घरमहाराष्ट्रइंजिनियरिंगच्या 48 टक्के जागा रिक्त

इंजिनियरिंगच्या 48 टक्के जागा रिक्त

Subscribe

विद्यार्थ्यांची यंदाही पाठ

इंजिनियरिंगच्या शिक्षणानंतरही रोजगाराच्या संधी कमी असल्याने या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. लाखो रूपये शैक्षणिक खर्च करूनही नोकरीची हमी मिळत नसल्याने विद्यार्थी अभियांत्रिकीकडे पाठ फिरवत आहेत. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या फेरीनंतरही तब्बल 48 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. कम्प्युटर इंजिनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत असला तरी सिव्हील इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग व मेकॅनिकल इंजिनियरिंगच्या मोठ्या प्रमाणात जागा शिल्लक आहेत.

हमखास नोकरी मिळत असल्याने दहा वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांचा इंजिनियरिंगकडे कल असायचा. परंतु नोकरीच्या संधी कमी झाल्याने काही वर्षांपासून याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या इंजिनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेर्‍या पार पडल्यानंतरही तब्बल 48 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. इंजिनियरिंग अभ्यासक्रमासाठी राज्यातील 1 लाख 27 हजार 537 जागा सुमारे 94 हजार अर्ज आले होते. तिसर्‍या फेरीनंतर त्यातील फक्त 65 हजार 441 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहे. तर तब्बल 62 हजार 86 जागा रिक्त राहिल्या आहेत. हा आकडा एकूण जागांच्या तुलनेत 48 टक्के इतका आहे. इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमाच्या मेकॅनिकल इंजिनियरिंगला सर्वाधिक जागा असूनही सर्वात कमी प्रतिसाद मिळाला आहे.

- Advertisement -

मेकॅनिकल इंजिनियरिंगला सर्वाधिक 33 हजार 900 जागा होत्या. त्यातील फक्त 9 हजार 566 जागांवर म्हणजे 28.22 टक्के इतकेच प्रवेश झाले आहेत. त्याखालोखाल इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगला 30.92 टक्के इतके प्रवेश झाले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगला 11 हजार 944 जागा असून, त्यातील फक्त 3693 जागांवरच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्याचप्रमाणे सध्या बांधकाम क्षेत्रामध्ये बंदी असल्याने त्याचा फटका सिव्हिल इंजिनियरिंग प्रवेशाला बसल्याचे दिसून येत आहे. 20 हजार 832 जागा असलेल्या सिव्हील इंजिनियरिंगला 6 हजार 830 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. हे प्रवेश 32.79 टक्के इतके झाले आहे. फूड टेक्नोलॉजी व कम्प्युटर टेक्नोलॉजीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

त्याचबरोबरच इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व कम्प्युटर इंजिनियरिंगला विद्यार्थ्यांनी पसंती दर्शवली आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीच्या 9 हजार 94 जागांपैकी 6 हजार 459 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. तर कम्प्युटर इंजिनियरिंगच्या 17 हजार 476 जागांवर तब्बल 11 हजार 654 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. बर्‍याच अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असल्याने यंदा इंजिनीअरिंगच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत.

- Advertisement -

अभ्यासक्रम -जागा -प्रवेश -टक्के
मेकॅनिकल इंजिनियरिंग -33900 -9566 -28.22%
इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग -11944 -3693 -30.92%
सिव्हील इंजिनियरिंग -20832 -6830 -32.79%
इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलि. इंजि. -20018 -8210 -41.01%
कम्प्युटर इंजिनियरिंग -17476 -11654 -66.69%
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी -9094 -6459 -71.02%
कम्प्युटर टेक्नोलॉजी -328 -256 -78.05%
फूड टेक्नोलॉजी -200 -143 -71.50%

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -