे श्रेय या संघटनांना द्यावेच लागते. अगोदर धर्मांध व जातीवाद्यांनी शिवाजी राजेंची ’हिंदुत्ववादी’ही प्रतिमा बनवून आपली पोळी भाजली. अजून ही छत्रपतींचा आशीर्वाद.. देऊ साथ वगैरे चालूच असते. शिवाजी राजेंचे सर्वसमावेशक कार्य व वरील प्रकार जनतेच्या लक्षात आणून देण्याचे प्रयत्न नंतर या संघटनांच्या काही अभ्यासक, संशोधकांसह इतरही इतिहास संशोधक,अभ्यासकांनी केले. अजूनही करीत आहेत.

कॉ. गोविंद पानसरेंनी तर’खरा शिवाजी कोण होता?’ या छोट्या ग्रंथातून व सातत्याने व्याख्यानातून क्रांतिकारी भूमिका मांडली. मात्र यांच्या सारख्या विद्वान अभ्यासकांची आजमितीला संख्या किती आहे? हा खरा प्रश्न आहे. या उलट महाराजांचे चरित्र व कार्य ऐतिहासिक प्रसंगातून रंगवून ’रंजन’करणारे गल्लाभरू व्याख्यानकर्ते अधिकच.अगदी त्यांनी मन मानेल असा स्वतःचा ’भाव’ठरवून हा उद्योग फक्त ’खिसे’ भरण्यासाठीच सुरु केला असे दिसते. महाराजांच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगांच्या कथन, सादरीकरणातून प्रचंड ’माया’ जमवता येते हे काहींना चांगलेच उमगले.

- Advertisement -

खरं तर आजच्या वर्तमानात शिवचरित्र, महाराजांचा समतामूलक दृष्टिकोन समाजात रुजविणे नितांत गरजेचे आहे. ते कार्य चालूच रहावे. परंतु नावापुढे प्राध्यापक, इतिहास संशोधक वगैरे लावले, अंगात ’जॉकेट’ घालून चार दोन माईक पुढील फोटो एडीट करुन समाजमाध्यमातून पोस्ट केले की व्याख्यानांचा’गळीत’ हंगाम सुरु झाला. समाज माध्यमातील हे तंत्र अलिकडे चांगलेच जोरात आहे. त्यात ही गैर तरी काय? माझा आक्षेप इथे ही नाही. तर याचा कळस असा की हे लोक नावापुढे शिवचरित्रकार, शिवचरित्राचे अभ्यासक, इतिहासकार वगैरे शेलकी विशेषणं लावतात. हे भयंकर. (एका अभ्यासक? वक्त्याला महाराजांचे चरित्रासंबधीचे काही मूळ ग्रंथ विचारले. तर तेही सांगता आले नाहीत) म्हणून बाबांनो एखादे शिवचरित्रावरचे बाजारू पुस्तक वाचून चाळीस मिनिटांची संहिता तयार करणे व बोलणे सोपे परंतु अभ्यासक, इतिहासकार असणे वेगळे हे लक्षात घ्या.

प्राच्यविद्या पंडित असणारी माणसं आपल्याकडे झाली परंतु त्यांनी कधी नावापुढे ही शेलकी विशेषणं लावली नाहीत. तर ते उभी हयात स्वतःला विद्यार्थी समजत राहिले. इतके जरी उमजले तरी आपल्याला जमिनीवर यायला मदत होईल. नाही तर नाटकात शिवाजीराजेंची भूमिका केली म्हणून स्वतःला ’शिवाजी राजे’ समजणे हे जसे आहे, त्यातला हा प्रकार आहे.’हिरोडोटस’ सुद्धा स्वतःला इतिहासाचा विद्यार्थी समजत असेल तर आपण कोण? तेव्हा आपण तथाकथित इतिहासकारांनी(?) याचा गंभीर विचार करावा. इतिहासाकडे गंभीरपणे पहा. फार तर स्वतःला वक्ता म्हणा. इतिहासकार वगैरे होण्याचे प्रयत्न जरुर करा. इतिहासातील ’बाप’लोकांचे चार दोन ग्रंथ वाचनाची सवय लावा. महापुरुषांचे गुण कृतीत उतरवा. व्याख्यान आटोपल्यानंतरच्या ’उत्तर क्रिया’बंद करा आणि खुशाल महापुरुषांचे विचार घरोघर पोहचविण्याचे कार्य अहोरात्र करा तुम्हां सर्वाना शुभेच्छा!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -