लहान मुलांसाठी खास ‘मॅक्रॉनी उपमा’

'मॅक्रॉनी उपमा' रेसिपी

Mumbai
macaroni upma
'मॅक्रॉनी उपमा'

लहान मुलांना दररोज डब्यासाठी काय द्यावे असा प्रश्न पालकांना पडतो. सातत्याने पोळी – भाजी दिल्यामुळे मुले देखील कंटाळतात. अशावेळी काहीतरी छान आणि वेगळ काही दिल्यास मुलं ही खूश राहतात आणि आवडीने देखील खातात. चला तर अशीच एक रेसिपी पाहूया जी लहान मुलांसाठी खास आहे.

साहित्य :

१ वाटी मॅक्रॉनी
१/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ लहान टोमॅटो
१ ते २ हिरव्या मिरच्या
१ चमचा तूप
१/४ चमचा जिरे
२ चिमूट हिंग
४-५ कढीपत्ता पाने
चवीपुरते मीठ
बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :

सर्वप्रथम ३-४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात अर्धा चमचा मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात मॅक्रॉनी घालाव्यात. ८ ते १० मिनिटे किंवा पाकिटावर दिलेल्या वेळानुसार उकळवून मॅक्रॉनी शिजवाव्यात. चाळणीत मॅक्रॉनी गाळून गरम पाणी निथळून मॅक्रॉनीवर गार पाणी घालून तेही पाणी निथळू द्यावे. त्यानंतर कढईत तूप गरम करावे. त्यात जिरे, हिंग, कढीपत्ता आणि मिरची घालून फोडणी करावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा पारदर्शक होईस्तोवर परतून टोमॅटो घालावा. टोमॅटो चांगला मऊसर होईस्तोवर परतावे. आता त्यामध्ये मॅक्रॉनी घालून मिक्स करावे. त्यानंतर त्यात मीठ घालून २ मिनिटे गरम करून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

[टीप : उपमा बनवताना फोडणीत गाजर, फरसबी यांसारख्या भाज्याही घालू शकतो.]