DC vs CSK: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीची चेन्नईवर मात; अक्षरने दिल्लीला ‘शिखर’वर पोहोचवले

पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला आज चेन्नईकडून कडवी झुंज देण्यात आली, मात्र ५ विकेट राखून दिल्लीने विजय मिळवला. अखेरच्या षटकात दिल्लीला १७ धावांची गरज होती. चेन्नईचा ब्रावो दुखापतग्रस्त झाल्याने धोनीला नाईलाजाने चेंडू रवींद्र जडेजाच्या हातात द्यावा लागला. पहिल्या चेंडूवर शिखर धवनने एक धाव काढली आणि स्ट्राईकवर नवखा अक्षर पटेल गेला. ५ चेंडूत १५ धावा होत नाही, असाच अंदाज बांधण्यात आला. मात्र अक्षरने तीन कडकडीत षटकार ठोकत दिल्लीला ७ वा विजय मिळवून दिला. १४ पॉईंट्स घेत आता दिल्लीने क्रमवारीत अग्रस्थान पटकावले आहे.

१८० धावांचा पाठलाग करत असताना दिल्लीची सुरुवातच अडखळत झाली होती. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणेला दिपक चहरने स्वस्तात आणि लवकर माघारी धाडल्यानंतर शिखर धवनने कर्णधार श्रेयस अय्यरसोबत चांगली भागिदारी रचली. शिखरने आयपीएलमधील पहिले शतक आज ठोकले.

चेन्नई सुपर किंग्जने ९ सामन्यांमध्ये केवळ तीन सामने जिंकले असून पॉईंट्स टेबलमध्ये ते सहाव्या स्थानी आहेत. आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा संघ जवळपास सर्वच हंगामात प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. मात्र या हंगामात चेन्नईचा संघ अनेक अडचणींचा सामना करत आहे. आजचा सामन्यात पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर चेन्नईचा पुढचा प्रवास आणखी खडतर असणार आहे.

शारजा येथे होत असलेल्या आजच्या ३४ व्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा सलामीवीर सॅम करन खातेही न उघडता माघारी परतला. त्याला मुंबईकर तुषार देशपांडेने बाद केले. यानंतर मात्र फॅफ डू प्लेसिस आणि शेन वॉटसन या अनुभवी खेळाडूंनी चेन्नईच्या डावाला आकार दिला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. अखेर वॉटसनला (३६) एन्रिच नॉर्खियाने बाद करत ही जोडी फोडली. डू प्लेसिसने मात्र चांगली फलंदाजी सुरु ठेवत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. धोनीला (३) फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. यानंतर मात्र रायडू (२५ चेंडूत नाबाद ४५) आणि जाडेजा (१३ चेंडूत नाबाद ३३) यांनी फटकेबाजी केल्यामुळे चेन्नईने २० षटकांत ४ बाद १७९ अशी धावसंख्या केली. दिल्लीकडून नॉर्खियाने २ विकेट घेतल्या.