घरफिचर्सइतिहासाचार्य वि. का. राजवाडे

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे

Subscribe

वि. का. राजवाडे यांचा आज स्मृतिदिन. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचा जन्म 24 जून 1863 रोजी वरसई येथे झाला! त्यांच्या वडिलांचा मृत्यू ते तीन वर्षांचे असताना झाला. म्हणून त्यांची आई मोठा भाऊ वैजनाथ व विश्वनाथ यांना घेऊन परत वरसईस त्यांच्या वडिलांच्या घरी गेली. त्या दोन्ही भावांचे शिक्षण मात्र पुण्यासच झाले. विश्वनाथ यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शनिवार पेठेतील तीन नंबरच्या शाळेत झाले. त्यांनी दुय्यम शिक्षणासाठी बाबा गोखले यांच्या शाळेत प्रवेश घेतला. ते नंतर काही काळ वामनराव भावे व काशीनाथपंत नातू यांच्या शाळेत होते. त्यांनी त्यांचे दुय्यम शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, मिशन स्कूल असे करत संपवले. राजवाडे 1882 साली प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले.

त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजात नाव दाखल केले; पण ते घरच्या गरिबीमुळे जेमतेम एक सहामाही कॉलेजमध्ये जाऊ शकले. त्यांनी त्यानंतर द्रव्यार्जनाचे साधन म्हणून पुण्यास पब्लिक सर्व्हिस सेकंडग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग सुरू केला. त्यात थोडी प्राप्ती झाल्यावर, त्यांनी त्यांचे नाव पुन्हा डेक्कन कॉलेजमध्ये घातले. त्यांचे मोठे बंधू वैजनाथ यांनाही तेथे फेलोशिप मिळाली होती.

- Advertisement -

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे हे विद्वान होते. त्यांनी इतिहास, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा बहुविध विषयांसंबंधी संशोधन व लेखन केले. तसेच, त्यांनी त्यांचे लेखन आग्रहाने मराठीतून केले. त्यांनी भारत इतिहास-संशोधक मंडळाची स्थापना 7 जुलै 1910 रोजी केली; त्यांनी ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या ग्रंथमालेचे संपादन केले. ते ऐतिहासिक साधनांच्या आणि प्राचीन साहित्याच्या शोधात सतत हिंडत असत. ते दर्‍याखोर्‍यांतून प्राचीन अवशेष पाहत व कानाकोपर्‍यांतून जुनी दप्तरे गोळा करत फिरत असत. त्यांचे लेखनकार्यही अव्याहतपणे चालू असे.

राजवाडे यांनी स्वतः ‘भाषांतर’ हे नियतकालिक 1894 पासून चालू केले. त्यांनी त्याखेरीज कोल्हापूर येथील ‘समर्थ’; तसेच, ‘ग्रंथमाला’, ‘विश्ववृत्त’, ‘सरस्वती मंदिर’, ‘प्राचीप्रभा’ इत्यादी नियतकालिकांतून भरपूर लेखन केले. त्यांनी अत्यंत गरिबीत दिवस काढले. त्यांचे निष्कांचन असेच वर्णन केले जाई. मात्र तशाही परिस्थितीत ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ ह्या शीर्षकाने अस्सल मराठी साधनांचे बावीस खंड (1898 -1917) संपादून प्रसिद्ध केले.

- Advertisement -

राजवाडे यांच्या कामगिरीचा भाग निव्वळ इतिहासविषयक नसून त्यांनी बजावलेल्या मराठी भाषाशास्त्रातील कामगिरीचाही आहे. ‘राजवाडे धातुकोश’ व ‘राजवाडे नामादिशब्दव्युत्पत्ती कोष’ हे दोन ग्रंथ उल्लेखता येतील, ते त्यांच्या सूक्ष्म व मूलगामी बुद्धिमत्तेचे निदर्शक आहेत. त्याचप्रमाणे ‘सुबन्त विचार’ व ‘तिड्कत विचार’ या दामले यांच्या व्याकरणावरील टीका-लेख व ‘संस्कृत भाषेचा उलगडा’ हा स्वतंत्र ग्रंथ त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीचे निदर्शक ठरतात. त्यांनी त्या ग्रंथांत व्युत्पत्तींतून मानवाच्या इतिहासाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. राजवाडे यांनी महानुभव ग्रंथांच्या सांकेतिक भाषेचा केलेला उलगडा ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. त्या उलगड्याने भाषाभ्यासाचे नवे दालन खुले झाले. त्यांनी विविध विषयांवर निरनिराळ्या मासिकांतून जे लेख व निबंध वेळोवेळी प्रकाशित केले, त्यांची संख्याही फार मोठी आहे. त्यांच्या सर्वस्पर्शी प्रतिभेने अनेक विषयांवर काही नवीन विचार व सिद्धांत मांडले आहेत. राजवाडे यांनी विचार, मनन, चिंतन यांना शब्दरूप देऊन ते लेखांच्या, ग्रंथांच्या रूपाने वारंवार प्रसिद्ध करण्याची तत्परता दाखवली. राजवाडे यांचे धुळे शहरात 31 डिसेंबर 1926 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -