राजू शेट्टी नरमले; ’वर्धा-सांगलीपैकी कोणतीही जागा मिळावी’

Mumbai
mp raju shetty
खासदार राजू शेट्टी

भाजपप्रणीत युती आणि काँग्रेसप्रणीत आघाडी या दोघांकडून राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आपल्यासोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू असताना स्वत: राजू शेट्टींना मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच जायचं आहे. त्यामुळे भाजपने जागा दिल्या तरी त्यांच्यासोबत जाणार नाही अशी ठाम भूमिका राजू शेट्टींनी घेतली आहे. त्यासाठीच आधी हातकणंगलेसोबत वर्धा आणि बुलढाणा या दोन्ही जागांची मागणी करणार्‍या राजू शेट्टींनी आता ’यापैकी कोणतीही एक किंवा सांगलीची जागा मिळाली तरी आम्ही आघाडीत यायला तयार आहोत’, अशी भूमिका राजू शेट्टींनी ’आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केली आहे. दरम्यान, बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाण्यात राजेंद्र शिंगणेंना उमेदवारी दिल्यामुळे वर्धा किंवा सांगली हे दोनच पर्याय आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे शिल्लक आहे.

काँग्रेस राजू शेट्टींसाठी सांगली सोडणार!
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या वाट्यातली हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी सोडली असताना आता काँग्रेसच्या कोट्यातून एक जागा शिल्लक आहे. वर्ध्यातून माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभा राव यांच्या कन्या चारूलता टोकस इच्छुक असून त्यासाठी त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे वर्ध्याऐवजी सांगलीच्या उमेदवारीवर राजू शेट्टींची बोळवण करण्याचा विचार काँग्रेसमधील नेतेमंडळी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीच्या विद्यमान आमदारांपैकी एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस वगळता उर्वरित चारही मतदारसंघ हे शिवसेना-भाजप आघाडीकडे आहेत. तसेच, संजयकाका पाटील यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये मतदारसंघात मोठं प्रस्थ निर्माण केल्यामुळे काँग्रेसने इथे उमेदवार देऊन एक जागा पणाला लावण्याऐवजी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ही जागा सोडून ’चान्स’ घेण्याचं ठरवलं असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे.

बरं झालं, राजू शेट्टींनी माढा नाही मिळालं!
दरम्यान, राजू शेट्टींनी आघाडीमध्ये घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला होणारा संभाव्य विरोध कमी करण्याची खेळी या निमित्ताने आघाडीकडून खेळली जात असल्याचं बोललं जात आहे. शरद पवार माढ्यातून उभे राहाणार म्हणून राजू शेट्टींनी या भागातून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शरद पवारांनी माघार घेतल्यानंतर राजू शेट्टींनी या जागेची देखील मागणी केली होती. राजू शेट्टी आघाडीत न येता स्वतंत्र लढले, तर माढ्यात शेतकरी मतांची विभागणी होऊन त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस आणि पर्यायाने काँग्रेस प्रणीत आघाडीला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सांगलीची जागा राजू शेट्टींनी सोडण्याचं पक्क झाल्याचं सांगितलं जात आहे.

काँग्रेसकडून आम्हाला एक जागा येणे आहे. वर्धा किंवा सांगली यापैकी कोणतीही जागा मिळाली तरी आम्हाला चालेल. पण त्याविषयी अद्याप काँग्रेसकडून रीतसर काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण जर जागा मिळाली नाही, तर स्वतंत्र लढण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here