IPL 2020: मुंबई इंडियन्सची पाचव्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी

आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी आपल्या नावावर केली. आयपीएलच्या १३ व्या हंगामाचा अंतिम सामना दुबई येथे रंगला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईने सलग दुसऱ्यांदा तर एकूण पाचवेळा आयपीएलच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. रोहित शर्माने अखेरच्या सामन्यात कर्णधार पदाला साजेशी खेळी करत दिल्ली कॅपिटल्सचा धुरळा उडवला. पहिल्या चेंडूपासून मुंबईने दिल्लीवर वर्चस्व गाजवले. ज्यामुळे दिल्लीचा पाच विकेट्स राखून धुव्वादार पराभव करता आला.

दिल्लीने अंतिम सामना जिंकण्यासाठी मुंबईसमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी चार षटकांतच ४५ धावांची भागीदारी रचल्यावर डी कॉकला (२०) मार्कस स्टोईनिसने बाद केले. रोहितने मात्र दुसऱ्या बाजूने आपली फटकेबाजी सुरु ठेवत ३६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे मुंबईच्या १०० धावा १२ षटकांतच फलकावर लागल्या. दरम्यान सूर्यकुमार यादव मात्र १९ धावांवर धावचीत झाला. तो बाद झाल्यावर रोहितला ईशान किशनची साथ लाभली. रोहित मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६८ धावा केल्या. मात्र, किशनने नाबाद ३३ धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला.

त्याआधी दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सुरुवातीच्या षटकांत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत विकेट मिळवण्यासाठी ओळखला जातो. त्याने दिल्लीचा सलामीवीर मार्कस स्टोईनिसला पहिल्याच षटकात खातेही न उघडता माघारी पाठवले आणि अजिंक्य रहाणेला केवळ २ धावांवर बाद केले. तसेच फॉर्मात असलेल्या शिखर धवनला (१५) जयंत यादवने माघारी पाठवल्याने दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली. यानंतर मात्र कर्णधार अय्यर आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी रचत दिल्लीचा डाव सावरला. पंतने यंदाच्या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावताना ३८ चेंडूत ५६ धावांची खेळी केली. नेथन कुल्टर-नाईलने त्याला बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने मात्र त्यानंतरही आपली चांगली फलंदाजी सुरु ठेवली. त्याने अखेरच्या षटकांत फटकेबाजी केल्याने दिल्लीने २० षटकांत ७ बाद १५६ अशी धावसंख्या उभारली. अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली.