उद्यापासून काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा सुरु होणार

Mumbai
congress party start mahapardafash yatra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप करत आता काँग्रेस पक्ष राज्यभर महापर्दाफाश सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल करणार आहे. सोमवार दि. २६ ऑगस्ट रोजी अमरावती येथे पहिली महापर्दाफाश सभा होणार असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.

राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमूख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीत होत असलेल्या या शुभारभांच्या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आ. पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार उपस्थितीत राहणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात विविध ठिकाणी महापर्दाफाश सभा होणार आहेत. पुढच्या टप्प्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण-मुंबई या विभागात सभा होणार आहेत.

मोझरी येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही प्रचंड विकास केला आहे, असे विधान करून ‘वाद- विवादा’चे जाहीर आव्हान दिले होते. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारून दुसऱ्याच दिवशीच प्रदेश काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले त्यांना जाहीर चर्चेसाठी तारीख, स्थळ आणि वेळ कळविण्याचे आव्हान दिले होते. हे प्रतिआव्हान न स्विकारता मुख्यमंत्र्यांनी ‘पळ’ काढल्यामुळे काँग्रेस पक्ष आणि निवडणूक प्रचार समितीने त्यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावरून ‘महापोलखोल’ सभा घेण्याचा निर्णय घेतला आणि त्या नियोजनानुसार राज्यभर या सभा होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here