घरफिचर्सव्यवस्थेच्या ऑपरेशन टेबलवर...एक डॉक्टर की मौत

व्यवस्थेच्या ऑपरेशन टेबलवर…एक डॉक्टर की मौत

Subscribe

‘एक डॉक्टर की मौत’मधील डॉ. दिपंकरवर विश्वास ठेवायला तयार नसणारा समुदाय त्याच्या संशोधनाची भेसूर खिल्ली उडवतो. ज्यावेळी गॅलिलिओनं जगाला पृथ्वी गोल असल्याचं ओरडून सांगितलं, त्यावेळी त्याची उडवलेली रेवडी आणि डॉ. दिपंकरची उडवलेली खिल्ली यात एकसारखा दुवा आहे. समाज बदलत नसतो. प्रत्येक काळात नाविन्याला नकार देणारा आणि पुरातनालाच भविष्य मानणारा समुदाय कायम असतो. अशाच समुदायाकडून डॉ. दाभोलकर यांच्यासारख्यांची हत्या केली जात असते.

लालफितशाहीच्या कारभारात चांगली उद्दीष्ट मारली जाण्याचा अनुभव अनेकदा येतो. सरकारी यंत्रणा चिखलात रुतून बसलेल्या मगरीसारखी ढिम्म असते. कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानणा-या यंत्रणेकडून एका मानवतावादी उद्दिष्टांनाही नाकारले जाते. पूर्वग्रहदूषित धारणांमुळे चिकीत्सा, संशोधक वृत्ती आणि नाविन्याचा शोध घेण्यामुळे जगाला होणा-या उद्दात हिताचा विचार राज्यव्यवस्थेपुढे कुचकामी ठरतो. त्यातून असा विचार घेऊन आनंदी जगाचं स्वप्न पाहणारे लेखक, विचारवंताचा बळी जातो. कधी हा बळी शारीरिक पातळीवर प्रत्यक्ष असतो. तर कधी तो प्रतिकात्मक किंवा मानसिक पातळीवरही घेतला जातो. शारीरिक पातळीवरील देहाचा बळी दिल्यावर असा समाजोपयोगी प्रयत्न त्या देहासोबतच भौतिक अर्थाने संपून जातो. सॉक्रेटीस, गॅलिलिओ ही काही त्यातली उदाहरणं. मात्र वैचारिक पातळीवर हा बळी त्यापेक्षा जास्त त्रासदायक ठरतो.

तपन सिन्हासारख्या संवेदनशील पटकथाकार, दिग्दर्शक आणि रामपदा चौधरींच्या कथेत जगहिताचा मानवी कल्याणाचा विचार घेऊन त्या कामी स्वतःचं संपूर्ण जगणं पणाला लावलेल्या एका डॉक्टर अशा संवेदनाहिन, व्यवहारी व्यवस्थेकडून मानसिकरित्या कसा मारला जातो. हे एक डॉक्टर की मौत या चित्रपटपटाच्या पडद्यावर समोर येतं. एनएफडीसीची निर्मिती असलेला ‘एक डॉक्टर की मौत’ १९९० मध्ये ज्यावेळी रिलिज झाला त्यावेळी वैद्यकशास्त्रासमोर अनेक आव्हानं होती. तशी ती आजही आहेत. पण माहिती तंत्रज्ञानाचं अवकाश आजच्याइतकं त्यावेळी खुलं झालं नव्हतं. त्यामुळे कुठल्याही अभ्यास संदर्भासाठी पुस्तकं आणि अनुभवजन्य माहितीच आधार होती. वैद्यकशास्त्र किंवा विज्ञानातील परिस्थिती आणखी कठीण होती. तपासणी, चाचणी, निष्कर्षासाठी केवळ प्रयोग आणि चिकित्सा हीच साधनं होती. या काळातला तत्कालीन संदर्भ असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले.

- Advertisement -

कुष्ठरोगावर लस शोधण्याचा प्रयत्न करणा-या डॉ. दिपंकर रॉय (पंकज कपूर) या एमबीबीएस डॉक्टरने या संशोधनात निर्नायक टप्पा गाठला आहे. मात्र संशोधनात आणखी काही त्रुटी आणि शक्यता आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी आणि संशोधन पुढे चालू ठेवण्यासाठी त्याला यांत्रिक साधनांची गरज आहे. पण सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करणा-या या डॉक्टरच्या प्रयोगशाळेत टेस्ट ट्यूबपासून मायक्रोस्कोपपर्यंतसाठी आलेल्या खर्चात त्याच्या बायकोचे सीमाचे ( शबाना आझमी) दागिनेही विकले गेले आहेत. पण ती खंबीर आहे. संपूर्ण जगणं हॉस्पिटल आणि घरातल्या किचनजवळच्या प्रयोगशाळेला दिल्यामुळे दिपंकरविषयी सीमाला एका प्रकारचा संसारिक राग आहे. पण त्यात द्वेषाचा लवलेशही नाही. पैसे नसल्याने घरातल्या एका कोप-यालाच प्रयोगशाळा बनवलेला दिपंकर स्पिरीट दिव्यातलं इंधन संपल्यावर सीमानं गॅसवरंच ठेवलेला जेवणाचा टोप बाजूला काढून आपलं परीक्षानळीतलं रसायन तापवतो. पैसे खर्च होऊ नयेत म्हणून हॉस्पिटलपर्यंत बसने किंवा कधी पायी जातो. रात्री जागून पहाटेपर्यंत आपलं संशोधन आणि प्रयोग सुरू ठेवतो. एका रात्री त्याला त्याचं उद्दिष्ट गवसतं…हा हर्षवायूचा युरेका असतो. कुष्ठरोगाला प्रतिबंध करणार्‍या लसीचं रासायनिक समीकरण त्याला गवसलेलं असतं. पण प्रश्न असतो त्याच्या अधिकृततेचा, त्यासाठी त्याला आणखी काही चाचण्या करणं गरजेचं असतं…पण समस्या तीच असते..आर्थिक आणि वेळेच्या गरजेची.

संशोधनात आवश्यक असलेली काही रसायनं केवळ सरकारी हॉस्पिटलच्या फ्रीझरमध्ये ठेवली या कारणावरून त्याला कारवाईची भीती दाखवली जाते. ही सुरुवात असते, लालफितशाहीकडून त्याच्यातल्या संशोधक डॉक्टरला मारण्याच्या तयारीची..ही तयारी हळूहळू वाढत जाते. त्यातून होणारी घुसमट पंकजने देहबोली आणि डोळ्यातून अचूक उभी केली आहे. व्यवस्थेकडून हळूहळू जिवंतपणी मरण्याची ही वेदना त्याच्या खंगणा-या मनाला संपवत जाते. व्यवस्थेचा हा अजगर दिपंकरच्या नावाआधी असलेल्या डॉक्टरला जिवंतपणी गिळून टाकतो. या अभ्यासात मायक्रोबायोलॉजीतील काही नवी सूत्र त्याच्या हाती लागतात. त्यामुळे गायनॅकॉलॉजीमधील वंध्यत्वावर मात करण्याचा मार्गही खुला होऊ शकतो. मात्र लेप्रसीवर औषध शोधणारा डॉ. दिपंकर ही सुवार्ता जगाला ओरडून सांगतो, तेव्हा त्याच्या हेतूवरच संशय न घेतल्याचा अविर्भाव करणारी वैद्यकीय आणि संशोधन मंडळाची व्यवस्था त्याच्या कथित दुष्परिणामांची चर्चा करते आणि त्याचं संशोधन नाकारते. वंध्यत्वारील सकारात्मक परिणामांचा विचार न करता, केवळ संशयाच्या बळावर दिपंकरचं संशोधन केवळ नाकारलं जात नाही तर त्याला रोखण्यासाठीही सरकारी यंत्रणा काम करू लागते. या यंत्रणेत बसलेली मंडळी डॉ. दिपंकरसारखा साधा एमबीबीएस असं काही संशोधन करू शकतो, कुठल्याही यंत्रणेच्या मदतीशिवाय यावर आपला साळसूद विश्वास ठेवायला तयार नसतात. हे आपण करू शकलो नाही, संपूर्ण यंत्रणा हाताशी असूनही ते एका साध्या डॉक्टरला कसं शक्य होईल. हा अहंकार लेप्रसीमुक्तीच्या डॉ. दिपंकरच्या स्वप्नांला आडकाठी बनतो. यातून या दिपंकरमधील डॉक्टरला मारण्याचे जे प्रयत्न होतात, ते प्रयत्न एक डॉक्टर की मौतचं कथानक…

- Advertisement -

व्यवस्था परिणामांचा विचार करत नसते, तिथं नियम आणि कायदे महत्वाचे असतात. हे कायदे दाखवूनच अनेकदा सृजनाची, नवनिर्मितीची हत्या केली जाते. डॉ. दिपंकरवर विश्वास ठेवायला तयार नसणारा समुदाय त्याच्या संशोधनाची भेसूर खिल्ली उडवतो. ज्यावेळी गॅलिलिओनं जगाला पृथ्वी गोल असल्याचं ओरडून सांगितलं त्यावेळी त्याची उडवलेली रेवडी आणि डॉ. दिपंकरची उडवलेली खिल्ली यात एक सारखा दुवा आहे. समाज बदलत नसतो. प्रत्येक काळात नाविन्याला नकार देणारा आणि पुरातनालाच भविष्य मानणारा समुदाय कायम असतो. अशाच समुदायाकडून डॉ. दाभोलकर यांच्यासारख्यांची हत्या केली जाते.

पण इथं हा समुदाय थेट जुन्या मतवादाचा आधार घेत नसतो. नाविन्याचा स्वीकार करतानाच नाविन्याला संपवण्याची ही तयारी जास्त धोकादायक असते. वैद्यकीय क्षेत्रातील सेवेचा केवळ आपल्या सुखनैव जीवनाचा आधार बनवून प्रत्येक सिरिंजमधून रुग्णाच्या रक्तासोबत त्याची आर्थिक कुवतही खेचणा-या रक्तपिपासू बनलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील काही काळ्या घटकांवरही एक डॉक्टरकी मौत मधून प्रकाश टाकला जातो. डॉ. दिपंकरच्या मानवोपयोगी उद्दिष्टांसमोरील अडथळे आणि केवळ व्यावसायिक दृष्टीकोन ठेवणा-या वैद्यकीय संशोधनाच्या सुंदर वृक्षावर पोसली गेलेली बांडगुळे यातील फरक पडद्यावर कायम गडद होत जातो.

डॉक्टरही माणूस असतो यात दुमत नसतं. पण माणूस म्हणून पेशंटच्या झडलेल्या, तुटलेल्या आजारी देहातील वेदना समजण्याची संवेदना डॉक्टरच्या देहापर्यंत पोहचणं अनेकदा दुर्मिळ असतं. या दुर्मिळ होणा-या डॉक्टर समाज, समुदाय आणि व्यवस्थेकडून केली जाणारी हत्या अनेक रुग्णांच्या हत्येला पर्यायाने कारण ठरते. या डॉक्टरमधल्या माणसाला वाचवायला हवं…इथं एक डॉक्टर नाही तर माणुसकी मारली जाते. त्यामुळे एक डॉक्टरकी मौत ही त्या डॉक्टरपुरतीच मर्यादित राहत नाही. यात आपण सगळेच थोडे थोडे मारले जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -