घरमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस!

महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस!

Subscribe

मुख्यमंत्र्यांचा सवता सुभा , राष्ट्रवादीमध्ये दोन गट , काँग्रेसमध्ये नाराजी

राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस आता प्रकर्षाने दिसू लागली असून पुढच्या दोन महिन्यात हे सरकार पडू शकेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही वरिष्ठ नेते हे सरकार नक्की पडणार, असे खासगीत सांगत आहेत. तर स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार भाजप पाडणार नाही तर त्यांच्या अंतर्गत कुरबुरीमुळे पडेल, अशी भविष्यवाणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सवता सुभा, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आणि काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण, अशी काही प्रमुख कारणे हे सरकार पडायला कारणीभूत ठरतील, असे बोलले जाते.

कोरोनाच्या काळात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजप आपल्या माथी घेणार नाही. तसे केले तर जनतेच्या मनातील सहानुभूती आपण गमावून बसू, असे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना वाटते. उलट आपसातील वादाने हे सरकार पडले तर ते भाजपला हवे आहे. यामुळे सध्या फडणवीस कोरोनाचा मुकाबला करण्यात हे सरकार कसे निष्प्रभ ठरले आहे, हे लोकांना सांगत आहेत. यामुळे जनतेच्या मनात या सरकारविषयीची नाराजी दिसून येईल,असा विरोधी पक्ष भाजपचा अंदाज आहे. त्याचवेळी या सरकारमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीवर ते लक्ष ठेवून आहेत. या धुराला फुंकर घालत त्याची आग करत ते सरकार आपोआप पडेल, याची व्यवस्था करता आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कारभार बघता हे सरकार फक्त शिवसेनेचे असल्यासारखे असून मातोश्रीवर बसून ते राज्याचा कारभार हाकत असल्याने मित्रपक्षांमध्ये नाराजी आहे. मुळात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांना विश्वासात न घेता ते निर्णय घेत असल्याने सहकारी पक्ष नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना समजावून चुकीचे निर्णय फिरवून तडजोडी करत असले तरी हे ठिगळ जोडण्याचे काम फार काळ चालू शकत नाही. मुख्य म्हणजे त्यांच्या पक्षातच सध्या दोन गट पडल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असे ते दोन गट आहेत.

आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री यांना बोलावून त्यांच्याकडून खात्याची तसेच त्यांच्या मतदारसंघाची माहिती घेताना दिसत आहेत. हेच मंत्री मग अजित पवार यांच्याकडे जाऊन आव्हाड आता प्रमुख नेते झाल्याची तक्रार करतात. मात्र एक धनंजय मुंडे सोडले तर अजितदादांशी निष्ठावंत कोणी दिसत नसल्यामुळे मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेता उपमुख्यमंत्र्यांनी सध्या सबुरीचे धोरण स्वीकारल्याचे दिसते.

- Advertisement -

काँग्रेसची अवस्था तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मागे फरफटत चालल्यासारखी असल्याने त्यांचे मंत्री आणि नेते खूप नाराज आहेत. काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपला मिळू शकतो, असे बोलले जाते. ही नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट मागितली होती, पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे थोरात यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, अशी झाली आहे.

ठाकरेंभोवती निवडून न येणार्‍या नेत्यांचा कोंडाळा !

उद्धव ठाकरे यांच्याभोवती मातोश्रीवर सध्या जनतेमधून निवडून न येणार्‍या नेत्यांचा कोंडाळा वाढला आहे. सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्री निर्णय घेत असल्याचे सांगितले जाते. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासारखा या घडीला शिवसेनेत सर्वात मोठी ताकद असलेला नेता मागे पडत आहे. हे कमी म्हणून की, काय हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आणण्यासाठी ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनाही सध्या दोन हात दूर ठेवले गेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -