हृदयशस्त्रक्रियेनंतर आहारबद्दलचे समज-गैरसमज

हृदयशस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या आहाराबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी ओपन हार्ट सर्जरीनंतर कोणता आहार घ्यावा.

Mumbai
diet after heart surgery
हृदयशस्त्रक्रियेनंतरचा आहार

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) सीव्हीडीमुळे होणारे ८५% मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे आणि स्ट्रोक्समुळे होतात. हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे विकार (कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज – सीव्हीडी) हे हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार असतात. त्यात हृदयातील रक्तवाहिनीचा विकार, ऱ्ह्युमॅटिक हार्ट डिसीज इत्यादी आजारांचा समावेश असतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, अतिरिक्त कोलेस्टरॉल, मानसिक ताण, चुकीचा आहार आणि बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यासारख्या हृदयविकारांसाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांमुळे हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यापैकी बहुतेक घटकांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. तसेच जीवनशैलीशी संबंधित समस्या आपण टाळू शकतो. आहार हा सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.

हृदय शस्त्रक्रियेनंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला सकस आणि संतुलित आहार घेण्यास सांगतील. कारण सकस आहार घेतल्यामुळे तुमची प्रकृती सामान्य होण्यास मदत होते. तुमच्या हृदयाला इतर काही समस्या भेडसावत नाहीत. तुम्ही व्यवस्थित आहार घेतला तर तुमच्या शरीरावरील छेद भरून निघण्यास मदत होते. शस्त्रक्रियेनंतर पुढील काही महिने तुम्ही घरगुती आहार घ्यावा.

भारतीय घरगुती आहाराची पद्धत उत्तम आहे. त्याला काही अपवाद आहेत. शस्त्रक्रिया झाल्या झाल्या रुग्णांनी आहारात अमुलाग्र बदल करु नये. कारण ते पदार्थ बेचव असल्यामुळे रुग्ण तो आहार घेणे टाळतात. शस्त्रक्रियेच्या वेळी दिलेले छेद भरून काढण्यासाठी तुम्हाला विशिष्ट आहार घ्यावा लागतो. काही पदार्थ टाळणे अत्यावश्यक असते. पण काही गैरसमज तुमची चिंता वाढवू शकता. शस्त्रक्रियेनंतर घेण्याच्या आहाराबद्दल असलेले गैरसमज जाणून घेऊया

गैरसमज: काही सुपर फुड्स खाल्ल्यामुळे तुमचे हृदयविकार लांब राहतात.

तथ्य: सुपर फुड नावाचा काहीही प्रकार नसतो. ब्ल्यूबेरी, डाळींबे, अक्रोड, मासे हे पोषक पदार्थ आहेत. परंतु, त्यामुळे हृदयविकार होण्याला प्रतिबंध होत नाही. पण, काही पदार्थ तुम्हाला निश्चित मदत करू शकतात. अभ्यासानुसार तृणधान्ये, कडधान्ये, पालेभाज्या, फळे आणि ऑलिव्ह तेल, आठवड्यातून एकदा मासे आणि चिकन यामुळे हृदयविकारांचा धोका कमी झाल्याचे दिसून आले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये आठवडाभर बहुधा शाकाहारी पदार्थ खातात आणि आठवड्यातून एकदा मांसाहारी पदार्थ खातात. तुम्ही रेड मीट म्हणजेच मटण टाळावे कारण त्यात कोलेस्टरॉलचे प्रमाण जास्त असते.

गैरसमज: चरबी किंवा मेद तुमच्यासाठी चांगले नाही

तथ्य: आपल्या शरीराला दररोज एका विशिष्ट प्रमाणात कोलेस्टरॉल आवश्यक असते कारण आपल्या शरीरातील बहुतेक हॉर्मोन्स म्हणजेच संप्रेरके कोलेस्टरॉलपासून तयार झालेली असतात. आपल्या मेंदूला आणि काही स्नायूंना कोलेस्टरॉलची इंधन म्हणून आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला कोलेस्टरॉल म्हणजेच मेद आवश्यक असते. पण त्याचेप्रमाण महत्त्वाचे असते. तुम्ही फास्ट फूड, बेक केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न टाळावे. एवढेच नव्हे तर शीत पेये इत्यादी अति साखर असलेले पदार्थही टाळले पाहिजेत. त्यांचा हृदयावर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. लाल मांसापासून (मटण) तयार करण्यात आलेले सॅच्युरेटेड फॅट्स आणि बटर या घटकांमुळेही व्यक्तीच्या एलडीएल पातळीमध्ये वाढ होते. सॅच्युरेटेड फॅट्सऐवजी मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्समुळे तुमची एलडीएल पातळी कमी होऊ शकते. याचा अर्थ, तुम्ही प्रक्रिया न केलेले आणि नैसर्गिक अन्न सेवन केल्यास तुमच्या शरीरातील कोलेस्टरॉलची पातळी वाढणार नाही. आपल्याला आवश्यक असलेल्या उर्जेच्या १०% मेद सेवन करावे म्हणजे साधारण ३०-३५ ग्रॅम/दिन एवढे मेद सेवन करावे.

गैरसमज: मीठ नैसर्गिक असल्यामुळे ते धोकादायक नसते.

तथ्य: अतिरिक्त मीठ हे मद आणि साखरेपेक्षाही अधिक धोकादायक असते. अतिरिक्त मीठामुळे रक्तदाब वाढतोच, पण त्याचबरोबर मूत्रपिंडांवरील ताणही वाढतो. आपण सेवन करत असलेल्या बहुतेक अन्नपदार्थांमध्ये मीठ नैसर्गिकरित्या समाविष्ट असते. त्यामुळे आपण मीठ घालण्याची आवश्यकता नसते. पण प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये मीठाचे प्रमाण नैसर्गिक पातळीहून खूप जास्त असते. अति प्रमाणात मीठ खाल्ल्यास तुमच्या शरीरातील पाणी वाढून रक्तदाब वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या हृदयावर, रक्तवाहिन्यांवर मूत्रपिंडांवर आणि मेंदूवर ताण येऊ सकतो. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा धोकाही वाढतो. त्यामुळे मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावेव आणि मीठ कमी असलेले खाद्यपदार्थ खावेत. त्याचप्रमाणे तुमच्या शरीरात दर दिवशी किती मीठ गेले पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करा. कारण अति-मीठ हे पूर्णपणे वर्ज्य आहे.

तात्पर्य: सकस आहार, पुरेशी झोप आणि योग्य व्यायाम या तीन घटकांची ओपन हार्ट सर्जरीनंतर आवश्यकता असते. तेलकट, तळलेले पदार्थ टाळावते. आहार मर्यादित असावा. आहाराचा दर्जाही तितकाच महत्त्वाचा असतो. डाएट फॅडच्या फंदात पडू नका. आपल्या भारतीय आहारपद्धती समाधानकारक आहेत. प्रकृती सामान्य होईपर्यंत शक्यतो घरगुती पदार्थ खावेत. मेद आणि मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे. मद्यसेवन कमी करावे आणि धुम्रपान वर्ज्य करावे. तुमचे आरोग्य व्यवस्तित राहण्यासाठी आणि हृदय निरोगी राहण्यासाठी सकस आहाराची सवय अंगी बाणवून घ्या!


डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ-थोरॅसिक सर्जन