घरफिचर्सगांधी, आंबेडकरांचे करायचे काय?

गांधी, आंबेडकरांचे करायचे काय?

Subscribe

‘अगं, बाई त्या मुलीला रागावल्या ना, मग तू का चिडलीस? ती मुलगी ठरवेल काय करायचे ते’, माझ्या मुलीला मी मध्यमवर्गीय सल्ला दिला. त्यावर माझी मुलगी म्हणाली, ‘आई, गांधी, आंबेडकर काय फक्त जयंती पुरते आहेत का? ते जगताना नाही का वापरायचे? ती मुलगी बोलू शकत नाही; पण आपण बोलू शकतो ना? आज तिला आधार दिला नाहीतर ती आयुष्यात कधीच उभी राहणार नाही. बाकीचे मला माहीत नाही. तू उद्या शाळेत येऊन बोल आमच्या बाईंशी.’

‘हॅल्लो, अनिताताई, जेवत असाल तर हात धुवायला आमच्याकडे या.’ मोबाइल कानाला लावल्या लावल्या मी हॅलो म्हणायच्या आत समोरून आलेले हे पहिले वाक्य. माझी तर व्यवस्थित झोप उडाली. ‘अहो पण, असं झालं तरी काय?’ या पोराने लई तरास दिलाय, आमचं तर अजिबात ऐकत नाही, तुमचंच ऐकेल तो, लवकर घरी या. निरोप लागल्याच्या नंतर काहीच वेळात मी त्या घरी पोहोचले. घरात स्मशानशांतता. ज्या आईने मला फोन केला होता तिनेच दार उघडलं होतं. डोळे सुजलेले होते. भरपूरच रडलेली होती. सगळेजण मला पाहिल्या नंतर जरा हालले. केव्हाचे एकाच जागेवर बसून असावे. जरा जागा बदलल्या. काय झालं? असं मी म्हणायचा उशीर तर तक्रारींची कॅसेटच सुरू झाली.

कथा अशी होती की, तेवीस चोवीस वर्षांचा तरुण मुलगा आईला आत्महत्या करण्याची धमकी देत होता. उशिरापर्यंत घराबाहेर राहतो विचारलं की चिडतो. घरात पाहुणे आले की त्यांच्याशी चांगलं बोलत नाही. त्यांनी काहीही विचारलं तरी तिरकी उत्तरं देतो. बर्‍याच वेळा जेवायला घरी नसतो. घरात येतो तेव्हाही सारखा मोबाईलमध्ये डोकं टाकून बसलेला असतो. काल सणाला घरी मावशी, काका, आत्या आल्या होत्या म्हणून जरा त्याच्याशी सर्वांनी मिळून बोलायचा प्रयत्न केला तर म्हणतो की, असंच वातावरण राहीलं तर मी आत्महत्याच करीन. ताई, खरं सांगा याला काहीच विचारायचे नाही का हो? त्या आईचा साधा प्रश्न. बाहेर असे दिवस बिघडले आहेत. रोज नको ते सगळं ऐकायला मिळतं म्हणून आपण काळजीने विचारायला गेलं की अंगावरच येतो. काय करावं तेच समजत नाही म्हणून तुम्हाला बोलावलं. तुम्हालाच यांची भाषा कळते. आमचं तर सर्वांचं डोकं पार बंद केलंय त्याने.

- Advertisement -

हा संवाद साधारण बर्‍याच घरातून सुरू होता, आहे आणि पुढेही राहील असं आता तरी दिसतंय, वाटतंय. पूर्वी जरा याचे प्रमाण कमी असेल; पण सध्या फारच प्रमाण वाढले आहे. ज्याच्याबद्दल तक्रारी होत्या त्याला बाजूला घेऊन जवळच्याच एका गार्डनमध्ये आम्ही बसलो आणि त्याच्याशी बोलत होते. थोड्या वेळाने एक एक करीत त्याचे मित्र-मैत्रिणीही जमा होऊ लागल्या आणि आमची मैफिल चांगलीच रमली. मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकलो, तिथे मला चांगलं शिकवणारे भेटले नाही, माझं इंग्रजी कच्चंच राहील, गणिताची मला भीती वाटते. नोकरीला गेलं आणि वस्तीचा पत्ता सांगितला की नंतर सांगतो म्हणतात. आम्ही जायचं कुठं? नोकरीला लागणार कधी? कधी आमचं घर होईल? आम्हाला वस्तीतून बाहेर पडायचं आहे, आमच्यावरच्या घाणेरड्या नजरा आम्हाला हटवायच्या आहेत; पण करणार कसं? कोण आम्हाला मदत करेल? त्यासाठी आधी आम्हाला ऐकून तर घ्या. वस्त्यांमध्ये जन्मलेली ही मुलं जे काही बोलत होती ते आपण रोज बघतो, अनुभवतो. पाहून त्रासही होतो; पण समजत नाही काय करावं ते. हे प्रश्न फक्त या मुलांचेच आहेत असं नाही. हे प्रश्न वस्तीत, ग्रामीण भागात जन्मलेल्या, ज्यांचे आई किंवा वडील किंवा दोघेही त्यांच्या लहानपणीच वारले किंवा जात, धर्म, समूह, विभाग, आर्थिक स्तर अशा कुठल्याही अर्थाने गरिबीत जन्माला आलेल्या प्रत्येक मुलांचे आहेत.

वस्त्यांमध्ये जन्माला आलेली ही मुलं वस्तीच्या जवळच असलेल्या सर्वार्थाने गरीब असलेल्या नगर पालिका, महानगरपालिका, आश्रमशाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी जातात. या सर्व ठिकाणी आजकाल कायमच शिक्षकांचा तिथल्या साधनसामुग्रीचा तुटवडा असतो. तुटवडा इतका की जणू काही या शाळा ‘इंडिया’ मध्ये नाहीतच आणि इथे शिकणारी मुलंही भारतीय नाहीतच. एक एक शिक्षक किंवा शिक्षिका दोन दोन तीन तीन वर्ग सांभाळतात. वर्गात चाळीस नाहीतर पन्नास मुलं आणि एकच बाई नाहीतर सर. कसे काय यांचे शिक्षण ‘आनंददायी’ होईल? शाळा नाही कोंडवाडे बनतात ते. एकदा का मुलं शाळेत आली की कोंडून ठेवायची शाळा सुटेपर्यंत. वर्गातल्या एखाद्या बोलक्या मुलीला किंवा मुलाला पाढे म्हणायला सांगायचे आणि वर्गातल्या सर्व मुलांनी त्याच्या किंवा तिच्या मागे म्हणावे अशी अपेक्षा. एकीकडे बाल मानसशास्त्र सांगतं की, पहिल्या पाच वर्षातच मुलांच्या मेंदूचा साठ टक्क्यांपेक्षा जास्त विकास होतो. त्याच काळात ते सर्व नवीन नवीन शिकतात आणि आमच्या गरीब भारतातली मुलं त्याच काळात कोंडून ठेवली जातात. त्यांच्या निर्मितीच्या सर्व शक्यता मारल्या जातात. मग ही मुलं तासन्तास चौकात, कट्ट्यावर मोबाइलमध्ये गेम खेळतात तेव्हा आम्हाला राग येतो की, आरे तुम्हाला सुचत का नाही? कसे सुचेल? मेंदूला सुचता येते, सुचवता येते असा शोध ज्या काळात लागणार होता त्या काळात ती संधी दिली नाही आणि आता अपेक्षा करता?

- Advertisement -

मी, माझं घर, माझी नोकरी या पलीकडे न पाहणारे लोक जेव्हा निर्णय प्रक्रियेत येतात तेव्हा त्यांना अशा वस्त्या पाहून, अशी रिकामी टोळकीच्या टोळकी पाहून राग येतो. ही मुलं आळशी आहेत असे शिक्के मारून ते निघून जातात. आणि मग हीच टाळकी कुठल्यातरी दादाच्या, भाईच्या ताब्यात सापडतात आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक वर्षे अतृप्त राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही अगदी काहीही करायला तयार होतात. मग अशा मुलांना आपण त्या दादाच्या मिटींगला गेलो होतो, तिथे तासन्तास फक्त उभे होतो, त्याने खायला प्यायला दिले आणि त्याने सांगितलेले काम आपण केले हे सर्व घरात कसे सांगावे हेच कळत नाही. मग ही मुलं घराबाहेरच जास्तीत जास्त वेळ रहायला लागतात. घरात आली तरी ती मनाने बाहेरच असतात. कारण त्यांची गरज, त्यांची भाषा समजून घेणारे घरात कोणी नसते. घरातले मुद्दाम असं वागतात असं म्हणावं तर तेही खरं नाही. घरच्यांना तरी कुठे माहीत आहे की वेगवेगळ्या वयाच्या मुलांशी संवेदनशीलतेने कसे बोलावे, कसे वागावे. त्यांच्या लहानपणी, त्याच्या तारुण्यात त्यांच्याशीही कोणीच असं जवळ घेऊन त्यांना समजावून घेतलेले नसते. त्यामुळे समजावून घ्यायचे म्हणजे काय करायचे? याचा पाठच त्यांच्याकडे नसतो. अशी ही विषारी साखळी कोणी? कुठे? कशी? तोडावी हा खरा प्रश्न आहे.

सध्या गुन्हेगारीमध्ये वस्त्यांच्या मध्ये राहणार्‍या मुलांइतकेच मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांची संख्याही लक्षणीय आहे. इतके दिवस मध्यमवर्ग म्हणजे नेमस्त, शिस्त लावणारा, थोडासा भित्रा असा मानला जायचा. पण शेवटच्या दोन दशकात अचानक श्रीमंत झालेल्या मध्यमवर्गातील मुलांना त्यांच्यापेक्षा श्रीमंत घरातल्या मुलांशी बरोबरी करायची असते. सध्या तर घर, गाडी, मोबाईल घेणे एकदम सोपे झाले आहे. पैसा हेच ज्यांचे उत्पादन आहे त्यांना आपले हे प्रोडक्ट विकण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी आहे. मग एका ‘क्लिक’वर लोन मिळते. कोणालाही मोबाईल विकत मिळतो. कोणालाही गाडी घेता येते. ती वस्तू वापरायची ‘लायकी, अक्कल’ असण्याची पूर्वअट नाही. आपण मोठ्या कौतुकाने सांगतो की परदेशात त्यांच्या पंतप्रधानाला गाडी घ्यायची असेल तरी तिथल्या संबंधित विभागाकडे नाव नोंदवावे लागते. नंबर आला की मगच गाडी मिळते. आपल्याकडे लोक गाडी घेतात. हफ्ते भरायची वेळ आली की तोंड लपवत, खोटं बोलत फिरतात.

आपल्याकडे बुद्धिमत्ता असणार्‍या व्यक्तीपेक्षा ज्याच्याकडे भौतिक गोष्टी जास्त आहे त्याला मिरवण्याची पद्धत आहे. या सर्व प्रश्नांवर आत्महत्या करणे हा कुठल्याच अर्थाने उपाय नाही. किंवा आज प्रयोग केला तर उद्या परिणाम दिसेल असेही उत्तर माझ्याकडे किंवा कोणाकडे नाही. पण आज सुरुवात केली तर कालांतराने चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. त्यासाठी काही छोट्या गोष्टी करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ सर्वच प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी लागणार्‍या सर्व सोयीसुविधांना अग्रक्रम दिला पाहिजे. सर्वात पहिले म्हणजे सर्व अंगणवाड्यांमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करायला हव्यात. तिथे मिळणारा खाऊ, आहार यात भ्रष्टाचार होणार नाही, कोणाला तिथे खाऊची कमतरता पडणार नाही, योग्य व्यक्तीलाच खाऊ जाईल हे सर्वांनीच बघितले पाहिजे. शासकीय, निमशासकीय किंवा अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. ज्या ज्या शिक्षकांनी त्या नोकर्‍या स्वीकारल्या आहेत त्यांनी त्यांच्या शाळेच्या गावी जाऊन राहिले पाहिजे, शाळेत नियमित गेले पाहिजे. शिकवण्याचा आनंद स्वतःही घेतला पाहिजे आणि मुलांना समजावून घेत त्यांनाही दिला पाहिजे. आपणही पालक म्हणून शाळेमध्ये अधून मधून गेले पाहिजे. काही हवं नको त्याची चौकशी केली पाहिजे. आपण शाळेला काय देऊ शकतो याचा विचार करून त्याप्रमाणे सहभाग दिला पाहिजे. किमान प्राथमिक शिक्षण सर्वांना सारखे, एकाच स्तरावरचे दिले पाहिजे. आज काही मुलं अशा शाळेत आहेत की जिथे ‘माणूस’ पाच मिनिटेही उभा राहू शकणार नाही आणि काही अशा एअरकंडीशन वर्गात की आपण विचारही करू शकत नाही. कशी काय समानता येईल? कसा काय सर्व समाजात एकमेकांमध्ये बंधुभाव किंवा भगिनी भाव, मैत्री निर्माण होईल. शाळा चांगल्या नाही म्हणून खाजगी शाळेत मुलं घालण्याऐवजी शासकीय शाळा कशा बदलतील याचाच विचार करायला हवा. बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दी होते म्हणून पाठ दुखेपर्यंत मोटार सायकल चालवण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली, सक्षम कशी होईल याचाच विचार करायला हवा. दरवर्षी वाढणार्‍या गाड्यांना रस्ते तयार करण्यासाठी किती पूल बांधणार? जमीन वाढण्याची शक्यता नाही तेव्हा आपल्यालाच तिच्या वापराचा पुनर्विचार करायला हवा. पुलावर पूल बांधून आज प्रश्न सुटल्यासारखा वाटेल ही कदाचित, पण उद्यासाठी आपण शंभर प्रश्न निर्माण करून जाणार आहोत याचा विचार करणे गरजेचे आहे.

या मुलांच्या निमित्ताने कितीतरी प्रश्न आपल्याला जाब विचारायला लागले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुलांना समजावलं. कितीतरी वेळ मी फक्त ऐकत होते. कोणीतरी आपलं ऐकत आहे याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. नियमित भेटण्याचे एकमेकांना वचन देऊन आम्ही इच्छा नसतानाही आमची मैफिल सोडून आमच्या घरी पोहोचलो. घरी आले तर माझी मुलगी घरात रागावून बसली होती माझी वाट पहात. मला वाटलं मला घरी यायला उशीर झाला म्हणून तिला राग आला आहे; पण चौकशी केली तेव्हा समजले की ती तिच्या शिक्षिकेवर रागावली होती. कारण होतं की बाईंनी वर्गातल्या एका मुलीची वही तिने अभ्यास केला नाही म्हणून वर्गाच्या बाहेर भिरकावून त्या मुलीचा अपमान केला. त्या मुलीचे आईवडील दोन्ही वारलेले आहेत. ती तिच्या लांबच्या मामाकडे शिक्षणासाठी असते. तो मामा आणि मामीही गरीब आहेत, त्यामुळे ते हिला सर्व विषयांना स्वतंत्र वही देऊ शकत नाहीत. ही मुलगी त्या मामीबरोबर धुणंभांडी करते, त्यामुळे तिला रोजचा बाई जो होमवर्क देतात तो करून येणे शक्य नसते. मुलगी हुशार आहे; पण बाईनी सांगितले तरी तिने लिहिले नाही याचा बाईंना राग आला म्हणून त्या चिडल्या. बरं यावर माझ्या मुलीकडे उपाय काय होता तर मी शाळेत येऊन त्या बाईंशी बोलायला हवे होते का तर त्या बाई माझ्या ओळखीच्या होत्या. ‘अगं, त्या मुलीला रागावल्या ना, मग तू का चिडलीस? ती मुलगी ठरवेल काय करायचे ते’ माझा मध्यमवर्गीय सल्ला. आई, गांधी आंबेडकर काय फक्त जयंती पुरते आहेत का? ते जगताना नाही का वापरायचे? ती बोलू शकत नाही; पण आपण बोलू शकतो ना? आज तिला आधार दिला नाहीतर ती आयुष्यात कधीच उभी राहणार नाही. बाकीचे मला माहीत नाही. तू उद्या शाळेत येऊन बोल आमच्या बाईंशी.’
खरं आहे, गांधी आंबेडकर हे फक्त जयंती पुरते नाही. अर्थात हे मला फार आधीपासून पटलेले आहे. माझ्या मुलीने आज परत ते अधोरेखित केले आहे तेव्हा मला उद्या शाळेत गेलेच पाहिजे. दुसर्‍याला समजावून न घेता वागणार्‍या लोकांना वेळीच टोकलं पाहिजे ते आपले मित्र असले तरी आणि कोणीही नसले तरी. मी जाणार आहे त्या मुलीच्या वतीने बोलायला, तुम्ही…?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -