अष्टपैलूंची वानवा!

भारताने आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९३२ साली खेळला. त्यानंतर थेट १९७८ मध्ये कपिल देव यांच्या रूपात खऱ्या अर्थाने 'वर्ल्ड क्लास' म्हणता येईल असा अष्टपैलू भारताला लाभला. मधला काही काळ इरफान पठाणने चांगली कामगिरी केली. परंतु, त्याला बरेचदा दुखापतींनी सतावले. आता हार्दिक पांड्याचीही इरफानसारखी अवस्था झाली आहे. मागील वर्षी हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर पाठीवर ताण पडत असल्याने तो गोलंदाजीच्या शैलीत बदल करत असून इतक्यातच गोलंदाजी करण्यास नकार देत आहे.  

hardik, irfan pathan, vijay shankar, kapil dev
हार्दिक पांड्या, इरफान पठाण, विजय शंकर आणि कपिल देव

भारतीय क्रिकेटला महान फलंदाज आणि फिरकीपटूंचा वारसा आहे. भारताला सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग यांसारखे उत्कृष्ट फलंदाज लाभले. त्याचप्रमाणे प्रसन्ना, बेदी, चंद्रशेखर यांच्यासह अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारखे फिरकीपटूही भारताकडून खेळले. आता भारतात हळूहळू उत्तम वेगवान गोलंदाजही घडत आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार ही भारताची सध्याची तेज गोलंदाजांची फळी जगात सर्वोत्तम मानली जाते. मात्र, भारतात अजूनही सातत्याने चांगले अष्टपैलू पुढे येताना दिसत नाहीत.

भारतीय क्रिकेटला मोठा इतिहास आहे. भारताने आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना १९३२ साली खेळला. त्यानंतर थेट १९७८ मध्ये म्हणजेच तब्बल ४५ वर्षांनी खऱ्या अर्थाने ‘वर्ल्ड क्लास’ म्हणता येईल असा अष्टपैलू भारताला लाभला. हा अष्टपैलू म्हणजे कपिल देव! कपिल देव हे भारताचे केवळ सर्वोत्कृष्ट अष्टपैलूच नाही, तर सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजही मानले जातात. त्यांनी १३१ कसोटी सामन्यांत ४३४ विकेट घेतानाच ५२४८ धावाही केल्या होत्या. तसेच त्यांनी २२५ एकदिवसीय सामन्यांत २५३ गडी बाद करतानाच ३७८३ धावाही फटकावल्या होत्या. भारताने पहिला वर्ल्डकप १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वातच जिंकला. या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली नाबाद १७५ धावांची खेळी अजरामर आहे.

कपिल देव यांनी १९९४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आणि त्यानंतर भारतीय संघाचा पुढील कपिल देव शोधण्याचा प्रवास सुरु झाला. तो प्रवास आजही म्हणजे तब्बल २६ वर्षांनी सुरूच आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. इरफान पठाणच्या रूपात भारताला वेगवान गोलंदाजी करू शकणारा अष्टपैलू लाभला होता. डावखुऱ्या इरफानने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून १७० हूनही अधिक सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने ३०० हून अधिक विकेट घेतल्या आणि जवळपास तीन हजार धावाही केल्या. परंतु, त्याला भारतीय क्रिकेट संघाच्या आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आल्या असे म्हणता येणार नाही.

यात केवळ इरफानचा दोष होता का? अजिबातच नाही. त्याला बरेचदा दुखापतींनी सतावले. सुरुवातीला तेजतर्रार मारण्यासाठी ओळखला जाणारा इरफान विविध दुखापतींमुळे मध्यम गती गोलंदाज झाला. त्यातच ग्रेग चॅपल यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी इरफानला त्याच्या फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायला लावले. याचा विपरीत परिणाम इरफानच्या गोलंदाजीवर झाला. त्यामुळे कपिल देव यांच्यानंतरचा ‘वर्ल्ड क्लास’ अष्टपैलू भारताला मिळता-मिळता राहून गेला.

काही वर्षांपूर्वी रविंद्र जाडेजाच्या रूपात भारताला आणखी एक अष्टपैलू लाभला, ज्याने डावखुऱ्या फिरकीने आणि फलंदाजीने बरेच यश संपादले आहे. तसेच हार्दिक पांड्याच्या एंट्रीने भारताला वेगवान गोलंदाजी करू शकतो असा अष्टपैलूही मिळाला. परंतु, मागील वर्षी हार्दिकच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर त्याने गोलंदाजी करणेच बंद केले. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ विजेता ठरला. मुंबईच्या या यशात हार्दिकने महत्वाची भूमिका बजावली होती, पण ती केवळ फलंदाज म्हणून!

हार्दिकने या स्पर्धेत एकही षटक टाकले नाही. सध्या सुरु असलेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही हार्दिकने गोलंदाजी करण्यास तयार नसल्याचे सांगितले. त्याने एका एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली आणि चार षटकांत एक विकेटही घेतली. मात्र, ‘गोलंदाजी केल्यामुळे माझ्या पाठीवर ताण जाणवला आणि मी आता इतक्यात पुन्हा गोलंदाजी करणार नाही,’ असे पुढील सामन्यानंतर तो म्हणाला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकने भारताकडून सर्वाधिक २१० धावा केल्या. मात्र, तो गोलंदाजी करत नसल्याने भारताला त्याला सहाव्या क्रमांकावर खेळवावे लागले. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला केवळ पाच गोलंदाज खेळवता आले, ज्यात अष्टपैलू जाडेजाचाही समावेश होता. मयांक अगरवाल, शिखर धवन, कर्णधार कोहली, श्रेयस अय्यर आणि यष्टीरक्षक लोकेश राहुल या अव्वल पाच फलंदाजांपैकी एकालाही गोलंदाजी करता येत नसल्याने भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला.

भारताने मागील काही वर्षांत हार्दिकसह विजय शंकर आणि शिवम दुबे या वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना संधी देऊन पाहिली. मात्र, या दोघांनाही अपेक्षित खेळ करता आला नाही आणि त्यांनी संघातील स्थान गमावले. त्यातच आता भारतीय स्थानिक क्रिकेटमध्येही प्रतिभावान अष्टपैलूंची कमतरता जाणवत आहे. आता आयपीएल स्पर्धा सुरु होऊन तेरा वर्षे होऊन गेली. परंतु, या स्पर्धेतूनही जाडेजा आणि हार्दिक व्यतिरिक्त एखादा अष्टपैलू पुढे आलेला नाही. त्यामुळे हार्दिक आता पुन्हा गोलंदाजी करण्यास सुरुवात करत नाही, तोपर्यंत अष्टपैलू म्हणून भारताला केवळ जाडेजावर अवलंबून राहावे लागणार, असेच दिसते.