आदिवासी कारागीरांनी बांबूपासून तयार केल्या राख्या

प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी बांबूपासून राख्या बनवण्याची संकल्पना महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांनी सुरू केली आहे. या बांबू राख्यांचे वाटप हे ठाणे जिल्हयातील शहापूर, वाडा या आदिवासी दुर्गम भागातील शाळांमध्ये करण्यात आले आहे.

bamboo rakhi made of tribal artisans
आदिवासी कारागीरांनी बांबूपासून बनविलेल्या राख्या

राख्या तयार करताना मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागद, पुठ्ठे यांचा उपयोग केला जातो यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. सर्वत्र हे प्लास्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याकरिता बांबूपासून राख्या तयार करण्याची संकल्पना महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांच्या माध्यमाने आता पुढे आली आहे. चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात खास आदिवासी कारागीरांनी मोठ्या कौशल्याने बांबूपासून राख्या तयार केल्या आहेत. ठाणे जिल्हयातील शहापूर, वाडा या आदिवासी दुर्गम भागातील शाळांमध्ये या राख्या वाटप करण्यात येत आहेत.

बांबू राखी पासून प्रदूषण नियंत्रणबाबतचा संदेश

महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे अजय पिलारीसेठ आणि वन्यजीव विभागाचे खर्डी वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांच्या पुढाकाराने आणि सहकार्याने हा उपक्रम सुरु आहे. एकूण शहापूर आणि वाडा या तालुक्यांत पाचशे राख्या वाटप केल्या जाणार असून यातील दोनशे पन्नास राख्या वन्यजीव विभागाच्या माहुली परिसरातील अंबेडोह, मामनोली, चांदरोटी, चिंबिचापाडा, वडुचापाडा, काटेकुई आदी भागातील शाळांतील मुलींना या राख्या वाटप करण्यात आल्या. बांबूचा उपयोग आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू हे नैसर्गिक रित्या विघटिक होणारे असल्याने प्रदूषणावर नियंत्रण राहते. जी आज काळाची गरज आहे. म्हणून बांबू राखी पासून प्रदूषण नियंत्रणबाबतचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पोहोचविता येईल.

नक्की वाचा – स्वातंत्र्यदिनानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारला फुलांचा तिरंगा

…यामुळे आदिवासींच्या हाताला रोजगार झाला उपलब्ध

या दृष्टीने बांबूच्या राख्याचा वापर ही संकल्पना पुढे आली. या राख्या घडविणाऱ्या गरीब आदिवासींच्या हाताला देखील रोजगार उपलब्ध झाला आहे. यासाठी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आसनगाव परिसरातील एमआईडीसी मधील उद्योजक मुकेश भाई पारीक, रामलाल पटेल, डुंगरशी धेडिया, पवन गुप्ता यांनी या सर्व राख्या खरेदी करुन या उपक्रमात मोलाचा हातभार लावला आहे, असे अजय पिलारीसेठ आणि वनपरिक्षेत्र अधिकारी दर्शन ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले. या राख्या घराघरात पोहचविण्याचे उद्दिष्ट बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचं आहे. यात स्थानिक स्थरावर वन्यजीव विभाग ठाणे पंचायत समिती गट विकास अधिकारी शिक्षण विभाग हे सर्व या उपक्रमात सहभागी झाले आहेत.


हेही वाचा – पूरग्रस्त भागातील मदतनिसांसाठी ३० हजार अंडी