घरमहाराष्ट्रवामने रेल्वे स्थानकावर 6 प्रवासी जखमी

वामने रेल्वे स्थानकावर 6 प्रवासी जखमी

Subscribe

कोकण रेल्वेच्या वामने रेल्वे स्थानकात ट्रेनमधून उतरणारे 6 प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली. मात्र पडलेले प्रवासी एकमेकांना आधार देत बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळून किरकोळ दुखापतींवर निभावले. जुना फलाट काढून टाकल्याने आणि क्षणात ट्रेन सुरू झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. यातील नवे फलाट कमी उंचीचे आहेत. याला तालुक्यातील वामने परिसरातील नागरिकांनी यापूर्वी विरोध केला आहे. रेल्वे स्थानकातील जुना फलाट देखील या कामात काढून टाकण्यात आला आहे. यामुळे टे्रनमधून थेट जमिनीवर उतरावे लागत आहे. सोमवारी रात्री ९.१५ वाजता दादर-रत्नागिरी पॅसेंजर येऊन थांबली. ट्रेन थांबताच यातील एका डब्यातून चौदा प्रवासी उतरणारे होते. जुना फलाट देखील कमी उंचीचा असल्याने शिडीवरून उतरताना प्रवाशांना उशीर झाला. काही जण खाली उतरले तर काही प्रवासी डब्यात असतानाच ट्रेन सुरू झाली. यामुळे प्रवाशांनी उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात दत्ताराम सखाराम बोटेकर, दीपाली दत्ताराम बोटेकर, सुजाता गजानन चिविलकर (रा. सापे), नरेंद्र विठोबा रेशीम (रा. शिरगाव), श्रद्धा संजय शिगवण, वेदांत शिगवण असे सहा जण जखमी झाले.

- Advertisement -

यावेळी एकच गोंधळ झाल्याने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मन्सूर देशमुख, सरपंच प्रवीण साळवी, फौजान देशमुख, फाईक देशमुख, प्रकाश जंगम, मंगेश निर्मल हे तात्काळ स्थानकात दाखल झाले आणि जखमींना मदत केली. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना हा प्रकार कळविण्यात आला. याठिकाणी यापूर्वी देखील अशाच प्रकारे दोन प्रवासी जखमी झाले होते. होणार्‍या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे मन्सूर देशमुख यांनी सांगितले.

वामने रेल्वे स्थानकावर होत असलेला नवीन फलाट देखील कमी उंचीचा आहे. उंची वाढवण्याची मागणी यापूर्वीच केली आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी.
– मन्सूर देशमुख, अध्यक्ष, कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समिती

- Advertisement -

घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली. त्या ठिकाणी होणारी गैरसोय आणि होणारे अपघात याची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आली आहे.
– किसन बिद्री, अभियंता, कोकण रेल्वे, रत्नागिरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -